रायटर्स होत आहेत ॲक्टर्स….
‘लाईटस् कॅमेरा ॲक्शन’ आता फक्त ॲक्टर पर्यंत मर्यादित राहिलं नसून आता लेखक सुद्धा अभिनयात आपली चुणूक दाखवत आहेत. मालिकेचं कथा, पटकथा लेखन, संवाद लेखन म्हणजे एखाद्या मालिकेचा प्राण असतो. मालिकेचा लेखक काहीसा पडदयाआड असला तरी त्याची भूमिका मालिकेच्या युनीटमध्ये महत्त्वाची असते. पण आता पडद्याआडचे लेखक मंडळी थेट कॅमेरा फेस करताना दिसत आहेत. आपण लिहिलेल्या मालिकेत एखादा रोल करताना तर एखाद्या मालिकेत कॅरॅक्टर निभावताना दिसत आहेत. कोणत्या आहेत या मालिका त्यावर एक नजर टाकूया…
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत अभिषेक ज्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करतो त्या हॉस्पिटलमधील मॅडम म्हणजेच डॉक्टर वसुधा हे पात्र साकारणारया मुग्धा गोडबोले या मालिकेच्या संवाद लेखिका आहेत. आतापर्यंत या मालिकेतील वास्तवदर्शी संवाद लेखनासाठी त्यांचं खूप कौतुक होतय आणी त्यांचा अभिनयसुद्धा आता प्रेक्षकांना भावतोय. ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेतदेखील त्यांनी भूमिका साकारली आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) मालिका तर इतकी यशाच्या शिखरावर आहे कि आता मालिकेचा तिसरा सिझन आपल्या भेटीला आलाय. या तिनही सिझनमध्ये इसरलंय असं म्हणणारं एक पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार ठरलं. हा मालिकेत सगळं विसरणारा पांडू मात्र मालिकेचे संवाद लिहायला अजिबात विसरत नाही. कारण पांडूची भूमिका साकारणारा प्रल्हाद कुरतडकर या मालिकेच्या प्रत्येक सिझन साठी लेखन करतोय.
नुकत्याच संपलेल्या ‘माझ्या नवरयाची बायको’ या सिरीअलचा लेखक अद्वैत दादरकरने त्या सिरिअलमध्ये राधिकाच्या दुसऱ्या नवऱ्याची भूमिका तर साकारलीच पण त्याचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की आता तो ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेमध्ये सोहम ही महत्वाची भूमिका साकारतोय. लेखक किरण माने सध्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत माऊच्या वडिलांची भूमिका सक्षमपणे निभावत आहेत.
याआधी सुद्धा लेखक अनेकदा मालिकांतून आपले अभिनय कौशल्य दाखवताना दिसले आहेत. लेखक चिन्मय मांडलेकर याने ‘तू तिथे मी’ या मालिकेत नायकाची भूमिका साकारली. त्याने अवघाची संसार, कुंकू, एका लग्नाची तिसरी गोष्ट यासारख्या दर्जेदार मालिकांचं लेखन केल आहे. लेखिका मधुगंधा कुलकर्णीने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत मेघनाची मोठी जाऊ हे पात्र साकारल आहे. त्यांनी होणार सून मी या घरची यासारख्या लोकप्रिय मालिकेसाठी लेखन केल आहे. माझ्या नवरयाची बायको या मालिकेचे लेखक अभिजीत गुरू आणि रोहिणी निनावे यांनी सुद्धा या मालिकेत अभिनयातून प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या भूमिकामधून आले.
अशाप्रकारे आता पडदयाआड लेखनाची महत्त्वाची भूमिका पार पाडणारे लेखक पडद्यावर सुद्धा तितक्याच ताकदीचा अभिनय करताना दिसत आहे. लेखक लेखिका आता अभिनेते अभिनेत्री होताना कधी लेखन आणि अभिनय अशा दुहेरी जबाबदाऱ्या निभावत आहेत. लेखणीमुळे प्रसिद्ध असणारे लेखक आता कलाकार म्हणूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत असं म्हणायला हरकत नाही.
– सिध्दी सुभाष कदम