‘काळी दिवाळी’ आणि तीदेखील फिल्मवाल्यांची? आश्चर्य!
आपली फिल्मी दुनिया म्हणजे फुल्ल अॅण्ड फायनल “एन्टरटेन्मेन्ट + एन्टरटेन्मेन्ट + एन्टरटेन्मेन्ट” अशी पक्की मजबूत इमेज आहे. कोणी कितीही म्हटले की, अनेक कला (मेकअपपासून सेट लावण्यापर्यंत) आणि विज्ञान (तांत्रिकता आणि त्यातील प्रगती) यांची केमिस्ट्री म्हणजे चित्रपट माध्यम तर ही व्याख्या पुस्तकी मानली जाईल.
खरं तर तसेच म्हटले जाते. फिल्मी दुनिया म्हणजे खूप खूप पैसे असलेल्या व्यवसायात प्रचंड प्रचंड आर्थिक उलाढाल असा एक सगळीकडेच समज आहे. मोजता येतील इतकेच बडे स्टार, अनेक प्रकारचे अगणित तंत्रज्ञ आणि केवढे तरी कामगार म्हणजे खरं तर ‘सिनेमाचे जग’ हे वास्तव समाजाच्या मनावर ठसवता आले नाही.(का बरे?) आणि आता त्यात बदल करणं शक्य नाही.(ती भाबडी आशा ठरेल).
आज थिएटर बंद असली तरी ओटीटी प्लॅटफॉर्म आहेच की, असे म्हणतच पुन्हा पुन्हा येथील कलाकारापासून कामगारापर्यंत सगळ्यांचे बौद्धिक आणि शारीरिक श्रम दुर्लक्षित केले जातात. दुर्दैव दुसरे काय?
हेही वाचा : शोले (१९५३)
अशा सकारात्मक व्यवसायात ‘काळी दिवाळी’ कसे बरे शक्य आहे असा तुमचा प्रश्न असेल. पण १९८६ साली खरंच तसं घडलयं. मी त्यावेळी मिडियात साधारण नवीन होतो आणि एव्हाना नवशक्तीत रिपोर्टीग विभागात असतानाच १० ऑक्टोबर १९८६ रोजी चित्रपटसृष्टीने महाराष्ट्रव्यापी बंद पुकारला. आजच्या काळातील ती ‘ब्रेकिंग न्यूज’च! शूटिंगपासून सिनेमा रिलीजपर्यंत सबकुछ बंद. म्हणजे, स्टुडिओ, शूटिंगचे बंगले, लहान मोठे इव्हेन्टस, सिनेमा थिएटर, पार्ट्या वगैरे वगैरे सगळेच बंद.
या बंदचे कारण काय? तशी कारणे अनेक आहेत, पण दोन कारणे महत्वाची होती. एक म्हणजे, व्हीडीओ चोरीला राज्य सरकारने आळा घालावा (१९८२ च्या एशियाडच्या वेळी देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओचे आगमन झाले आणि मग आजच रिलीज झालेला चित्रपट आजच संध्याकाळपर्यंत चोरट्या पावलांनी व्हीडीओ कॅसेट रुपात येऊ लागला. हे वाढलं तर थिएटरमध्ये येणार कोण हा प्रश्न पडला.) आणि दुसरी मागणी होती, राज्य शासनाने करमणूक करात कपात करावी. त्यामुळे तिकीट दर कमी होतील. (तेव्हा दक्षिण मुंबईतील मेन थिएटरमध्ये अप्पर स्टाॅल सात रुपये तर बाल्कनी आठ रुपये असे तिकीट दर होते. उपनगरात अर्थात कमी कमी होत गेले.)
मागण्या रास्त होत्या तरी ‘सबकुछ बंद ‘ हे आश्चर्यच होते. हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीही या बंदमध्ये सामिल होतीच. चित्रपटसृष्टीतील सर्वच्या सर्व वीसेक संघटना या बंदमध्ये सामिल होत्या. वादक संघटनापासून ज्युनिअर आर्टिस्ट सप्लायर असे सगळेच बंदमध्ये सामिल झाले. त्यांच्याही लहान मोठ्या मागण्या होत्याच.
