Chiki Chiki BooBoom Boom सिनेमात दिसणार प्राजक्ताचा अनोखा अंदाज !
![क्रिमिनल जस्टीस – बिहाइंड क्लोज्ड डोअर्स: रंगतदार कोर्टरूम ड्रामा](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2023/03/Untitled-design-2021-01-25T103633.274-850x560.jpg)
क्रिमिनल जस्टीस – बिहाइंड क्लोज्ड डोअर्स: रंगतदार कोर्टरूम ड्रामा
“Innocent until proven guilty”
ह्या घासून गुळगुळीत झालेल्या वाक्यावर चर्वितचर्वण करत आजवर आपली न्यायव्यवस्था जगत आलेली आहे. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, हे वाक्य भारतीय न्यायदेवतेच्या कपाळी कायमचंच कोरून ठेवलेलं आहे. दररोज कोर्टात नव्याने जमा होणारे खटले, त्यांच्या मारुतीच्या शेपटासारख्या लांबत जाणाऱ्या सुनावण्या व निकाल ह्या प्रदीर्घ बेभरवशाच्या खेळामुळे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढूच नये हे समीकरण जनमानसात घट्ट रुजलंय. सर्वसामान्यांना नकोसं वाटणारं कोर्ट फिल्ममेकर्सचं मात्र भलतंच लाडकं!
हे देखील वाचा: भाग बिनी भाग: अपुऱ्या संवादाविना गडबडलेले कथानक
टीव्ही मालिका, चित्रपट, नाटक इतकंच काय तर अगदी कालपरवा आलेल्या वेबसिरीजची कथानकेदेखील कोर्टरूम ड्रामा दाखवण्याचा मोह आवरू शकली नाहीत. बीबीसी स्टुडिओज इंडिया आणि applause एंटरटेनमेंट या संस्थांची एकत्रित निर्मिती असलेल्या क्रिमिनल जस्टीस (Criminal Justice) ह्या वेबसिरीजचा दुसरा सीझन नुकताच हॉटस्टार (Hotstar) वर रिलीज झाला. रोहन सिप्पी आणि अरुण मुखर्जी ह्या दिग्दर्शकद्वयीचा हा प्रोजेक्ट घरगुती हिंसाचार व वैवाहिक बलात्कार या विषयांवर भाष्य करतो. ही वेबसिरीज पीटर मोफॅट यांच्या लोकप्रिय ‘क्रिमिनल जस्टीस’ ह्या वेबसिरीजची भारतीय आवृत्ती आहे.
![](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2020-09-18-at-4.28.04-PM.jpeg)
प्रसिद्ध वकील बिक्रम चंद्रा (जिशू सेनगुप्ता), त्याची बायको अनुराधा चंद्रा (कीर्ती कुल्हारी) आणि मुलगी रिया (अद्रजा सिन्हा) हे एक सुखवस्तू कुटुंब. एका रात्री, अनुराधा बिक्रमच्या पोटात चाकू खुपसून त्याला जखमी करते व तिथून पसार होते. त्यानंतर भावनेच्या भरात स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करते. तिचा वकील (पंकज त्रिपाठी) तिची भेट घेण्यापूर्वीच तिचं कन्फेशन पोलिसांकडून रेकॉर्ड केलं जातं. क्लिनिकल डिप्रेशन आणि अँक्झायटीची पेशंट असलेल्या अनुराधाने हा खून का केला याचं उत्तर ह्या वेबसिरीजमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मुख्य कथानकाबरोबरच विवाहबाह्य अनैतिक संबंध, कर्मठ पुरुषी मानसिकता, कैद्यांना मिळणारी अमानुष वागणूक, वैवाहिक जीवनातील पत्नीचं दुय्यम स्थान, तिच्या स्वातंत्र्यावरील निर्बंध अश्या कैक विषयांना ही वेबसिरीज हात घालते. ह्या सर्व उपकथानकांना मुख्य कथानकाशी जोडताना दिग्दर्शकाची दमछाक झालेली दिसून येते. घरगुती हिंसाचार आणि वैवाहिक बलात्कार हा कथेचा मुख्य गाभा असल्याने सिरीजमधल्या प्रमुख कलाकारांसोबतच इतर सर्वच पात्रांनाही येनकेनप्रकारेण या गाभ्याशी बांधून ठेवण्याचा अकारण प्रयत्न केला गेलेला आहे.
हे नक्की वाचा: बंदिश बँडीट्स: सुरमयी कौटुंबिक ड्रामा
असं असलं तरीही यातील कलाकारांच्या सशक्त अभिनयाच्या जोरावर एकूण ८ एपिसोड असलेली ही सिरीज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी होते. किर्ती कुल्हारीने डिप्रेस्ड, भयभीत अनुराधाच्या भूमिकेत जीव ओतला आहे. सतत दहशतीच्या छायेत वावरणारी अनुराधा इतर पात्रांच्या तुलनेत भाव खाऊन जाते. पंकज त्रिपाठी व अनुप्रिया गोयंका यांनी अनुराधाच्या वकिलांची भूमिका केलेली आहे तर प्रतिस्पर्धी वकिलाच्या भूमिकेत राजीव कचरू आणि आशिष विद्यार्थी दिसून येतात. तसेच खुशबू अत्रे, अयाझ खान, दीप्ती नवल, मिता वशिष्ठ, शिल्पा शुक्ला इत्यादींच्याही भूमिका उठावदार झालेल्या आहेत.
![](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2023/03/Criminal-Justice-Behind-Closed-Doors-784x441-1.jpg)
नर्मविनोदी स्वभावाचा माधव मिश्रा (पंकज त्रिपाठी), स्त्रीवरील अन्यायाला वाचा फोडू पाहणारी निखत हुसेन (अनुप्रिया गोयंका) आणि स्त्रीला जुनाट, पुरुषी मानसिकतेच्या नजरेतून बघणारा दीपेन प्रभू (आशिष विद्यार्थी) यांची जुगलबंदी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. दमदार पार्श्वसंगीत, तगडी स्टारकास्ट आणि एक पठडीबाहेरचा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा कोर्टरूम ड्रामा नक्कीच बघण्यासारखा आहे.