‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
हेमा मालिनीचा मेट्रो, रिक्षा प्रवास आणि बरंच काही
मोठ मोठ्या माणसांची ‘छोटी छोटी सी बात’ ही मोठीच गोष्ट असते. सेलिब्रिटीजच्या छोट्या छोट्या गोष्टींना तर न्यूज व्ह्यॅल्यू असतेच असते. कशाचीही बातमी करता यायला हवी असेच आजचे ‘डिजिटल युग’ आहे. हेमा मालिनीने मुंबईतील ट्रॅफिक जॅमला कंटाळून डी. एन. नगरपर्यंत अर्थात अंधेरी पश्चिमपर्यंत मेट्रोने प्रवास केला आणि मग रिक्षाने त्या जुहू येथील आपल्या बंगल्यावर पोहचल्या आणि त्या अशा रिक्षाने आल्याचे पाहून त्यांच्या बंगल्याचा वाॅचमन अवाक झाला याची चक्क बातमी झाली. त्यांना जुहू ते दहिसर या प्रवासाला आपल्या गाडीने जायला केवळ ट्रॅफिक जॅममुळे चक्क दोन तास लागल्याने त्या कंटाळून गेल्या. खुद्द हेमाजींनी (Hema Malini) मेट्रोतील आपल्या प्रवासात आपल्या चाहत्या आपल्यासोबत सेल्फी काढत आहेत याचा ‘बोलका’ व्हिडिओ ट्वीट केला. त्या फॅन्सही या सुखद धक्काने सुखावल्याचे त्यांच्या देहबोलीतून जाणवतेय. सेलिब्रिटीजची जवळपास प्रत्येक पोस्ट जणू एक बातमी झालीय असेच आजचे माहिती व मनोरंजनाचे भन्नाट युग झालेय म्हणून ही देखील न्यूज झालीच. यामुळेच थोडी वेगळी बातमी आली हेही तितकेच महत्वाचे.
मुंबईतील ट्रॅफिक जॅमची समस्या सर्वानाच भेडसावत आहे, म्हणून तर हेमाजीना (Hema Malini) मेट्रोतून प्रवास करावा लागला म्हणून आता या ट्रॅफिकवर अतिशय तातडीने उपाय केला जातोय का पाहूया. तेवढीच ‘चर्चा तर होणारच.’ हेमाजींनी (Hema Malini) रिक्षातून प्रवास करणे नवीन नाही अथवा हे पहिल्यांदाच घडले नाही. काही वर्षांपूर्वी फिल्म फेअरला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एकदा म्हटलं होतं, त्या जुहूच्या इस्कॉन मंदिरात त्या अनेक वर्ष रोज सकाळीच जात आहेत. त्यांच्या दिवसाची सुरुवातच या गोष्टीने होते. एकदा काय झालं तर, जुहूमधील आपल्या बंगल्यातून नेहमीप्रमाणेच इस्कॉनला जायला निघताच त्यांच्या लक्षात आले, आपला ड्रायव्हर अद्याप आलेला नाही. म्हणून अधिक वाट न पाहता त्यांनी रिक्षाने जायचा निर्णय घेतला. तसं पाहिलं तर अंतर काही फार नव्हतेच. पण रिक्षातून उतरताच त्यांच्या लक्षात आले की, आपण सोबत पर्स घ्यायला विसरलो. त्यात आपले पैसे असतात.
हेमाजींचा (Hema Malini) हा अनुभव बरेच दिवस चर्चेत होता. हा अनुभव वाचताना उगाच मनात प्रश्न येत होता, हेमा मालिनी आपल्या रिक्षात बसल्याचा त्या रिक्षावाल्याला किती आनंद झाला असेल ना? पण त्याचा हा सकाळचा आनंद इतर रिक्षावाल्यांना अजिबात खरा वाटला नसेल. ते त्याचे स्वप्न वाटले असेल. त्याच्यापेक्षा यावेळचा रिक्षावाला भारीच नशीबवान. हेमाजींनी (Hema Malini) आपण रिक्षात बसल्याचा व्हिडिओही पोस्ट केला आणि ‘शोले’तील बसंतीप्रमाणे त्या बोलतही होत्या. बहुतेक रिक्षातून त्यांना अंधेरीतील डी. एन. नगरचा परिसर, जुहूपर्यंचा रस्ता वेगळा वाटला असावा. या प्रवासातील हे मात्र वेगळेपण ठरते. आपण कशातून प्रवास करतोय यावरुन जग समजते म्हणावे.
