युसुफ खानचा दिलीपकुमार कसा झाला?
अभिनेता दिलीप कुमार यांचा रुपेरी पडद्यावर प्रवेश कसा झाला ही फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. चाळीसच्या दशकाच्या सुरुवातीला युसुफ खान (दिलीपचे खरे नाव) त्यांच्या वडिलांसोबत मुंबई, नाशिक, पुणे इथे फळांचा व्यापार करत होते. एकदा युसुफ खान आपल्या वडिलांसोबत नैनीतालला फळांच्या व्यापारासाठी गेले होते. ही गोष्ट साधारणतः चाळीसच्या दशकाच्या सुरुवातीची असावी. याच वेळी त्याला नैनीतालला बॉम्बे टॉकीज देविका राणी आणि बॉम्बे टॉकीजचे दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती हे देखील त्यांच्या आगामी सिनेमाचे लोकेशन्स पाहण्यासाठी तिथे आले होते. तिथेच देविका राणी आणि युसुफ खान (Yusuf Khan) यांची पहिली भेट झाली.
पहिल्या भेटीतच युसुफ खानच्या (Yusuf Khan) पर्सनैलिटीने देविका प्रभावीत झाल्या. मुंबईला आल्यानंतर बॉम्बे टॉकीजला येऊन भेटण्याचा सल्ला त्यांनी दिला. कारण त्यावेळी अशोक कुमारने बॉम्बे टॉकीज सोडली होती आणि देविकाला अशोक कुमारची रिप्लेसमेंट म्हणून नवीन नायक हवा होता. युसुफ खानमध्ये (Yusuf Khan) त्यांनी नवा नायक पाहिला. देविका राणी आणि तिचे पती हिमांशु राय यांनी १९३४ साली मुंबईच्या मालाड इथे बॉम्बे टॉकीजची स्थापना केली होती. ग्यान मुखर्जी दिग्दर्शित ‘किस्मत’ या १९४३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटानंतर शशिधर मुखर्जी आणि अशोक कुमार बॉम्बे टॉकीज मधून बाहेर पडले. त्यामुळे देविकाराणीला मोठा धक्का बसला. नायक म्हणून नवीन चेहरा शोधणे आता गरजेचे झाले होते.
इकडे मुंबईत आल्यानंतर काही दिवसानंतर बॉम्बे टॉकीज ऑफिसमध्ये युसुफ खानला देविका राणीला भेटायला गेले. त्या काळात दुसरे महायुद्ध चालू होते आणि फळांचा व्यापार म्हणावा तितका नफा मिळवून देत नव्हता त्यामुळे अॅक्टींग मध्ये फारसा इंटरेस्ट नसतानाही युसुफ खान बॉम्बे टॉकीज मध्ये देविका राणीला भेटायला गेले. देविका राणीने दिलीपला त्याच्या टॉकीज मध्ये येण्याची ऑफर दिली. तिथे भगवती प्रसाद वर्मा देखील उपस्थित होते देविका राणीने त्यांना विचारलं, ”तुम्हाला हा नायक म्हणून कसा वाटतो?” त्यांनी ,”ठीक आहे.” म्हणून सांगितले. तरी देविकाचे तितकेसे समाधान झाले नाही. मग तिने बॉम्बे टॉकीजचे सल्लागार है महेंद्र चौधरी यांना हाच प्रश्न विचारला. त्यावेळेला त्यांनी सांगितले ,” कुठल्याही कलाकाराला चेहऱ्यावरून आपण अभिनय कसा करेल हे सांगू शकत नाही. त्याला आपण आपल्या टॉकीजमध्ये ठेवून घेऊत. योग्य वाटला तर ठेवूत नायतर दुसरा विचार करू.” अशा पद्धतीने युसुफ खानला पाचशे रुपये महिना या पगारावर बॉम्बे टॉकीज वर ठेवून घेतले. त्याच्यासोबत तीन वर्षाचा रीतसर करार केला. देविका राणीला युसुफ खान (Yusuf Khan) या नावाबद्दल देखील थोडासा आक्षेप होता. तिने सांगितले,” हे नाव आपल्याला बदलायला लागेल.” त्यावेळी बॉम्बे टॉकीजमध्ये नरेंद्र शर्मा काम करत होते. त्यांनी तीन नावांचा प्रस्ताव देविका राणी समोर ठेवला.
=======
हे देखील वाचा : भिकार्याच्या वेशात येऊन जया भादुरीला कुणी घाबरवले?
=======
वासुदेव, जहांगीर आणि दिलीप कुमार. युसुफ खानला स्वतःला ‘जहांगीर’ हे नाव आवडले होते .पण बॉम्बे टॉकीज आणि देविका राणीने दिलीप कुमार या नावाला फायनल केले. याचे कारण त्यांच्या आधीच्या हिरोचे नाव अशोक कुमार होते! कुमार हे नाव बॉम्बे टॉकीज साठी लकी होते म्हणून त्यांनी दिलीप कुमार हे नवीन बारसे केले आणि दिलीप कुमारचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला! १९४४ साली दिलीपकुमारचा पहिला चित्रपट झळकला ‘ज्वार भाटा.’ २९ नोव्हेंबर १९४४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटात दिलीप कुमारची नायिका मृदुला रानी होती. या चित्रपटाला संगीत अनिल विश्वास यांचे होते तर चित्रपटाचे दिग्दर्शन अमिया चक्रवर्ती यांनी केले होते. बॉम्बे टॉकीज सोबत केलेल्या करारामुळे दिलीप कुमारला तीन वर्ष या चित्र संस्थेसोबत राहणे गरजेचे होते. या काळात त्याने आणखी दोन चित्रपट बॉम्बे टॉकीज सोबत केले.
एक होता १९४५ साली आलेला ‘प्रतिमा’. या चित्रपटाचे दिग्दर्शन पी. जयराज यांनी केले होते. तर त्यानंतरचा चित्रपट होता ‘मिलन’. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन बोस यांनी केले होते. हा चित्रपट गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नौकाडूबी’ या कादंबरीवर आधारित होता. यानंतर मात्र दिलीप कुमार बॉम्बे टॉकीज मधून बाहेर पडला आणि नूरजहान सोबत त्याने ‘जुगनू’ हा चित्रपट केला. १९४७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळात चांगला यशस्वी झाला होता आणि दिलीपच्या यशस्वी अभिनय यात्रेचा प्रारंभ झाला.
धनंजय कुलकर्णी