ब्लॉग: चित्रपटांवरून होणारे वाद तेव्हा आणि आत्ता (Controversial Movies)
हैद्राबादच्या पद्मालय फिल्मचा राजेन्द्रसिंग बाबू दिग्दर्शित ‘मेरी आवाज सूनो (१९८१)’ प्रदर्शित झाला तोच, “या चित्रपटावर लवकरच बंदी येणार (अथवा बंदी येण्याची दाट शक्यता आहे)”, अशा खळबळजनक वृत्ताने! (Controversial Movies).
फिल्मी साप्ताहिके तर झालीच, पण दैनिकातही अशी वृत्ते प्रसिद्ध होऊ लागली. त्यामुळे तर असं खरंच होऊ शकतं, असा विश्वास वाढू लागला. पण ही बंदी का? तर या चित्रपटात अक्षरशः प्रचंड क्रूर हिंसा होती. कादर खान, रणजित आणि शक्ती कपूर हे खौपनाक जबरा व्हीलन जितेंद्र, हेमा मालिनी आणि परवीन बाबी यांचा अगदी वारेमाप छळ करतात. खरं तर हा एका सुपर हिट तेलगू चित्रपटाची रिमेक आहे आणि सेन्सॉरने या दृश्याना कात्री लावली नव्हती. तरीही या चित्रपटावर बंदी येणार? यावर उलटसुलट चर्चा/प्रतिक्रिया/भाष्य होत वातावरण तापले.
तेव्हा मुद्रित माध्यमातून त्याची चर्चा रंगली आणि माध्यमावरील विश्वासार्हतेमुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्र ढवळून निघाले. या सगळ्याचा असा परिणाम झाला की, वितरकाने ‘मेरी आवाज सूनो’ चे शो वाढवले. चक्क सकाळी नऊ वाजता आणखीन एक शो लावला गेला. मी स्वतः तेव्हा मिनर्व्हा थिएटरमध्ये सकाळी नऊ वाजता ‘मेरी आवाज सूनो’ चित्रपटाचा थरार अनुभवला. काही दिवसातच हे वातावरण निवळले. बंदी वगैरे काही आली नाही. पण काही हिंसक दृश्याना कात्री लागली.
त्या काळात एखाद्या चित्रपटावरचे वाद त्या चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण करत असे. महत्त्वाचं म्हणजे, तेव्हा फक्त आणि फक्त माध्यमेच बोलत अथवा सांगत असं नाही, तर रसिकही ‘वाचकांच्या पत्रातून’ आपली मते मांडत आणि त्यातून काही ना काही नवीन मुद्दा समोर येई. ते गरजेचं होतं. कधी कधी तर वाचकांनाच आवाहन केले जाई की, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘इन्साफ का तराजू (१९८०)’ मधील न्यायालयीन डावपेचाबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यात मसालेदार मनोरंजक चित्रपटाचा घटक किती आहे? वगैरे वगैरे. (Controversial Movies)
चित्रपटविषयक विविध प्रकारचे वाद ही खूपच जुनी गोष्ट आहे. अगदी १९३८ साली हंस चित्रच्या मा. विनायक दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी’ या मराठी चित्रपटातील मीनाक्षी शिरोडकर यांनी पडद्यावर बेदिंग सूटात (bathing suit)साकारलेल्या “यमुनाजळी खेळू खेळ कन्हय्या कां”, या गाण्यावरुन केवढा तरी वाद निर्माण झाला होता. (नंतरच्या पिढीला मीनाक्षी शिरोडकर म्हणजे नम्रता आणि शिल्पा शिरोडकर यांची आजी अशी ओळख).
गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तत्कालीन संस्कृतीरक्षकांनी जोरदार निदर्शने केली. वृत्तपत्रातून बरंच काही लिहिलं गेलं. मीनाक्षी शिरोडकर बेदिंग सूटात होत्या, त्यालाच आक्षेप घेतला होता. “ही आपली संस्कृती नाही, मराठी चित्रपटाची नायिका अशी असू शकत नाही”, असं टीकाकारांचं म्हणणं होतं आणि तेव्हाच्या शांत सामाजिक सांस्कृतिक वातावरणानुसार केलेलं ते भाष्य होतं. तरीही गाण्याच्या प्रसंगानुसार बेदिंग सूटात वावरणे योग्य होतं.
