डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

Dharmendra : सुपरस्टार ते यशस्वी निर्माता….
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या चाहत्यांना कायमचे सोडून गेले… अभिनयात ज्यांचा कुणी हात धरु शकणार नाही अशी कामगिरी त्यांनी आजवर केली.. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत खऱ्या अर्थाने हा कलाकार काम करत राहिला… धर्मेंद्र कुशल अभिनेते होते हे आपण जाणतोच पण त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत इतिहास रचला होता… धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुलांना सनी आणि बॉबी देओलला त्यांनी फिल्मी दुनियेत आणलं पण पुढे त्यांनीच वडिलांच्या शिकवणीनुसार आपलं स्थान निर्माण केलं… आज धर्मेंद्र यांचा निर्माता म्हणून प्रवास कसा होता हे जाणून घेऊयात…
धर्मेंद्र यांनी जेव्हा निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं तेव्हा ‘विजयता फिल्म्स’ या नावाने त्यांनी निर्मिती संस्था सुरु केली होती… आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटातूनच त्यांनी सनी देओलला ब्रेक दिला… ‘बेताब’ हा विजयता फिल्म्स चा पहिला चित्रपट जो १९८३ मध्ये रिलीज झाला… सनी देओलच्या पदार्पणाचा ‘बेताब’ चित्रपट बनला तेव्हा चित्रपटाची पहिली ट्रायल धर्मेंद्र यांना आवडली नाही.. धर्मेंद्र यांनी टीमला चित्रपट रिशुट करायला लावला आणि तब्बल ४० दिवस ‘बेताब’ चित्रपटाचं रिशुट करण्यात आलं… जरी आपल्याच मुलाचा डेब्यु चित्रपट असला तरी या चित्रपटावेळी त्यांचं एक वाक्य विशेष गाजलं ते म्हणजे “पिक्चर दिल से बनती है पैसो से नही…” अमृता सिंह आणि सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका असणारा बेताब १९८३ मध्ये कर्मशिअली हिट झाला आणि पुढे धर्मेंद्र यांनी निर्मिती क्षेत्रातील काम त्यांनी सुरुच ठेवलं… मोठ्या मुलाला बॉलिवूडमध्ये सेट केल्यानंतर आता दुसरा मुलगा बॉबी पदार्पणासाठी सज्ज झाला होता…

‘बरसात’ हा बॉबी देओलचा डेब्यु चित्रपट… सुरुवातीला या चित्रपटात बॉबी देओल, करिश्मा कपूर ही स्टारकास्ट होती आणि याचं दिग्दर्शन शेखर कपूर करणार होते.. पण झालं असं की शेखर कपूरकडून चित्रपटाचं शुट सुरु करायला उशीर होत असल्यामुळे बबिता कपूरच्या सांगण्यावरुन करिश्माने ‘बरसात’ चित्रपटातून काढता पाय घेतला… करिश्माची ‘बरसात’ चित्रपटातील जागा ट्विंकल खन्नाने घेतली आणि दिग्दर्शक म्हणून शेखर कपूरही बाद झाले त्यांच्याजागी राजकुमार संतोषी आले…. विशेष म्हणजे या ‘बरसात’ चित्रपटाच्या नावाचीही खास आठवण आहे… राज कपूर दिग्दर्शित ‘बरसात’ हा आयकॉनिक चित्रपट.. शिवाय हे नाव आर.के. फिल्म्सचं माईलस्टोन होतं… आणि ते आपल्याला मिळावं म्हणून धर्मेंद्र यांनी ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांची भेट घेतली आणि ‘बरसात’ नाव दिलं जाव अशी विनंती केली आणि मग बॉबी देओलच्या पहिल्या चित्रपटाला ‘बरसात’ हे नाव मिळालं…

