सिनेमाच्या जगात डमी आणि डुप्लिकेट असे दोन वेगळे प्रकार आहेत!!!
दिग्दर्शक एन.चंद्रा ह्यांनी अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘कुशान्त” या चित्रपटाच्या मुहूर्त आणि पार्टीचे आयोजन केले होते. ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘तेजाब’, ‘नरसिंह’ या चित्रपटानंतरचा एन. चंद्रा यांचा हा चित्रपट असल्याने मुहूर्तापासूनच मला कुतूहल होते. ‘तेजाब’च्या नटराज स्टुडिओतील मुहूर्ताला मी हजर राहिलो असल्याने एन. चंद्रा अगदी मुहूर्तापासूनच” येथे दिग्दर्शक दिसतो असा टच देतात याची कल्पना होती. ‘कुशान्त’च्या मुहूर्तालाही तसेच घडले. अनिल कपूर आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासह अनिल कपूरचा ‘ड्युप्लीकेट’ अशा तिघांवर हे मुहूर्त दृश्य रंगले. अनेकदा तरी मुहूर्त दृश्याचे ‘डायलॉग’ अगोदरच रेकॉर्ड केले जातात, याचे कारण म्हणजे हे भव्य मुहूर्त म्हणजे केवळ एक ग्लॅमरस शो असतो… मुहूर्तानंतरच्या पार्टीत चंद्रांशी संवाद साधला असता ते म्हणाले की शूटिंगच्या वेळी काही टेक्निक अथवा ट्रीक वापरुन अथवा अगदी नंतर एडिटींगने पडद्यावर डबल रोल दाखवता येतो. पण येथे कसा दाखवणार? म्हणून ‘रामगढ के शोले’ मध्ये अनिल कपूरची ड्युप्लीकेट साकारलेल्या कलाकाराला आणले….
एन. चंद्रा यांच्या कल्पकतेला मी मनोमन दाद दिली.
पण हा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला. निर्माता नंदू तोलानी यांच्या काही प्रॉब्लेममुळे तसे झाले. एन.चंद्रांशी अधूनमधून मोबाईलवर गप्पा रंगतात तेव्हा या चित्रपटाची आठवण आम्ही काढतो.
दुसरा किस्सा अगदी वेगळा आहे. सहा सात वर्षांपूर्वी वृत्तपत्रात एक वेगळीच बातमी वाचली.
‘मीच राजेश खन्नाचा खरा ड्युप्लीकेट’ असा दोन नकली राजेश खन्नानी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुध्द गुन्हा दाखल केला’.
सुरुवातीला या वृत्ताचे खूप आश्चर्य वाटले. पण चित्रपटसृष्टीतून अधिक शोध घेताना लक्षात आले की, त्यातील एक एखाद्या चित्रपटात पाठमोरा अथवा तिरका उभा राहून राजेश खन्नाची भूमिका साकारायचा, (एखाद्या हीरोची तारीख मिळाली नाही अथवा पाठमोरी दृश्ये असली की असे ड्युप्लीकेट असतात. एडिटींगमध्ये ते व्यवस्थित मॅच होते). तर ‘दुसरा’ नकली राजेश खन्ना हा ऑर्केस्ट्रात होता. एक ओरिजिनलमुळे किती ड्युप्लीकेट जगत असतात बघा.
सिनेमाच्या जगात डमी आणि ड्युप्लीकेट असे दोन प्रकार आहेत. डमी प्रामुख्याने अॅक्शन दृश्यात वापरली जाते. मूळ हीरोच्या शरीरयष्टीशी मिळतीजुळती असे डमी अनेक वर्षे घोडेस्वारी, हेलिकॉप्टरला लटकणे, वेगवान कार रेस, जोरदार मारधाड अशी दृश्ये देतात आणि अधूनमधून मूळ कलाकाराचा क्लोजअप त्यात असतो. कधी लॉंग शॉट्सच्या डान्समध्ये असे डमी असतात. पुरुष आणि स्त्री असे दोन्ही प्रकारचे डमी या व्यवसायात आहेत. स्टार्सची पिढी बदलली तशी डमीचीही बदलली. अतिशय रिस्की अथवा जोखमीचं असे काम हे डमी करतात. कधी ‘इंटरनॅशनल क्रूक’ या चित्रपटात हेलिकॉप्टरमधून समुद्रात साहसी उडी मारण्याच्या दृश्यात धर्मेंद्रची डमीचा मृत्यूही झाला आहे…
‘ड्युप्लीकेट’ हा वेगळा प्रकार आहे. देव आनंद, राजेश खन्ना यांच्या जबरदस्त क्रेझच्या काळात गल्लीबोळातून ‘सेम टू सेम’ देव आनंद अथवा राजेश खन्ना खूप असत. आपले मूळ व्यक्तिमत्व बाजूला सारत त्यांनी देवभक्ती अथवा खन्नाभक्ती स्वीकारली. तर अनेक वर्षे अनेक वाद्यवृंदात काही स्टार्सचे ड्युप्लीकेट असल्यागत काही जण मनोरंजन करीत.
