Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bimal Roy : ‘बंदिनी’च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भावस्पर्शी किस्सा!
दिग्दर्शक बिमल रॉय यांची बॉलीवूड मधील रुपेरी कारकीर्द तशी खूपच छोटी. उणीपुरी चौदा-पंधरा वर्षांची. पण या अतिशय कमी कालखंडामध्ये उत्तम उत्तम चित्रपट रसिकांसाठी सादर केले.दो बिघा जमीन,देवदास,मधुमती,सुजाता…. त्यांचा शेवटचा चित्रपट होता १९६३ साली प्रदर्शित झालेला ‘बंदिनी’. हा चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासात अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असा आहे. बंगाली अभिजात साहित्यातील एका श्रेष्ठ साहित्यरचनेवर या चित्रपटाची निर्मिती झाली होती.

‘तामसी’ नावाची हि कादंबरी लिहिली होती जरासंध यांनी. जरासंध स्वतः उत्तर बंगालमध्ये तुरुंग अधिकारी होते. त्यांच्या अनेक सत्य कथांवर बंगाली साहित्यामध्ये कलाकृती बनल्या आहेत. ‘बंदिनी’ या चित्रपटांमध्ये एका गुन्हेगार कैदी महिलेचं भावविश्व, तिचं शापित जीवन फार अप्रतिमरीत्या चितारले होते. चित्रपट नायिका प्रधान होता आणि हि भूमिका नूतन ने साकारली होती. तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर बिकाश(अशोक कुमार) आणि जेल मधील डॉक्टर (धर्मेंद्र) यांच्यातील अतिशय नाजूक संबंध या चित्रपटात दाखवले होते. स्त्री मनाची तडफड, तगमग फार सुंदर रीतीने बिमल रॉय यांनी या चित्रपटात दाखवली होती. चित्रपटाचा कालखंड हा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे.

या चित्रपटांमध्ये आशा भोसले यांच्या स्वरात ‘अब के बरस भेज भैया को बाबुल….’ ही अतिशय काळजाला पिळवटून टाकणारी रचना होती. या गीताच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला गायिका आशा भोसले यांच्या स्वरात गाण्यातील दुःखाची भावना, तो दर्द, ती सल काही येता येत नव्हती. शैलेन्द्र यांची हि रचना स्त्री मनाचे दु:ख सांगणारी होती. गाण्याचे ध्वनीमुद्रण खोळंबले. बर्मनदा अचूक इफेक्ट आल्याशिवाय रेकोर्डिंग करणार नाहीत हे सर्वाना ठावूक होते. शेवटी सचिनदा यांनी यांनी एक युक्ती केली आणि गाण्यातील दर्द आशाच्या स्वरात ओथंबून वाहू लागला! काय होती ती युक्ती? आणि कशा प्रकार बर्मन दा यांनी हे गाणं आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतलं?
हे गाणं शैलेंद्र यांनी लिहिलं होतं. हे गाणे लिहिण्याच्या मागे सुद्धा एक छोटी स्टोरी आहे. या चित्रपटाच्या वेळेलाच शैलेंद्र त्यांच्या ‘तिसरी कसम’ या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त होते. ‘तिसरी कसम’ ची कथा लिहिली होती फणीश्वरनाथ रेणू यांनी. त्या काळात ते मुंबईतच राहत होते. एकदा फणीश्वरनाथ रेणू आणि शैलेंद्र गप्पा मारत असताना रेणू यांनी “ बिहारमध्ये लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला श्रावणामध्ये माहेरी बोलवलं जातं हा एक रिवाज आहे असे सांगितले. पण कधी कधी या मुलींना बोलावलं जात नाही. यावर एक बिहारमध्ये चांगले लोकगीत आहे. ज्यामध्ये ती मुलगी आपल्या वडिलांना सांगते,” मागच्या वर्षी तुम्ही मला श्रावणात बोलावलं नव्हतं. यावर्षी मात्र तुम्ही मला नक्की बोलवा!” विवाहित मुलीची माहेरकडे असलेली ओढ ऐकून फनिश्वरनाथ रेणू यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते शैलेंद्र यांना म्हणाले ,” ते लोकगीत मला आता आठवत नाही पण ‘निंबुवा तले डोली रख दे मुसाफिर’ अशा ओळी होत्या.” शैलेंद्र तर खूपच संवेदनशील कवी. रेणू यांचे हे ऐकून तेथे रडायलाच लागले. संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्या भावना एका गाण्यात लिहून काढल्या. गाणं होतं ‘अबके बरस भेज भैया को बाबुल….’

दुसऱ्या दिवशी रेणू यांना ते गाणं त्यांनी दाखवलं. त्यांना ते गाणं खूप आवडलं. त्यांना वाटलं आपल्या ‘तिसरी कसम मध्ये गाणं घ्यावे परंतु गीतकार शैलेंद्र यांनी हे गाणं ‘बंदिनी’ या चित्रपटासाठी लिहिलं आहे असं सांगितलं. नंतर काही दिवसांनी त्यांनी हे गाणं सचिन देव बर्मन आणि बिमल रॉय यांना दाखवलं. दोघांनाही गाणं खूप आवडलं. सचिन दा यांनी गाण्याची चांगली ट्यून बनवली आणि हे गाणं आशा भोसले यांच्या स्वरात जाऊन घ्यायचे ठरवलं.
================================
हे देखील वाचा: अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
=================================
रेकोर्डिंगला जेव्हा आशा आली तेव्हा तिच्या स्वरामध्ये गाण्यात अपेक्षित असलेला दर्द उमटत नव्हता. तेव्हा सचिनदा यांनी तिला असे सांगितले,” आशा तू तो आता काळ आठव जेव्हा घरातून पळून जाऊन तू गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं होतंस. घरच्यांनी तुझ्यावर बहिष्कार टाकला होता. सासरला तुझा छळ होत होता. त्यावेळेला तुला माहेरची आठवण येत होती. तू गरोदर होतीस. माहेर तुटलं होतं. तुला बाहेर जाता येत नव्हते. ते दु:ख ,त्या यातना आठव. आणि गा.” हे ऐकून आशा भोसले सद्गतीत झाल्या त्यांना तो संपूर्ण काळ आठवला आणि त्या भावनेतच त्यांनी हे दर्दभरे गाणं रेकॉर्ड केलं! सचिनदा यांना हव्या असलेल्या दर्द च्या भावना गाण्यात परफेक्ट उमटल्या होत्या!