Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण?

Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना

Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार

Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते

Bahubali Movie :१० वर्षांनी पुन्हा एकदा ‘बाहुबली’ एका ट्विस्टसह भेटीला

राजेश खन्ना यांच्या ‘या’ सिनेमाच्या मुहूर्ताची क्लॅप Amitabh Bahchan यांनी

Genelia Deshmukh : ‘सितारे जमीन पर’ नंतर तिच्याच सुपरहिट चित्रपटाच्या

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

कॅपिटॉलचा शनिवार दुपारचा शो हमखास हाऊसफुल्ल

 कॅपिटॉलचा शनिवार दुपारचा शो हमखास हाऊसफुल्ल
टॉकीजची गोष्ट

कॅपिटॉलचा शनिवार दुपारचा शो हमखास हाऊसफुल्ल

by दिलीप ठाकूर 18/11/2022

एखाद्या चित्रपटगृहातील जवळपास प्रत्येक शनिवारी दुपारी तीन व सायंकाळी सहाचा शो हमखास हाऊसफुल्ल व्हायचाच, असे मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच सांगितल्याने तुमचे दोन प्रश्न असतील, असे वेगळेच वैशिष्ट्य असलेले चित्रपटगृह कोणते आणि हमखासपणे शनिवारी हाऊसफुल्ल गर्दी का होत असे? असे चित्रपटगृह होते, कॅपिटॉल(Capitol Theatre). रसिकांच्या किमान दोन पिढ्यांतील चित्रपट रसिकांसमोर एव्हाना हे थिएटर डोळ्यासमोर आले असेलच. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या (पूर्वीचे नाव व्हीक्टोरिया टर्मिनल. अर्थात व्ही. टी.) बरोबर समोर हे थिएटर आजही आहे. पण आता तेथील ‘खेळ बंद होऊन काही वर्षे झाल्याने ती सव्वाशेपेक्षा जास्त वय वर्षाची इमारत निस्तेजपणे उभी आहे’ इतकेच. शांत असली तरी ती लक्ष वेधते. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर ती आहे असेही म्हणता येईल.

अतिशय जुन्या मुंबईची ओळख असलेली ही वास्तू लक्षवेधक आहे. आपल्या देशात चित्रपट माध्यम व व्यवसाय रुजत असताना मुंबईत एकेक करत नवीन चित्रपटगृह जन्माला आले त्यातील हे एक. अधिक तपशील मिळवता असता समजले की, ही मजबूत इमारत १८७९ साली बांधण्यात आली, ही हेरिटेज वास्तू आहे. कुनवरजी पघटीवाला यांनी ती त्या काळानुसार व्हीक्टोरियन कल्चरची ठेवण अशी ही वास्तू उभारली आणि शनिवार व रविवारी येथे एकाद्या मराठी, गुजराती अथवा इंग्लिश नाटकाचा प्रयोग होत असे आणि ते तेवढे पुरेसेही असे. काही वर्षांनी म्हणजे २८ जानेवारी १९२८ रोजी रंगमंचाचे रुपांतर चित्रपटगृहात केले. अर्थात आता ‘पडदा’ आला आणि देश विदेशातील मूकपट येथे प्रदर्शित होऊ लागले. १९२९ साली सिधवा कुटुंबाने कॅपिटल थिएटर विकत घेतले. काही वर्षातच ‘आपल्या देशात चित्रपट बोलू लागला..’ जनसामान्यांपर्यंत चित्रपट पोहचवायचा तर चित्रपटगृह हवीत ही स्वाभाविक भावना होतीच आणि शंभर वर्षांपूर्वीची मुंबई ही जेमतेम सायन वांद्रे येथपर्यंतचीच होती आणि त्यात कसलीही दाटीवाटी नव्हतीच. इंग्रजकालीन दक्षिण मुंबई हा शहर रचना अभ्यासक्रमाचा आणि इतिहासाचा सखोल वेध घेण्याचा वेगळाच विषय आहे आणि त्यात ही त्या काळातील चित्रपटगृह देखील, ती वास्तू अनेक दृष्टीने महत्वाची.

