बाप्पाची संगीतसेवा
झी मराठीवरील सा रे ग म प लिट्ल चॅम्प्स पर्वाने इतिहास घडवला. याच पर्वातून आपल्या लक्षात राहिलेली गायिका म्हणजे शमिका भिडे. शमिका मूळची कोकणातील. तिला ‘कोकणकन्या’ सुद्धा म्हटलं जात होतं. ती म्हणते, “माझ्या माहेरी पाच दिवसांचा गणपती असतो. खड्याच्या गौरी सुद्धा असतात. सर्व जण एकत्र असतो. एकत्र आरती, बाप्पासाठी प्रसाद करणे खूप प्रसन्न वातावरण असतं. आता लग्नानंतर मी पुण्यात राहते. आमच्या पुण्याच्या सोसायटीत सुद्धा सार्वजनिक गणपती आहे. सरकारी नियम पाळून यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. किल्ल्यांची सजावट सुद्धा येथे केली आहे.
मात्र सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. यावर्षी या कोरोना च्या सावटामुळे माहेरी जाता नाही आले, ही खंत मात्र मनात आहेच. रत्नागिरीच्या गणेशोत्सवातून लहानपणापासून मी स्पर्धेत भाग घेत आले आहे, गाणे सादर केले आहे. सा रे ग म प नंतर अनेक ठिकाणी कार्यक्रमांच्या संधी मिळत गेल्या.
मला आठवतंय एक दोन वर्षांपूर्वी मुंबईत नानाचौकातील शास्त्रीहॉल या वसाहतीत माझा आणि प्रथमेश लघाटे याचा गायनाचा कार्यक्रम होता. शास्त्रीहॉल मधील वातावरण आणि मुख्य म्हणजे पारंपरिक देव्हाऱ्यात श्री. गजाननाची केलेली स्थापना आणि मूर्तीसमोर कला सादर करायला मिळणे, हे मला खूप आवडलं. समोर श्री गणरायांचे दर्शन आणि सुजाण प्रेक्षकवर्ग या गोष्टींमुळे तो गाण्याचा कार्यक्रम खूप रंगला होता. हे मला अजूनही आठवते. अनेक ठिकाणी बाप्पाच्या आरतीसाठी सुद्धा बोलावले होते. सार्वजनिक श्री गणेशोत्सवातील या आठवणी लक्षात रहातात.”