यावेळच्या तीन आठवणी आवर्जून सांगायला हव्यात.
गिरगावातील ऑपेरा हाऊस थिएटर ते राजभवन असा याच फिल्मवाल्यांचा पायी मोर्चा. ( नेहमीच आलिशान गाडीतून फिरणारे फिल्मवाले रस्त्यावर उतरून चालत मोर्चा? असे तेव्हा एक व्यंग्यचित्र आले होते.)
गिरगाव चौपाटीवरची सभा. त्यात अनेक हीरोनी भाषणापेक्षा डायलॉगबाजीच जास्त केली आणि टाळ्या वसूल केल्या.
हे वाचले का ? अमिताभ अक्षरश: रडकुंडीला आला!
तिसरी गोष्ट म्हणजे, पेडर रोडवर मोर्चा. यात ट्रकही होते आणि त्यात बडे बडे स्टारही होते.
या तीनहीचे रिपोर्टीग मी अतिशय रंगवून खुलवून केले, पण ते करताना माझ्या लक्षात आले की, मूळ प्रश्न बाजूला पडून ही एक प्रकारची शोबाजी तर झाली नाही? अगणित बघ्याना पडद्यावरचे स्टार प्रत्यक्षात पाह्यला मिळाले, पण समाजासमोर चित्रपटसृष्टीची समस्या पोहचली का? संपूर्ण मिडियात तेव्हा ‘वेगळ्या प्रकारे कलरफुल कव्हरेज’ मिळाले. चॅनल येण्यापूर्वीचा तो काळ होता, अन्यथा या स्टारच्या किती मुलाखती नि किती काय काही विचारू नका. विशेष म्हणजे या सगळ्यात कलाकारांनी प्रामुख्याने सफेद अथवा काळे कपडे परिधान केले होते. आपल्या मागण्या मान्य केल्या जाव्यात म्हणून आणि निषेध म्हणूनही काळे कपडे परिधान केले होते. आणि अशातच दिवाळी आली आणि पेच निर्माण झाला. बंद तर मागे घेता येत नव्हता. डबिंगपासून रेकाॅर्डिंगपर्यंत आणि पब्लिसिटीपासून प्रेस शोपर्यंत सगळेच ‘टोटल बंद’ होते, अशातच दिवाळी कशी साजरी करणार? म्हणून ती काळी दिवाळी म्हटले गेले.
चित्रपटसृष्टीच्या मागण्यांसाठीच्या या घडामोडीत चित्रपती व्ही. शांताराम, लता मंगेशकर, दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेश खन्ना असे अनेक मान्यवर आवर्जून सहभागी झाले होते. चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत यांचा अतिशय मोलाचा आणि प्रामाणिक वाटा आहे. यांनी आपली प्रतिभा, मेहनत, निष्ठा अशा अनेक गुणांनी चित्रपटसृष्टीला बरेच काही दिले आहे. याच मान्यवरांचे एक शिष्टमंडळ राज्य शासनाकडे गेले असते तर नक्कीच प्रभाव पडला असता, समस्यांचा काही विचार झाला असता. तसे न करता, “शांतता! चित्रपटसृष्टी बंद आहे” असा पवित्रा घेऊन काय साध्य झाले? रेखा अपेक्षेप्रमाणे यात सामील झाली नाही. श्रीदेवी, जयाप्रदाने दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात भूमिका साकारणे सुरु ठेवले. तर काही हिंदी चित्रपटांचे विदेशात शूटिंग सुरू होते. बंद इकडे होता हो.