हे वादळी वातावरण हळूहळू निवळलं. पण त्यानंतर मराठी चित्रपटातील असा एखाद्या बिकिनी रुपावरुन काही लहान मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या की, हमखास या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाचा उल्लेख होऊ लागला. खरं तर आता ग्लोबल युगात आपण वावरु लागलो आहोत. एकीकडे अभिनेत्रीत फिटनेस फंडा आणि दुसरीकडे आकर्षक असा बोल्ड आणि ब्युटीफूल लूक यात सहजता आली आहे. तरीही अगदी ‘हिप हिप हुर्ये (२०११)’ मधील स्मिता गोंदकरच्या रेड बिकीनी रुपाची सकारात्मक दृष्टिकोनातून दखल घेतानाही ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाचा उल्लेख झालाच!
चित्रपटविषयक वादात पूर्वी अभिनेत्रीचे कधी बोल्ड फोटो सेशन (पूजा भट्टने एका गाॅसिप्स मॅगझिनच्या कव्हरसाठी केलेले बाॅडी कलर फोटो सेशन अबब! केवढे गाजले!), कधी पडद्यावरील बोल्ड लूक (बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘चेतना’ मधील थीमनुसार असलेले रेहाना सुल्तानचे एक दृश्य), एखादी बोल्ड थीम (विनोद पांडे दिग्दर्शित ‘एक बार फिर’ या चित्रपटात होती), कधी सेन्सॉरनेच चित्रपट कैचीत पकडला (महेश भट्ट दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘मंझिले और भी हैं’ चित्रपटाच्या वेळी तसे झाले होते) असेच प्रामुख्याने वाद असत. आणि ते चित्रपटाचे जग, सिनेपत्रकारीता आणि चित्रपट रसिक याच घटकांमध्ये चर्चेत असत. तेवढेही पुरेसं अथवा आवश्यक होतं आणि त्यातून अनेक गोष्टींचा उहापोह होऊन उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होई आणि त्यावरुन ‘दुसरी बाजू’ समजून घेतली जाई. ते जास्त महत्त्वाचं असतं. (Controversial Movies)
आणीबाणीच्या काळात काही चित्रपटांवर बंदी आली आणि त्याची बरीच चर्चा झाली. २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू झाली आणि काही महिन्यांतच सेन्सॉरने आपली धोरणे अतिशय कडक केली. त्याचा फटका तोपर्यंत चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या जे. ओम प्रकाश निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित ‘आँधी’, डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’, मदन मोहला दिग्दर्शित ‘दस नंबरी’ या चित्रपटाना बसला. हे चित्रपट थिएटरमधून उतरवण्यात आले. कोणी म्हटलं हा अनावश्यक राजकीय हस्तक्षेप आहे, कोणी म्हटलं ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे.
अशातच नाहटा निर्मित ‘किस्सा कुर्सी का’ हा राजकीय व्यंगपट सेन्सॉरने पूर्णपणे अडकवला आणि जोरदार चर्चा रंगली. याच काळात सी. पी. दीक्षित दिग्दर्शित ‘फकिरा’ (शशी कपूर आणि शबाना आझमी) या चित्रपटातील मारहाण दृश्याना सेन्सॉरने हरकत घेतली. बरीच काटछाट सुचवली आणि मगच चित्रपट प्रदर्शित झाला.
एकोणीस महिन्यांनी म्हणजे १९७७ च्या सुरुवातीला आणीबाणी उठली आणि आता ‘आँधी’ (संजीवकुमार आणि सुचित्रा सेन), ‘सामना’ (निळू फुले, डाॅ. श्रीराम लागू) ‘दस नंबरी’ (मनोजकुमार आणि हेमा मालिनी) हे चित्रपट पुन्हा सेन्सॉर करीत, काही दृश्ये वगळून प्रदर्शनास परवानगी दिली. पण आजही म्हणजे तब्बल ४७ वर्षानंतरही ‘आणीबाणीतील चित्रपटावरील आक्षेप अथवा बंदी’ हा विषय गाजतो. आणि त्यावर अनेकदा तरी लिहिले जाते, बोलले जाते, परिसंवादात त्याची दखल घेतली जाते.
