…आणि हेमा मालिनी व देव आनंद रोप वे वरच लटकले!
अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) ला लहानपणापासून अॅक्रोफोबियाचा त्रास होता. अॅक्रोफोबिया म्हणजे उंचीवरून खाली पाहण्याची भीती. अशा लोकांना उंच इमारतीतून, पर्वतावरून खाली पाहताना खूप भीती वाटते. पोटात भीतीचा गोळा येतो. हा अतिशय कॉमन आजार आहे. याच फोबियाचा त्रास हेमा मालिनीला एका गाण्याचे चित्रीकरणाच्या वेळेला प्रचंड झाला होता. हा चित्रपट गोल्डी विजय आनंद यांनी दिग्दर्शित केला होता आणि चित्रपटात देव आनंद हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या दोघांचा हा पहिला चित्रपट होता. १९७० साली प्रदर्शित झालेला ‘जॉनी मेरा नाम’. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरण्याच्या दरम्यान हा किस्सा घडला होता. गोल्डी विजय आनंद त्याच्या चित्रपटातील गाण्यांच्या चित्रीकरणासाठी अतिशय लोकप्रिय होता. गाण्यातील प्रत्येक फ्रेम कशी अप्रतिम होईल याकडे त्याचा कल असायचा. चित्रपटातील या गाण्याच्या सिच्युएशन मध्ये हेमा मालिनी पोलिसांचा ससेमिरा चुकवत असते आणि ती देव आनंद सोबत खोटे खोटे प्रेमाचे नाटक करत असते. इन्स्पेक्टर जगदीश राज आणि त्याची टीम त्यांच्या मागावर असते. हे गाणं राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलं होतं आणि त्याला संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिलं होतं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं विजय आनंदच्या पिक्चरायजेशन मुळे आज देखील लोकप्रिय आहे. रसिकांच्या गाणे लक्षात आलेच असेल ‘वादा तो निभाया ओ मेरे राजा…’
या गाण्याचे चित्रिकरण बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील नालंदा विश्वविद्यालय परिसरात केले होते. या परिसरात एक खंडहर आहे. तिथेच या गाण्याचे बव्हंशी शूट झाले होते. या गाण्याचा एक अंतरा नालंदा जवळच्या राजगीर या बुद्ध मंदिर असलेल्या परिसरात झाले होते. या मंदिरात जाण्यासाठी त्यावेळी एक रोप वे होता. या रोप वे ला एक ट्रॉली लटकवलेली होती आणि त्याद्वारे लोक त्या मंदिरापर्यंत पोहोचत होते. विजय आनंद ला या गाण्यातील एक अंतरा या रोप वे वर चित्रित करायचा होता. हेमा मालिनीने त्याला प्रचंड विरोध केला कारण तिथला माहोल पाहून तिचे डोळेच फिरले. भीतीने ते गांगरून गेली. कारण एका रोप वे ला लटकवलेल्या ट्रॉली मधून वर जायचे तिला धडकी भरवणारे होते. परंतु गोल्डी आणि त्याच्या युनिट मधील लोकांनी तिला हिम्मत दिली. देव आनंद यांनी देखील तिला धीर दिला. ही ट्रॉली अतिशय छोटी होती. दोघे देखील एका फ्रेम मध्ये यावेत म्हणून देव आनंदच्या मांडीवर हेमा मालिनीला (Hema Malini) बसवले होते. तिने हाताने रोपवेच्या वरची वायर पकडली होती.
गाण्याचे शूटिंग सुरू झाले. हेमा मालिनी (Hema Malini) प्रचंड घाबरली होती. तिच्या काळजाची धडधड वाढली होती. तिचा भीतीचा आजार बळावला होता. देव तिला धाडस देत होता. रोपवे जसजशी वर जाऊ राहिली तस तशी हेमा मालिनीचे टेन्शन वाढू लागले. विजय आनंद कॅमेरामध्ये तिचे टेन्शन येणार नाही असे शूट करत होता. पण हेमा (Hema Malini) जाम घाबरली होती. त्याच वेळेला एक घटना घडली. अनपेक्षितपणे एक मोठा जर्क बसला आणि रोप वे मध्येच थांबली! खाली प्रचंड मोठी दरी होती. आणि एका वायरला एका ट्रॉलीवर हेमा आणि देव आनंद लटकलेले होते. आता मात्र हेमा अक्षरशः रडायला लागली. भीतीने तिची गाळण उडाली. ती पूर्ण घामेजली होती. पल्सरेट प्रचंड वाढला होता. घशाला कोरड पडली होती. देव आनंदने त्याही काळात तिला धीर दिला तिचे लक्ष दुसरीकडे वळवले. आणि लवकरच रोप वे चालू होईल याची जाणीव करून दिली. आणि,” काही काळजी करू नको मी आहे मला घट्ट धर!” असं सांगितलं. पण हेमाचे टेन्शन वाढतच होते देव आनंदने तिचा मूड हलका करण्यासाठी काही जोक सांगायला सुरुवात केली. पण हेमा काही केल्या सावरायला तयार नव्हती. तिला आता चक्कर येऊ लागली होती. तितक्यात ती रोप वे पुन्हा सुरू झाली आणि हेमा सुखरूप पणे वरच्या टोकाला पोहोचली. तिच्या पायातील त्राण गेले होते. भीतीने तिची बोबडी वळली होती.
======
हे देखील वाचा : मेहबूब स्टुडिओ आणि देव आनंदचे घट्ट नाते…
======
देव आनंद मात्र मस्त हसत होता. हळूहळू तिच्या मनातील टेन्शन कमी झाले. त्यानंतर विजय आनंदने काही शॉट्स क्लोज अप मध्ये घेतले आणि लॉन्ग शॉट आणि क्लोजअप शॉट्स यांचे कॉम्बिनेशन करून शूटिंग संपवले! हा किस्सा हेमा मालिनी (Hema Malini) तिच्या आत्मचरित्रामध्ये लिहिला आहे. त्यात ती सांगते,” आज देखील ज्या ज्या वेळेला मी हा चित्रपट आणि हे गाणे पाहते. त्यावेळी तो भयानक प्रसंग आठवतो. मी प्रचंड नर्वस झालेली असते आणि तो प्रसंग आठवून आज सुद्धा माझी घाबरगुंडी उडालेली असते!”