
Dev Anand यांनी ‘या’ तीन इंग्रजी चित्रपटात काम केले होते!
आपल्या सदाबहार अभिनयाने हिंदी सिनेमात रसिकांच्या मनात मानाचे स्थान निर्माण करणारे जे कलावंत होते त्यात देव आनंद यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ’हर फिक्र को धुयेंमे उडाता चला गया ’ असे म्हणत ’जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये…’ हा त्याच्या जगण्याचा मूल मंत्र होता. देवने साठच्या दशकात तीन इंग्रजी सिनेमातून भूमिका केल्या होत्या. त्यातील एका चित्रपटाची निर्मिती तर ट्वेंटीएथ सेंचुरी फॉक्सची होती. रोल्फ बायर निर्मित ’द एव्हील विदीन’ या सिनेमाचे दिग्दर्शन लॅंबेरटो अॅव्हीलाना यांनी केले होते. या सिनेमात देव आनंदच्या दोन नायिका होत्या एक होती व्हीएतनामची कियु चिन आणि दुसरी भारतीय झीनत अमान(देवच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या आधी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता).

१९७० साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे पर्यायी शीर्षक ’पासपोर्ट टू डेंजर’ असे होते. या सिनेमाचे छायाचित्रण फली मिस्त्री यांचे होते! हा चित्रपट फिलीपिन्स मध्ये डब करून प्रदर्शित झाला होता. पण दुर्दैवाने या सिनेमाला व्यावसायिक यश मिळाले नाही. या सिनेमाचे दुर्दैव इतके की त्याची एकही प्रत शिल्लक नाही किंवा याची डिव्हीडी देखील असण्याची सुतराम शक्यता नाही. त्या मुळे गुन्हेगारी क्षेत्रातील क्षोभ नाट्य असलेला हा सिनेमा भारतीयांपर्यंत पोचलाच नाही. पण हा देव चा पहिलाच इंग्रजी सिनेमा होता का? नाही.

या पूर्वीही त्याने दोन इंग्रजी सिनेमातून भूमिका केल्या होत्या. पैकी एक होता १९६५ साली केवळ परदेशात प्रदर्शित झालेला ’गाईड’ आपल्या हिंदी गाईडच्या आधी हा सिनेमा बनला होता. या इंग्रजी आवृत्तीचे दिग्दर्शन टॅड डॅनियलवस्की याचे होते तर पटकथा पर्ल बक यांची होती. या सिनेमाला देखील व्यावसायिक यश न मिळाल्याने सिनेमा कायमचा डब्यात गेला. भारतात तर हा प्रदर्शितच झाला नाही असे म्हणतात पण १० फेब्रुवारी १९६५ च्या न्यूयार्क टाईम्स च्या अंकामध्ये या सिनेमावर चांगले परीक्षण आले होते. देव ने आपल्या आत्मवृत्तात देखील याचा उल्लेख केला आहे. या नंतर गोल्डी विजय आनंद ने सूत्रे हातात घेवून याच कथानकावर (लेखक आर के नारायण) गाईड हा क्लासिक चित्रपट हिंदीत बनवला. देवचा तिसरा इंग्रजी सिनेमा होता ’ओ बॉय थ्री गर्लस’ हा सिनेमा म्हणजे १९६५ साली प्रदर्शित झालेला ’तीन देवीयॉं’चा इंग्रजी अवतार.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
================================
एका तरूण कवीच्या आयुष्यात आलेल्या तीन मुलींची कहाणी यात होती. विषय धाडसी होता त्यामुळेच सेन्सार बोर्डाचे ’ए’ सर्टीफिकेट त्याला मिळाले. दिग्दर्शन अमरजितचे असले तरी खरा दिग्दर्शक देवच होता हे त्याच्या चाहत्यांना माहित होते. या सिनेमात ’लिखा है तेरी ऑंखो मे’’अरे यार मेरी तुम भी हो गजब’,’ख्वाब हो तुम या कोई हकीकत’,’कहीं बेखयाल होकर’ हि मिठ्ठास गाणी होती. पण इंग्रजी आवृत्तीत या गाण्यांच्या ऐवजी हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या कविता होत्या ज्याला पंचमने स्वरसाज दिला होता. पण हा सिनेमा काही अनाकलनीय कारणाने प्रदर्शित झालाच नाही. अशा प्रकारे देव आनंदच्या या तीनही सिनेमांबाबत आता फक्त आठवणीच शिल्लक आहेत .वाचकांपैकी जर कुणाला या तीनही सिनेमांबाबत काही निराळी माहिती असेल तर जरूर शेअर करावी.