वैविध्यपूर्ण भूमिका करणारी प्रतिक्षा
स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या विविध मालिका खूप लोकप्रिय होत आहेत. त्यात ‘मुलगी झाली हो’ ही मालिका सुद्धा लोकप्रियता मिळवत आहे. त्यातली ‘दिव्या सरदेशमुख’ म्हणून आपल्या लक्षात राहणारी अभिनेत्री म्हणजे प्रतिक्षा मुणगेकर.
तिने याआधी स्टार प्रवाह वरील ‘छत्रीवाली’ मालिकेत काम केले होते. प्रतिक्षाची गाजलेली भूमिका म्हणजे ‘कलर्स’ मराठी वाहिनीवरील ‘घाडगे अँड सून’ मधील ‘कियारा’ ही भूमिका. खरे तर ही भूमिका तिला रिप्लेसमेंट म्हणून मिळाली होती. अशा वेळी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे आव्हानात्मक असत आणि ते आव्हान प्रतिक्षाने सहज पेललं.
‘कियारा’ ची तिची भूमिका तिला ओळख निर्माण करून देणारी ठरली. सुकन्या कुलकर्णी, आतिशा नाईक, चिन्मय उदगीरकर, प्राजक्ता केळकर आणि मालिकेतील सर्वच सहकलाकारांचे तिला चांगले मार्गदर्शन लाभले.
स्टार प्रवाह वरील ‘अग्निहोत्र’ मध्ये तिने समिहा ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या भूमिकेबद्दल ती म्हणते, “समिहा ही जिद्दी असते. ती आपल्या कामाच्या बाबतीत प्रचंड पॅशनेट असणारी आहे. तिचा आत्मविश्वास प्रचंड आहे. अशा वेगळ्या शेड्स त्या भूमिकेला होत्या.”
सध्या सुरु असणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ मधील ‘दिव्या सरदेशमुख’ बद्दल सांगताना ती म्हणते, “या भूमिकेला देखील विविध कंगोरे आहेत. मुळात ती वडिलांची खूप लाडकी आहे. ती शौनक च्या बाबतीत खूप पझेसिव्ह आहे. तिचे आणि शौनकचे त्यांच्या लहानपणीच लग्न ठरलेलं आहे. दिव्या ही हट्टी आहे अशा शेड्स या भूमिकेच्या सांगता येतील.”
हे वाचलंत का: महेश लिमये घेऊन आले आहेत ह्यावर्षी आशेची रोषणाई.
प्रतिक्षाने आणखी एका नवीन प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे आणि तो म्हणजे तिच्यावर आणि अभिनेता अभिजित आमकर यांच्यावर चित्रित झालेलं ‘बोटीनं येशील का’ हे गीत नुकतंच रिलीज झाले आहे. मुळात हे एक कोळी गीत असले तरी या गीताचा बाज खूप वेगळा आहे. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात हे गीत चित्रित झाले आहे आणि त्याला खूप उत्तम प्रतिसाद लाभत आहे. “आभाळी सजली चंद्राची कोर, तशी दिसतेय भारी ही कोळ्याची पोर” असे या गीताचे बोल आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका सातत्याने करत राहणे हे प्रतिक्षाचे ध्येय आहे.