अक्षयकुमारनेही असाच एकदा मेट्रोतून प्रवास करत ‘आपण जनसामान्यांतीलच एक आहोत’ असाच जणू फिल दिला. तोही व्हिडिओ व्हायरल झाला. कोणताही कलाकार पडद्यावर स्टार असतो. प्रत्यक्षात तोही तुमच्या माझ्यासारखा हाडामासाचा माणूसच. पण फॅन्सच त्यांना जणू ‘वलयाच्या पिंजर्या’त पाहू अथवा ठेवू इच्छितात. कधी ते सेलिब्रिटीजला सुखावणारेही असते. चाहते त्यांचे जणू टाॅनिक असते. फॅन्स फाॅलोअर्सचे लाईक्स त्यांना सुखावतात आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत त्यांना अधिकाधिक लाईव्ह अनुभव येतो. काही दिवसांपूर्वीच वर्षा उसगावकरने काही कारणास्तव आपल्या गाडीऐवजी मुंबई लोकलने आपण प्रवास केल्याचा फोटो सोशल मिडियात पोस्ट करताच त्या फोटोला भरभरुन लाईक्स मिळाल्याच पण त्याची चक्क बातमीही झाली. वर्षाच्या अनेक फॅन्सनी तिच्यासोबत सेल्फी काढला. कोणी अगदी सहजच तिच्या फिटनेसचे कौतुक केले. हे सगळेच सेलिब्रिटीजला सुखावणारे.
तात्पर्य, या सेलिब्रिटीज लोकल ट्रेन अथवा मोनो/ मेट्रोतून आणि अगदी रिक्षातून प्रवास करतात एवढीच ही सरळ रेषेत जाणारी गोष्ट नसते. त्यात कळत नकळतपणे अनेक बारकावेही असतात. पडद्यावरचे हे स्टार वेगळ्याच विश्वात वावरतात असे मानणारा भाबडा चित्रपट प्रेक्षक पूर्वी होता. असे ‘रुपेरी पडद्यावरील स्टार’ प्रत्यक्षात दिसावेत असे अनेक फिल्म दीवाने स्वप्न पाहतात आणि अशातच अजिबात ध्यानीमनी नसताना अशी एकादी सेलिब्रिटीज आपली सहप्रवाशी असल्याचा चक्क लाईव्ह अनुभव मिळतो.
=====
हे देखील वाचा : ‘शांकुतलम’ची पहिल्या आठवड्याची बुकींग हाऊसफुल्ल
=====
रमेश देव यांनी एकदा मला याबाबत वेगळा किस्सा सांगितला. जुहू वर्सोवा लिंक रोडवरील आपल्या निवासस्थानावरुन आपल्या गाडीने मंत्रालयला जाताना एकदा त्यांनी विचार केला, आपण वातानुकूलित बेस्ट बसने जाऊया. एक नवीन अनुभव मिळेल. अशा विचाराने ते बस स्टॉपवर उभे असतानाच एक गाडी त्यांना पाहून थांबली. त्यात त्यांचा चाहता होता. तो म्हणाला, या बसा. कुठपर्यंत जाताय तुम्ही? मी तुम्हाला लिफ्ट देतो आणि खरोखरच त्या चाहत्याने त्यांना दक्षिण मुंबईत आपल्या गाडीने नेले देखील. सेलिब्रिटीजच्या प्रवासाचे रंग हे असे केवढे तरी त्यांना नवीन अनुभव देणारे. सोशल मिडियात बातमी होणारे आणि त्यांनाही कधी अंतर्मुख करणारे.