त्यावेळी लोकसभेत तीन बडे स्टार खासदार होते. सुनील दत्त (वायव्य मुंबई), वैजयंतीमाला (दक्षिण चेन्नई) आणि अमिताभ बच्चन (इलाहाबाद) हे इंदिरा काॅग्रेसचे उमेदवार म्हणून भारी वोटोसे जिंकून आले होते आणि त्यांना चित्रपटसृष्टीच्या समस्यांची उत्तम जाण होती. बंदमध्ये पुढाकार घेतलेले ही गोष्ट नेमके का विसरले? त्यांच्याकडे म्हणजे आपल्या माणसांकडे न जाता येथे सगळे व्यवहार ठप्प झाले. अखेर, १० नोव्हेंबर रोजी, म्हणजे बंदला एक महिना होताच खासदार अभिनेते सुनील दत्त व अमिताभ बच्चन यांच्या पुढाकाराने राज्य शासनाशी संवाद साधला आणि एकदाचा हा ‘शो’ संपला. आणि याप्रित्यर्थ १२ डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर संपूर्ण चित्रपटसृष्टीचा ‘होप्स 86’ हा महामनोरंजनाचा जंगी कार्यक्रम आयोजित केला गेला.
महिनाभरच्या बंदने चित्रपटसृष्टीचे प्रश्न खरंच सुटले का?
तर अजिबात नाही. आजच रिलीज झालेला चित्रपट आजच रात्री चोरट्या मार्गांनी तेव्हा व्हिडिओ कॅसेट रुपात येई, आता तो मोबाईल स्क्रीनवर येतो अगदी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटाचीही काॅपी होते.
आणि तिकीट दराचे म्हणाल तर, सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ ( १९९१) साठी मेट्रो थिएटरमध्ये बाल्कनी तिकीट दर पंचवीस रुपये होता ( म्हणजे तुलनेत जास्त) म्हणून महाराष्ट्र टाईम्सने त्याची पहिल्या पानावर बातमी केली. आणि अवघ्या काही वर्षातच सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ ( १९९४) ने लिबर्टी थिएटरमध्ये रविवारी तिकीट दर शंभर रुपये ठेवूनही उच्चभ्रू आणि नवश्रीमंत वर्गाला त्याचे काहीच गैर वाटलं नाही. मल्टीप्लेक्स युगातील तिकीट दर आपणास ठाऊक आहेतच.
खरं तर ‘सिनेमाचे जग ‘ म्हणजे फक्त आणि फक्त लफडी कुलंगडीचे गाॅसिप्स, फॅशनेबल ड्रेस आणि फोटो सेशनचे ग्लॅमर, चित्रपट निर्मिती आणि कमाईचा भला मोठा आर्थिक आकडा आणि गोडधोड मुलाखती यांची केमिस्ट्री असे अजिबात नाही. ते तसे ‘दिसतेय’ हा केवळ ‘रिअॅलिटी शो’ आहे. येथे कमालीचे चढ उतार, असुरक्षितता, तणाव, दुःख, आर्थिक/मानसिक फसवणूक, वेदना, दमछाक हेदेखील कुठे कुठे कमी जास्त प्रमाणात नक्कीच आहे. पण ते ‘दिसत’ नाही, जरी ते ‘दिसले’ तरी त्याला न्यूज व्हॅल्यू नाही. आणि जरी त्यावर ‘फोकस’ टाकला तरी प्रेक्षकांची सहानुभूती नाही.
म्हणूनच, १९८६ सालची सिनेमावाल्यांची काळी दिवाळी अनेकांना आश्चर्य वाटते. ते खूपच मोठे वास्तव होते हे तेव्हाच्या अनेक गोष्टींच्या आकडेवारीतून स्पष्ट होत होते. पण ‘वलयाच्या वर्तुळातील चित्रपटसृष्टी’तील भावनिक चढउतार आणि बरेच काही ना काही असतेच हे पाह्यला कोणी इच्छुक नाही. तेव्हाच्या माझ्या रिपोर्टीगमध्ये मी हे सगळे मांडले. आज ३४ वर्षानंतर तर हीच चित्रपटसृष्टी ग्लोबल युगातील बहुरुपी मनोरंजक क्षेत्र झाले असून ‘सिनेमाचे जग म्हणजे रोजच दिवाळी’ असे येता जाता सहज कोणीही म्हणते अशी समाजाच्या मनात प्रतिमा एस्टॅब्लिज झाली आहे… तेव्हाची काळी दिवाळी माझ्यासाठी फ्लॅशबॅक आहे इतकेच.