कॅपिटॉल हे अगदीच मोक्याच्या ठिकाणी, जवळच एम्पायर होते. (कालांतराने ते न्यू एम्पायर झाले, तेही बंद झालय.) तुलनेत स्टर्लिंग खूपच उशिरा म्हणजे आजच्या काळाचा विचार करता पन्नास वर्षांपूर्वी सुरु झाले. न्यू एक्सलसियर हे पूर्वीचे एक्सलसियर. अगदी फार पूर्वी त्याचे नाव नाॅव्हेल्टी होते. एकंदरीत ‘सिनेमा थिएटर पार्क’ म्हणावा असाच स्पाॅट कॅपिटॉलला (Capitol Theatre)सुरुवातीला सातत्याने इंग्लिश चित्रपट प्रदर्शित होत. मग हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. कधी एखाद्या आठवड्यात एखादा दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित होई. (एकदा ‘हर नाईट्स ‘ या चित्रपटाच्या पोस्टरवरुन वादही झाला.) कधी कधी रविवार सकाळी नऊ वाजता असाच एखादा साऊथ इंडियन फिल्म असे.

येथील चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रथा वेगळीच. खरं तर हा रविवार व सुट्टीचा दिवस वगळता कायमच प्रचंड रहदारीचा, गजबजलेला, गर्दीचा विभाग. याचे कारण अर्थातच पूर्वापार येथे अनेक प्रकारची अक्षरश: असंख्य लहान मोठी सरकारी आणि खाजगी कार्यालये. येथे नागरी वस्तीही आहे. तात्पर्य, कॅपिटॉलला लोकप्रिय चित्रपटाला लाॅन्ग रनला म्हणजे रौप्यमहोत्सवी यशाला पूरक वातावरण. पण तरीही येथे असंख्य नवीन चित्रपट एक अथवा दोन आठवड्यांसाठी प्रदर्शित होत. मधूनच त्या दिवसातील एखादा सुपर हिट चित्रपट एका आठवड्यासाठी येई.

मी मिडियात आल्यावर या गोष्टीचा शोध घेतल्यावर समजले, अगदी सुरुवातीपासूनच चित्रपट वितरकांनी कॅपिटलकडे(Capitol Theatre) ‘शाॅर्ट टर्म’ म्हणूनच पाहिले. कुलाबा, बोरीबंदर परिसरातील डिफेन्स, स्ट्रॅन्ड, कॅपिटल, रेक्स ही थिएटर्स मेन थिएटरला सपोर्ट सिस्टीम मानली गेली. म्हणजेच नाझ परिसरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होत असलेला चित्रपट येथेही प्रदर्शित केला जाऊ लागला आणि मग वर्षांनुवर्ष तेच सुरु राहिले. कॅपिटॉलला मस्ताना, हाथी मेरे साथी, जिंदगी जिंदगी, वाॅरंट, पत्थर और पायल असे अनेक चित्रपट मेन थिएटरसह रिलीज झाले.

मी गिरगावात राहत असल्याने मला कॅपिटॉल(Capitol Theatre) अनेकदा फळले. नाझ, ड्रीमलॅन्ड, नाॅव्हेल्टी, मिनर्व्हा इत्यादीत अनेक सुपर हिट चित्रपटांची तिकीटे आगाऊ तिकीट खिडकीवरही मिळणे दिव्य असे. पण कॅपिटॉलला मधल्या वारी लवकर गेल्यावर तिकीट मिळण्याची हमी असे. गंगा थिएटरला ‘मि. नटवरलाल’ साठी जाण्यापेक्षा कॅपिटॉल बरे पडे. सत्तरच्या दशकात गिरगावातून ६१, ६५, ६६, ६९, १२६ या क्रमांकापैकी कोणतीही बस पकडून दहा पैसे तिकीटात कॅपिटॉलला जाता येई. पिक्चर संपल्यावर चालत यायलाही काहीच वाटत नसे. सुहाग, वो मै नही, घर, धरम करम, सबसे बडा रुपय्या वगैरे अनेक चित्रपट असेच पाहिले. नाझला एन्जाॅय केलेला ‘यादों की बारात’ मध्येच एक आठवड्यासाठी कॅपिटॉलला लागला तेव्हा पुन्हा एन्जाॅय केला.