चित्रपटविषयक अनेक पुस्तकात त्यांवर भाष्य केले आहे आणि यापुढेही केले जाईल. आजचे मनोरंजन क्षेत्राविषयीचे बरेचसे वाद हे चॅनलवरील बातम्या, प्रतिक्रिया आणि चर्चा एवढ्यापुरतेच असतात. तो दिवस संपला की वाद ‘कालचा’ होतो. त्याच्या कमी अधिक परिमाणाचा शोध घेतला जात नाही. वादग्रस्त ठरलेल्या चित्रपटावर रसिकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत? त्यांचे काही आक्षेप आहेत का? त्या वादाचा चित्रपटाच्या यशापयशावर काही परिणाम झाला का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे माध्यमांनीच शोधली पाहिजेत. पण ‘एक वादळ आले आणि गेले’ एवढेच राहते.
चित्रपटविषयक वादांची दीर्घकालीन परंपरा आहे. फार पूर्वी ते स्वाभाविकपणे घडत. आता त्यातील काही वाद हे ‘पब्लिसिटी स्टंट’ तर नव्हेत, अशी अनेकांना शंका असते. एखाद्या वादात फिल्मवाले आणि मिडिया यांच्यात काही फिक्सिंग, तर नव्हे असाही परंपरावाद्याना प्रश्न पडतोय. काळ पुढे सरकला तस तसा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बराच बदलला गेला आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांवरचे वाद डिजिटल माध्यमातून जगभरातील हिंदी चित्रपट रसिकांपर्यंत पोहचले आणि या चित्रपटांना त्याचा व्यावसायिक यशासाठी बराच फायदाही झाला. मूळ ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ असे करण्यात आले. दोन्ही चित्रपटांमुळे इतिहास, ऐतिहासिक चित्रपट आणि अशा चित्रपटांसाठीची लिबर्टी (अर्थात चित्रपट निर्मितीसाठीची तडजोड/मोडतोड/जोडाजोड) याची भरभरुन चर्चा रंगली आणि या चित्रपटांबाबत कुतूहल वाढत गेले. असे ‘वादात सापडलेल्या प्रत्येक चित्रपटाबाबत होऊ शकत नाही.
पूर्वी आर. के. नय्यर दिग्दर्शित ‘पती परमेश्वर’ (शेखर सुमन, डिंपल खन्ना आणि सुधा चंद्रन) या चित्रपटाच्या थीमनुसार सेन्सॉरने दोन वर्षे चित्रपट कैचीत पकडला. पण त्यावरुन खूपच मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा करणारे लेख लिहिले गेले. पण या चित्रपटाकडे पहिल्या शोपासूनच रसिकांनी पाठ फिरवली. (Controversial Movies)
=====
हे ही वाचा: कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अर्वाच्च भाषा, राजकीय हस्तक्षेप आणि सोशल मीडिया….. चुकत चाललंय सगळं!
हे ही वाचा: गाॅसिप्सची (Filmy Gossips) चवदार चंगळ मंगळ…
=====
चित्रपटविषयक वादांची दीर्घकालीन परंपरा आणि मनोरंजन क्षेत्र कमालीचे व्यापक झाल्याने वाढत चालली आहे. अगदी प्रत्येक आठड्यात एक वाद उफाळून येतोय. चित्रपटासह मालिका, गेम शो, रिॲलिटी शो, जाहिराती, इव्हेन्टस यांच्या अफाट पिकात कुठे ना कुठे काही वाद जन्माला येतोय. आणि कधी त्यात काही आक्षेपार्हही असतेच. पण चित्रपटाच्या संदर्भात सांगायचे तर, अधिकृत सेन्सॉरपेक्षा वाढत्या बाह्यसेन्साॅरशीपबाबत आता अधिक जागरुक रहाणे आवश्यक होत चालले आहे.