भगत सिंग यांच्या जीवनावर एकाचवेळी ३-४ चित्रपट त्या काळात तयार होत होते… त्यापैकी एक होता ‘२३ मार्च १९३१ शहीद’ आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं गुड्डू धनोवा जे धर्मंद्र यांच्या कुटुंबातील एक सदस्य होते… या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती… त्याचवेळी ऐश्वर्या रॉय नुकतीच इंडस्ट्रीत आली होती आणि तिने आपल्या चित्रपटात गेस्ट अपिरन्स द्यावा अशी त्यांची इच्छा होती… धर्मेंद्र आणि सनी यांनी तिने आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले.. ऐश्वर्यावर एक गाणं कमालीस्तान स्टुडिओत शुट झालं आणि त्याच्या शुटींगला आम्हा पत्रकारांना धर्मेंद्र यांनी खास आमंत्रित केलं होतं…
धर्मेंद्र यांचं ५ तारखेशी विशेष नातं होतं.. विजयता फिल्म्सचा पहिला ‘बेताब’ चित्रपट ५ ऑगस्ट १९८३ रोजी रिलीज झाला… त्यावेळी धर्मेंद्र यांनी सांगितलं की, आमचा ‘२३ मार्च १९३१ शहीद’ हा चित्रपट ही आम्ही ५ ऑगस्टलाच रिलीज करणार… कारण सनी देओलचा पदार्पणाचा पहिला चित्रपट त्याच दिवशी रिलीज झाला होता म्हणून धर्मेंद्र यांनी तीच तारीख निवडली… शिवाय, दिलीप कुमार यांच्यावर धर्मेंद्र यांचं किती प्रेम होतं हे शब्दात सांगण कठिण… दिलीप कुमार यांचा ‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपटही ५ ऑगस्ट १९६० ला रिलीज झाला होता… त्यामुळे ५ ऑगस्ट ही तारीख धर्मेंद्र यांच्यासाठी लकी होती असं म्हणावं लागेल….
धर्मेंद्र यांच्या निर्मीतीची गोष्ट इथेच संपत नाही.. तर २०१४ मध्ये ‘पॉश्टर बॉईज’ हा समीर पाटील दिग्दर्शित मराठी चित्रपट धर्मेंद्र यांच्या कंपनीने पाहिला आणि तो हिंदीत आपण करावा असं त्यांचं ठरलं… २०१७ मध्ये ‘पोश्टर बॉईज’ हा चित्रपट रिलीज झाला ज्यात धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल, श्रेयस तळपदे अशी स्टारकास्ट होती आणि त्याचं दिग्दर्शन श्रेयस तळपदेने केलं होतं… धर्मेंद्र यांच्या प्रोडक्शन हाऊसने बरेच चित्रपट केले यात घायल चित्रपटाचा उल्लेख नक्कीच केला पाहिजे… तर मधल्या काळात सनी देओलच्या करिअरचा डाऊनफॉल सुरु होता… त्यावेळी राजकुमार संतोषी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होते… तेव्हा सनी आणि धर्मेंद्र यांनी नव्या पिढीतील दिग्दर्शकांना सधी देऊयात असा विचार केला आणि घालय चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषींकडे गेलं… मग तो चित्रपट तयार झाला आणि आम्हा चित्रपट समीक्षकांना इरॉस थिएटरमध्ये घायल चित्रपटाचा स्पेशल शो दाखवला गेला.. विशेष म्हणजे चित्रपट पाहून झाल्यानंतर आम्हा पत्रकारांना धर्मेंद्र यांच्यवतीने सनी देओलने पार्टी दिली होती… खरं सांगायचं पडद्यामागचे धर्मेंद्र हा फार सह्रदयी आणि मीडिया फ्रेंडली होते..

धर्मेंद्र लहानपणापासूनच दिलीप कुमार यांचे फॅन होते.. दिलीप कुमारवरच्या प्रेमाखातर त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये आला की तो धर्मेंद्र पाहायला आवर्जून जात… चित्रपटसृष्टीतील धर्मेंद्र यांचा आदर्श म्हणजे दिलीप कुमार… दिलीप कुमार यांच्यावर दिवसागणिक त्यांचं प्रेम वाढत होतंच.. एकाच इंडस्ट्रीत काम करत असताना दोघांची एकदा गाठभेट झालीच आणि दिलीप कुमार यांनी धर्मेंद्रंना आपल्या पाली हिलच्या बंगल्यावर जेवायला बोलावलं… सांगायचा मुद्दा असा की, हा किस्सा धर्मेंद्र यांच्या ‘अपने’ चित्रपटाच्या ऑडिओ रिलीजला त्यांनी सांगितला होता आणि त्यावेळी ऑडियो लॉंचला दिलीप कुमार आणि सायरा बानो उपस्थित होते… यावेळी धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार यांच्या घरी जेवायला जाण्याचा अनुभव सांगताना म्हटलं होतं की, जेव्हा धर्मेंद्र त्यांच्या घरी जेवायला गेले तेव्हा कडाक्याची थंडी होती आणि दिलीप कुमार यांनी आपली खास शाल धर्मेंद्रंच्या खांद्यावर टाकली.. ती शाल धर्मेंद्र यांनी कायम जपून ठेवली आणि अधुन-मधुन ती शाल आपल्या अंगावर घेत दिलीप कुमार यांनी दिलेली शाबसकी आणि पाठबळ त्यांना आठवत राहायचं.. अतिशय सह्रदयी असणाऱ्या धर्मेंद्र यांनी ब्लॅक ऍण्ड व्हाईट ते रंगीत चित्रपट असा प्रवास केला… ३५ एम एम ते ‘शोले’ सारखा ७० एम.एमवर चित्रित केला जाणारा चित्रपटनिर्मितीचा प्रवास त्यांनी अनुभवला… वर्सटाईल असा हा अभिनेता दिग्दर्शक ऋशिकेश मुखर्जींचा आवडता कलाकार होता…. ६०च्या दशकात धर्मेंद्र यांनी अतिशय सोबर अशा भूमिका केल्या होत्या… नंतर ‘फुल और पत्थर’, ‘यादों की बारात’, ‘यकिन’ या चित्रपटांपासून Action भूमिका करायला लागले…