======

हे देखील वाचा : अनिल कपूरच्या अनप्रोफेशनल अप्रोचवर प्रचंड नाराज…

======

मिडियात आल्यावर कॅपिटॉलला(Capitol Theatre) जाणे कमी होत गेले तरी प्रेस शोला आवडलेले असे ‘दिल’, ‘हत्यार’ पुन्हा याच कॅपिटॉलला पाहिले. कॅपिटॉलला समोरच्या बाजूने करंट बुकिंगची खिडकी आणि इमारतीच्या डाव्या बाजूस आगाऊ तिकीट खिडकी. पण तिकीट काढताना अप्पर स्टाॅलचे अगदी शेवटच्या दोन रांगेतील तिकीट नकोसे वाटे. कारण बाल्कनीच्या बरोबर खालीच ते असल्याने भले मोठे खांब दुर्लक्षित करुन पडद्यावर लक्ष केंद्रित करावे लागे. तोही अडथळा पब्लिकने सहन केला.

दक्षिण मुंबईतील अनेक कार्यालये पूर्वी शनिवारी अर्धा दिवस असत आणि अगदी विरार, डोबिंवली, नवी मुंबई असे सगळीकडचे नागरिक वर्षानुवर्ष या परिसरात नोकरी आणि मिटींगसाठी येत आहेत. अनेकांना शनिवारी अर्धा दिवस ऑफिस सुटताच कॅपिटॉलला पिक्चर पाहून समोरच लोकल ट्रेन पकडून घरी जायला सवयीचे झाले होते. एकाच फेरीत दोन कामे होत. या विभागात एकाद्या मिटींगसाठी आल्यावर येथेच एखादा चित्रपट पाहणारे फिल्म दीवाने खूप होते. दक्षिण मुंबईत अनेक काॅलेज असल्याने तोही क्राऊड कॅपिटॉलला लाभे. पिक्चरच्या मध्यंतरला थिएटरला लागूनच आराम वडापाव होताच. हुकमी गरमागरम. आजही तो आहेच म्हणा आणि पिक्चर संपल्यावर उजव्या बाजूच्या इराणी हाॅटेलमध्ये कटींग चहा आणि ब्रून मस्कासह त्याच पिक्चरवर भरपेट चर्चा, ते दिवसच वेगळे होते. हा इराणी काही वर्षांपूर्वी बंद झाला, कॅपिटॉलही बंद झाले, शांत झाले. या परिसरात गेल्यावर हमखास ते नजरेत पडते आणि जुने पिक्चर आठवतात. अधूनमधून याच कॅपिटॉलमध्ये ‘पिक्चरचे शूटिंग ‘ झाले. फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ मधील थिएटर हेच आहे. शाहरुख खान, दीपिका पादुकोन यांच्यावरील काही दृश्ये येथेच चित्रीत झालीत.

यामुळे सिनेमाच्या पडद्यावर कॅपिटॉल राहिलयं, पण प्रत्यक्ष कॅपिटॉलमधील शो केव्हाच संपलाय. जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांची चित्रपटगृहाशीही बांधिलकी होती. भावनिक ओढ होती, म्हणूनच एकेक करत जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एक पडदा चित्रपटगृहे बंद होत गेल्याने अनेक फिल्म दीवाने हळहळतात. चित्रपटगृह म्हणजे केवळ चार भिंती नसतात तर ते अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींचे विश्व असते, अनुभव असतो. पडद्यावर चित्रपट सुरु असतो, प्रेक्षक आपापल्या आवडीनुसार तो त्याच पडद्याशी एकरुप झालेला असतो, टाळ्या, शिट्या, हंशा याने तो दाद देतो.

दिलीप ठाकूर

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Celebrity Entertainment Featured
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.