
Dev Anand : ….तसं झालं असतं तर देव आनंद ‘तिसरी मंझिल’चा नायक राहिला असता!
हिंदी सिनेमाच्या इतिहासात डोकावताना बऱ्याच मनोरंजक गोष्टी दिसून येतात. आज इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा त्या ऐकतो किंवा वाचतो तेव्हा खूप गंमत वाटते. आता हेच पाहा ना अभिनेत्री साधना (Sadhana) हिच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये एक मोठा ड्रामा झाला होता. या अभूतपूर्व अशा नाट्याने आगामी दोन हिंदी सिनेमांचे दिग्दर्शकच बदलले गेले! एका सिनेमातला हिरो बदलला गेला!! हा सर्व मेलो ड्रामा या पार्टीमध्ये झाला होता. नेमका काय होता हा किस्सा आणि कोणते होते ते दोन हिंदी चित्रपट? (Bollywood News)

१९६५ साली अभिनेत्री साधना आणि निर्माता दिग्दर्शक आर के नय्यर यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या एंगेजमेंटची एक भली मोठी पार्टी त्यांनी मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये अरेंज केली होती. पार्टी रंगात आली होती. या पार्टीला अख्ख बॉलीवूड लोटलं होतं. रंगीत संगीत पार्टी जोरदार चालू होती. या पार्टीमध्ये निर्माता दिग्दर्शक नासिर हुसेन आणि अभिनेता देव आनंद (Dev Anand) यांच्यात एका क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला आणि या वादानेच त्यांच्या आगामी सिनेमांची गणित 360 अंशात फिरली गेली!

नासिर हुसेन त्या काळात दोन चित्रपटात काम करत होते. पैकी एक होता ‘तिसरी मंजिल’ (Tisari Manzil) या चित्रपटाचा नायक म्हणून त्यांनी देव आनंदला निवडले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन स्वत: नासिर हुसेन करणार होते. यापूर्वी देव आनंद आणि नासिर हुसेन यांनी ‘जब प्यार किसी से होता है’ (१९६२) या चित्रपटात एकत्र काम केले होते. नासिर हुसेन यांचा याच काळात दुसरा एक चित्रपट फ्लोअरवर जाणार होता; हा चित्रपट होता ‘बहारों के सपने’. या चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद यांचा भाऊ विजय आनंद तथा गोल्डी करणार होते. सर्व गोष्टी सेट झाल्या होत्या. पण त्या पार्टीत मद्याचा अंमल वाढल्यामुळे असेल कदाचित पण देव आनंद दुसऱ्या एका निर्मात्या सोबत सहज बोलताना बोलून गेला,” बघा ना मी नासीर हुसेन यांच्या ज्या चित्रपटात काम करत आहे तो ‘तिसरी मंजिल’ हा चित्रपट कलर मध्ये बनतो आहे तर नासिर हुसेन यांनी माझ्या भावाला गोल्डी ला जो चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी दिला आहे तो ब्लॅक अँड व्हाईट आहे. (Retro News)
================================
हे देखील वाचा: अभिनेता जितेंद्र सोबत अभिनेत्री साधना? एक हुकलेला योग!
=================================
या चित्रपटात राजेश नावाचा कुणीतरी नवीन कलाकार त्यांनी घेतलेला आहे. बहुतेक माझ्या भावाची करिअर बरबाद करण्याचा नासिर हुसेन यांचा विचार दिसतोय!” कर्णोपकर्णी ही बातमी त्याच पार्टीत असलेल्या नासिर हुसेन यांच्यापर्यंत पोचली.
नासिर हुसैन ताबडतोब देव आनंद कडे आले आणि त्याला याचा जाब विचारला. शब्दाने शब्द वाढत गेला आणि हा वाद हातापायी पर्यंत वाढला. दोघांनी भरपूर मद्य घेतल्यामुळे दोघांचाही कंट्रोल नव्हता. पण इतरांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला! दुसऱ्या दिवशी मात्र नासिर हुसेन यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी विजय आनंदला बोलावून सांगितले की,” आता आपण दोघे जे सिनेमा दिग्दर्शित करीत आहोत ते स्वाईप करूया. म्हणजे ‘तिसरी मंजिल’ हा चित्रपट तू दिग्दर्शित कर आणि ‘बहारों के सपने’ हा चित्रपट मी दिग्दर्शित करेन.

आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटाचा नायक आता देव आनंद असणार नाही तर शम्मी कपूर (Shammi Kapoor) असेल!” अशा पद्धतीने ‘तिसरी मंजिल’ मधून देव आनंदचा पत्ता कट झाला आणि तिथे शम्मी कपूरची वर्णी लागली. या दोन्ही चित्रपटांना संगीत राहुल देव बर्मन यांनी दिले होते. तर गाणी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती. दोन्ही चित्रपटाची नायिका आशा पारेख हीच होती. खरंतर ‘बहारों के सपने’ या चित्रपटात नासिर हुसेन यांना नंदा या अभिनेत्रीला घ्यायचे होते कारण तिने यापूर्वी अशा प्रकारच्या भूमिका केल्या होत्या. पण नंदाने अव्वाच्या सव्वा मानधन मागितल्यामुळे नासिर हुसेन यांनी त्यांची नेहमीची आशा पारेख ही नायिका या सिनेमात रिपीट केली.

‘बहारों के सपने’ खरंतर नासिर हुसेनच्या परंपरेतील चित्रपट नव्हताच. एक आर्ट फिल्म असा हा चित्रपट. त्यामुळेच नासिर हुसेन यांनी हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बनवला. यातील फक्त एक गाणे क्या जानू सजन.. हे त्यांनी कलर मध्ये बनवले. ‘बहारों के सपने’ पब्लिकने टोटली अव्हेरला. पहिल्या आठवड्यातच थेटर ओस पडू लागली त्यामुळे नासिर हुसेन यांनी या सिनेमाचा ट्रॅजिक एंड बदलला. दुसरीकडे ‘तिसरी मंजिल’ हा चित्रपट विजय आनंद यांनी सुपर डुपर हिट करून दाखवला.
================================
हे देखील वाचा: Dev anand : देव आनंद पाकिस्तानी क्रिकेटपटूला घेऊन हा चित्रपट बनवणार होता!
=================================
जर साधनाच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये नासिर हुसैन आणि देव आनंद यांचे भांडण झालेच नसते तर ‘बहारों के सपने’ हा चित्रपट विजय आनंद यांनी दिग्दर्शित केला असता आणि कदाचित देव ‘तिसरी मंजिल’ चा हिरो राहिला असता! त्या परिस्थितीत मात्र दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले असते. नासिर हुसैन कडे यशाचा फॉर्मुला होता तर विजय आनंद यांना कुठलाही सब्जेक्ट ला व्यवस्थित पडद्यावर मांडण्याची कला होती. अर्थात या सर्व जर तर च्या गोष्टी .आशा पारेख यांनी त्यांच्या ‘द हिट गर्ल ‘या आत्मचरित्रात या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी अभिनेता आमिर खान (Aamir Khan) (नासिर हुसैन यांचे पुतणे) यांनी देखील एका कार्यक्रमात या स्टोरीचा उल्लेख केला होता!