ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
देव आनंदच्या सिनेमाला सेंसर बोर्डाने सुचवले ७२ कट्स…
भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मधील सुपरस्टार देव आनंद यांना १९९२ साली फिल्मफेअरचा लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला. हा पुरस्कार त्यांना लता मंगेशकर आणि सिमी गरेवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यामुळे बोलताना देव आनंद यांनी आपण लवकरच सिनेमा निर्मितीच्या प्रश्नावर एक चित्रपट निर्माण करणार आहोत असे जाहीर केले. (Dev Anand)
याचे कारण १९५१ सालापासून देव आनंद चित्रपट निर्मिती सोबतच अभिनय आणि दिग्दर्शनात कार्यरत होते. चित्रपट तयार करताना येणाऱ्या प्रश्नांवर त्यांना बरंच काही सांगायचं होतं. त्यामुळे कदाचित त्यांनी हा विषय रुपेरी पडद्यावर आणायचे ठरवले. देव आनंद हे कायम काळाच्या पुढचा विचार करणारे कलावंत होते तो भूतकाळात कधीच रमत नव्हता. कायम त्याचे लक्ष उद्यावर असायचे. फिल्मफेअर अवॉर्ड सेरेमनी मध्ये त्यांनी हे जाहीर केले खरे पण प्रत्यक्षात हा चित्रपट यायला पुढची आठ वर्षे लागली.
या दरम्यान त्याचा ‘प्यार का तराना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या दशकात देव ने ‘प्यार का तराना’ च्या पाठोपाठ ‘गँगस्टर’ आणि ‘मै सोलह बरस की’ हे चित्रपट निर्माण आणि दिग्दर्शित केले. याच काळात त्याचा ‘रिटर्न ऑफ ज्वेल्थ थीफ’ हा चित्रपट देखील आला होता. अर्थात या सिनेमांमध्ये त्याने फक्त अभिनय केला होता. (Dev Anand)
सिनेमा निर्मितीच्या प्रश्नावरील चित्रपट निर्माण करताना त्याने सेंसर बोर्ड हा विषय डोक्यात ठेवला होता. याच विषयाला डेव्हलप करीत त्यांनी २००१ साली ‘सेन्सॉर’ हा चित्रपट निर्माण केला. या सिनेमात देव आनंद सोबत हेमामालिनी, रेखा, शम्मी कपूर, जैकी श्रॉफ, अमरीश पुरी, ममता कुलकर्णी, गोविंदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्या अर्थाने हा मल्टीस्टार सिनेमा होता. सिनेमाची कथानक तसे बकवासच होते पण हा चित्रपट निर्माण झाल्यानंतर सेन्सर बोर्डामध्ये तो अडकला. सेंसर बोर्डाने त्याला तब्बल ७२ कट्स सुचवले.
देव आनंदसाठी हा फार मोठा धक्का होता. त्यावेळी सेन्सर बोर्डाच्या चेअर पर्सन आशा पारेख होत्या. आशा पारेख सोबत देवने साठच्या दशका मध्ये ‘जब प्यार किसीसे होता है’(१९६१) आणि ‘महल’(१९६८) या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. या दोघांमध्ये खूप चांगले संबंध होते. देव आनंद ने थेट चेअर पर्सन यांची अपॉइंटमेंट मागितली आणि तब्बल तीन ते चार तास दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. देव आनंदने हर तऱ्हेने आपल्या सिनेमातील सेन्सर बोर्डाने सुचवलेल्या कट्सवर आक्षेप घेतला आणि ते कसे योग्य आहेत हे नीट समजावून सांगितले. बदललेल्या काळानुसार सेन्सर बोर्डाला देखील बदलावेच लागेल हा त्याचा आग्रह होता. ‘आज तुम्ही पन्नास वर्षांपूर्वीचे नियम लावू शकत नाही’ हा त्याचा मुद्दा होता. अखेर देव आपल्या मुत्सद्देगिरी मध्ये जिंकला आणि जिथे सेन्सर बोर्डाने ७२ कटस सुनावले होत सुचवले होते तिथे त्या कटस ची संख्या फक्त सहा झाली. (Dev Anand)
देवआनंद खुश झाला ६ एप्रिल २००१ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण दुर्दैवाने हा चित्रपट एक आठवडा देखील थिएटरमध्ये चालला नाही कारण आधी म्हटल्याप्रमाणे चित्रपटाची कथानकच बकवास होते. लॉजिकचा काहीच पत्ता नव्हता. फक्त मोठे स्टार्स होते या सिनेमात. खरं तर देव आनंद ला शबाना आजमी ला साईन करायचे होते कारण १९७४ साली आलेल्या ‘इश्क इश्क इश्क’ या सिनेमातून शबाना पहिल्यांदा हिंदी सिनेमात आली होती. पण तिच्या तारखा बुक असल्याने रेखाला हा रोल मिळाला.
===========
हे देखील वाचा : दिलीपकुमारने नाकारलेल्या भूमिकेचा होतोय त्यांना पश्चाताप
===========
त्याचप्रमाणे ‘प्रेम पुजारी’ (१९७०) या चित्रपटात देव ने अमरीश पुरी ला एक छोटासा रोल देऊन त्याचा रुपेरी प्रवेश घडवून आणला होता. पुढे दहा वर्षानंतर अमरीश पुरी नंबर एकचे खलनायक बनले. ‘स्वामी दादा’(१९८२) या चित्रपटात खरंतर देवला अमरीश पुरीला साइन करायचे होते परंतु त्याने अव्वा च्या सव्वा किंमत मागितल्यामुळे त्या जागी कुलशन खरबंदा यांची निवड झाली. परंतु नंतर अमरीश पुरी यांना पश्चाताप वाटला. आणि देव आनंदला त्यांनी तसे कळवले आणि ‘यापुढे तुम्ही जी भूमिका सांगाल आणि जेवढे पैसे द्याल त्यात मी काम करायला तयार आहे’ असे सांगितले. हा योग जुळून यायला देखील पुढची वीस वर्षे जावी लागली. आणि ‘सेंसॉर’ या चित्रपटांमध्ये अमरीश पुरी यांची एन्ट्री झाली. या चित्रपटामधली काही गाणी नीरज यांनी लिहिली होती. (Dev Anand)
नीरज यांनी देखील तब्बल ३० वर्षानंतर देव सोबत काम केले. यापूर्वी त्यांनी ‘प्रेम पुजारी’ आणि ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाची गाणी लिहिली होती. या सिनेमाला संगीत जतिन ललित यांचे होते. चित्रपटाच्या कथानकातच अजिबात दम नसल्यामुळे तिकीट बारीवर चित्रपटाने दम तोडला पण देव आनंद याला चित्रपटाच्या अपयशाचे काहीच वाटले नाही त्याने त्याच्या पुढच्या सिनेमाची निर्मिती सुरू केली. यानंतर २००३ साली ‘लव अट टाइम स्क्वेअर’ आणि २००५ साली ‘ मिस्टर प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा बनवला. आणि देवाचा अखेरचा सिनेमा चार्जशीट २०११ साली प्रदर्शित झाला.