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याविषयी ७०च्या दशकात गॉसिप्स मॅगझिनने बरंच काही लिहिलं होतं.. त्याचा राग त्यांच्या मनात होता आणि त्यावेळी बंगालच्या पुरग्रस्थांसाठी मुंबईत फेरी निघाली होती तेव्हा तिथे त्या मॅगझिनमध्ये लिहिणारे २ पत्रकार महालक्ष्मीच्या टर्फमध्ये फेरीसाठी आले होते, त्यांना पाहताच धर्मेंद्र त्यांच्या अंगावर दावून गेल्याची बातमी दुसर्यादिवशी सगळ्याच पेपरांमध्ये छापून आली होती… सांगायचं तात्पर्य असं की धर्मेंद्र यांना गॉसिप पत्रकारीता कधीच आवडली नाही... धर्मेंद्र यांच्या भेटीचे आणखी २ अनुभव खास सांगावेसे वाटतात… १९८९ साली जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आम्हा काही निवडक पत्रकारांना धर्मेंद्र यांनी खास मेजवानीसाठी आमंत्रित केलं होतं आणि आमच्याशी ते गप्पा मारत होते… आम्हाला त्यांच्या चित्रपटांबद्दल काय माहित आहे हे त्यांनी जाणून घेतलं… आता पुन्हा एकदा ‘शोले’ चित्रपटाला ५० वर्ष पुर्ण झाली तेव्हा मी धर्मेंद्र यांना भेटलो… या भेटीत मी त्यांना शोलेचे फोटो, तिकीट दाखवलं… इतकंच नाही तर ‘हिचं काय चुकलं’ या मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं त्याची आठवण देखील करुन दिली.. ते फोटो पाहुन मला म्हणाले की मला या आठवणी दे मला सांभाळून ठेवायला आवडतील…
================================
हे देखील वाचा : Salim Khan : पटकथा संवाद लेखकाला ग्लॅमर आणले
================================
मघाशी दिलीप कुमार यांचे धर्मेंद्र किती मोठे चाहते होते हे सांगताना मी म्हणालो होतो की ते त्यांचा प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहात होते… अलीकडे करोनाच्या काळात ते थिएटर पाडलं… धर्मंद्र यांनी त्या थिएटरचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आणि त्याखाली थिएटरच्या आता फक्त ठवणी राहिल्या आहेत असं त्यांनी लिहिलं होतं… यावरुन एक गोष्ट नक्की समजते की ते अगदी मागची २-३ वर्ष धर्मेंद्र स्वत: सोशल मिडियावर सक्रीय होते… एखाद्या चित्रपटाला ४०-५० वर्ष झाली तर त्यानिमित्ताने ते ट्विट करायचे… किंवा त्यांच्या फार्म हाऊसवरील फोटो ते सोशल मिडियावर टाकायचे… मुळात ज्या ग्रामीण भागातून धर्मेंद्र आले होते त्या मातीशी ते आजन्म जुळून राहिले… दुसरं म्हणजे राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात धर्मेंद्र यांनी काम केलं आहे… देव आनंद, दिलीप कुमार, राजेश खन्ना, राज कुमार, अमितभ बच्चन अशा सगळ्या लेजेंड कलाकारांसोबत धर्मेद्र यांनी काम केलं आहे… दिग्दर्शकांसोबत म्हणायचं झालं तर ऋषिकेश मुखर्जी यांचा तो लाडका अभिनेता होता… एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी त्यांना न घेता राजेश खन्ना यांना आनंद चित्रपटात ऋषिकेश यांनी घेतलं याचा त्यांना राग आल्याचंही म्हटलं होतं… धर्मेंद्र यांनी विविध शैलींच्या दिग्दर्शकांसोबत काम केलं… प्रमोद चक्वर्ती, रमेश सिप्पी अशा दिग्गज दिग्दर्शकांचे ते हुकमी एक्का होते… धर्मेंद्र यांचा एक चित्रपट खरं तर यायला हवा होता.. तो म्हणजे गुलजार ‘देवदास’ बनवत होते, मेहबूब स्टुडिओत मुहूर्त झाला, जाहिरात आली पण तो चित्रपट बनलाच नाही… त्या चित्रपटातहेंमा मालिनी आणि शर्मिला टागोर या पारो आणि चंद्रमुखी असणार होत्या… पण धर्मेंद्र यांनी जर का ‘देवदास’ केला असता तर तो वेगळा दिसला असता एवढं नक्की…