डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

धर्मेंद्रची भूमिका असलेल्या Shalimar चा ग्लॅमरस मुहूर्त केवढा गाजला…..
ते दिवसच वेगळे होते. नवीन चित्रपटाचा अतिशय ग्लॅमरस, देखणा, महागडा आणि पुढचे अनेक दिवस चर्चेत राहिल असा हुकमाचे चारही एक्के असलेला मुहूर्त म्हणजे पूर्वीच्या हिंदी चित्रपटसृष्टीची खासियत. चित्रपटाच्या मुहूर्तालाच एक भारी सेलिब्रेशन. अनेकदा तर असे मुहूर्त भारी गाजले, पण पिक्चर फ्लॉप झाला… धर्मेंद्रने अनेक चित्रपटात ‘चोर नायक’ साकारला. असाच हा एक महागडा चित्रपट.
कृष्णा शहा निर्मित व दिग्दर्शित ‘शालिमार’ (प्रदर्शन ८ डिसेंबर १९७८) चा मुहूर्त असाच कलरफुल भारी झाला. इंडो अमेरिकेत चित्रपट म्हणून त्याची घोषणेपासूनच चर्चा रंगली . मसालेदार मनोरंजक चित्रपटात असं काही घडणेच विशेष होते. कृष्णा शहा हे अमेरिकेतील मोठेच प्रस्थ आणि भारतात येऊन चित्रपट निर्मिती करणार ही विशेष उल्लेखनीय गोष्ट. चित्रपटात हिंदी व विदेशी चित्रपट कलाकार. हा चित्रपट जेम्स हेडली यांच्या The Vulture is Paitint Bird’या कादंबरीवर आधारीत. तोही एकाच वेळेस हिंदी व इंग्रजीत. त्या काळात हे सगळेच अचंबित करणारे होते. आणि अशातच महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर एका सायंकाळी रात्री उत्तरोत्तर रंगत जाईल असा मुहूर्त सोहळा.

एकीकडे ग्लॅमर, दुसरीकडे भरपूर उंची मद्य. मुहूर्त सोहळ्यात झीनत अमान-धर्मेंद्र यांचा चुंबन घेतलेला तो फोटो कायमच गाजत राहिला. ते वातावरण तसेच भारी होते. विदेशी कलाकारांची उपस्थितीही लक्षवेधक. हिंदी चित्रपटसृष्टी कात टाकतेय असाच सगळा माहौल आणि मग सतत याच चित्रपटाची व मुहूर्ताची चर्चा. चित्रपटात शम्मी कपूर, धर्मेंद्र, झीनत अमान, प्रेमनाथ, रेक्स हॅरिसन, जॉन सॅक्सन, सिल्वासा माईल्स, अरुणा इराणी, डॉ. श्रीराम लागू, ओ. पी. रल्हन यांच्या प्रमुख भूमिका. चित्रपटाची गीते आनंद बक्षी यांची असून संगीत राहुल देव बर्मनचे. त्या काळात खूपच अगोदर गाण्याची तबकडी प्रकाशित होई, इतकेच नव्हे तर चित्रपट संगीत शौकिन अमूकतमूक नवीन चित्रपटाची तबकडी आली का याची म्युझिक सेंटरमध्ये सतत चौकशी करत आणि मग ही गाणी लोकप्रिय होत.

या चित्रपटातील ‘हम बेवफा हरगीज न थे’ ( पार्श्वगायक किशोरकुमार), ‘आईना वही रहता है’ ( लता मंगेशकर), ‘वन टू चा चा चा’ ( उषा उथप) ही गाणी केव्हा हिट झाली हे समजलेच नाही याचे कारण या पिक्चरची भारी हवा. ती आता चित्रपट प्रदर्शित होत असताना आणखीन उत्सुकता वाढली आणि एकूणच चांगला हाईप निर्माण झाल्यावर चित्रपट प्रदर्शित झाला आणि…..फर्स्ट शोपासूनच नकारात्मक प्रतिक्रिया उमटत गेली. चित्रपट फ्लॉप झाला. मुंबईत मेन थिएटर नाॅव्हेल्टी होते. अतिशय महागड्या हिर्याची चोरी हे याचे मध्यवर्ती कथासूत्र.
चित्रपटाची मांडणी एखाद्या विदेशी चित्रपटासारखी होती. टाळ्या शिट्यानी पिक्चर एन्जॉय करायला उत्सुक असलेल्या पब्लिकला हे सगळेच नवीन होते. चित्रपटाचे रहस्य नक्कीच धक्कादायक होतें. धर्मेंद्रने आपल्या भूमिकेवर भरपूर मेहनत घेतल्याचे दिसून येते. या चित्रपटातील त्याच्या फिटनेस, शरीरसौष्ठव दर्शन एकदम झकास आहे. चित्रपटात पाश्चात्य वळणाचे स्टंट होते. पिक्चर फ्लॉप झाल्यावर तर त्याच्या अतिशय खर्चिक, ग्लॅमरस मुहूर्ताची पुन्हा पुन्हा आठवण काढली जाऊ लागली. तेच आणि तेवढेच या चित्रपटाचे यश.
================================
हे देखील वाचा : Dharmendra : सुपरस्टार ते यशस्वी निर्माता….
================================
धर्मेंद्रने आपल्या चौफेर व खणखणीत वाटचालीत महाखर्चिक अशा काही चित्रपटांतून भूमिका साकारल्या. त्यात जी. पी. सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले, बी. आर. चोप्रा निर्मित व रवि चोप्रा दिग्दर्शित ‘द बर्निग ट्रेन’, कृष्णा शहा निर्मित आणि दिग्दर्शित ‘शालिमार’, एफ. सी. मेहरा निर्मित आणि उमेश मेहरा दिग्दर्शित ‘अलिबाबा और चालीस चोर’, मुशीर रियाज निर्मित आणि विजय आनंद दिग्दर्शित ‘रजपूत’ या चित्रपटांचा खास उल्लेख हवा. हे सगळे चित्रपट विविध कारणांमुळे फार गाजले. ‘शालिमार’ तर नक्कीच गाजला. पाश्चात्य वळणाचा मुहूर्त आणि हिंदी चित्रपटातील चोर नायक हे मिश्रण त्यात काही विदेशी कलाकार समाविष्ट करुन पडद्यावर आले….