या ड्युप्लीकेटना पहिल्यांदा ‘असली हीरो’ केले ते आय.एस.जोहर या अष्टपैलू कलंदराने! त्यानी जणू या ड्युप्लीकेटना ग्लॅमर दिले. आय.एस.जोहर आजच्या ग्लोबल पिढीला कदाचित माहित नसेल. पण साठ सत्तरच्या दशकात हा ‘अतरंगी’ म्हणून ओळखला गेलेला अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक होता. तो अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटात ‘सूचनेनुसार’ भूमिका करे, म्हणून त्या रंगत (विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’ हे एक चांगले उदाहरण, यात तो त्रिपल रोलमध्ये आहे). पण स्वतःच्या चित्रपटात तो ‘काय वाट्टेल ते’ करण्याचे स्वातंत्र्य घेई.
आय.एस.जोहरने १९७५ साली राजेश खन्नाचा ड्युप्लीकेट राकेश खन्ना आणि शशी कपूरचा ड्युप्लीकेट शाही कपूर यांना चक्क हीरो करुन ‘फाईव्ह रायफल्स’ नावाचा भंकसगिरी करणारा चित्रपट निर्माण केला. त्यात त्याची मुलगी अंबिका जोहर ही नायिका होती. या चित्रपटात त्याने अझिझ नाझाच्या ‘झूम बराबर झूम शराबी’ या कव्वालीचा वापर केला. या चित्रपटाने मुंबईत मोती टॉकीजमध्ये चक्क शंभर दिवसाचे यश मिळवले याचे आश्चर्य नाही (जोपर्यंत नवीन चित्रपटाच्या फस्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याच्या यशापयशाची कधीच खात्री देता येत नाही. आणि कोणता चित्रपट पसंत केला जाईल याची हुकमी मेथड नाही), पण त्याच वर्षी रिलीज झालेल्या (मेन थिएटर ड्रीमलॅन्ड) ‘असली’ राजेश खन्ना आणि शशी कपूर असलेल्या राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ पेक्षा ‘फाईव्ह रायफल्स’ जास्त हिट ठरला यावरुन आय. एस. जोहरने खिजवले हीदेखील एक फिल्मी संस्कृती आहे. या यशाने आय.एस.जोहरचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने ‘नसबंदी’ (१९७८) या चित्रपटात राकेश खन्ना, शाही कपूर यांच्या जोडीला अनिताव बच्चन (म्हणजे अमिताभ बच्चन), कनौज कुमार (मनोजकुमार), शत्रुबिन सिन्हा (शत्रुघ्न सिन्हा) असे आणखीन काही ‘ड्युप्लीकेट’ हिरो पडद्यावर आणले. त्यात शॉटगन सिन्हा वगैरेचा समावेश होता.
प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीत असे ‘ड्युप्लीकेट’ स्ट्रगलर म्हणून निर्मात्यांच्या भेटीगाठी घेऊ लागले. त्यातील काहीनी ऑर्केस्ट्रात करियर करुन अनेक देशांमध्ये शो केले. सिनेमा हे एकच असे क्षेत्र आहे जेथे ‘नकली’ मालालाही चांगला उठाव आहे. देव आनंदचा ‘नकली’ किशोर भानुशाली हे उत्तम उदाहरण आहे. नव्वदच्या दशकात अनेक मनोरंजक चित्रपटात त्याने देवसाहेबांची नक्कल करत धमाल उडवली. त्याचे यश पाहून त्याचीच मुलाखत घेतली. जोगेश्वरी पूर्वला नटवर नगरमध्ये त्याच्या घरी गेलो असता त्याने मला सांगितले, सिनेमातून त्याला मिळत असलेली लोकप्रियता त्याला देश विदेशात स्टेज शोसाठी उपयोगी पडते आणि खुद्द देव आनंदचीही त्याने एकदा भेट घेतली होती.
अशातच एकदा निर्माता अजित देवानी याच्याकडून ‘रामगढ के शोले’ या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आमंत्रण आले आणि माझे कुतूहल जागे झाले. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) हा माझ्या सर्वाधिक आवडत्या चित्रपटातील एक असल्याने हा प्रकार काय आहे याची उत्सुकता होती. ‘शोले’तील गब्बरसिंग (अर्थात अमजद खान) जेलमधून सुटतो आणि त्याला देव आनंद, अमिताभ बच्चन, अनिल कपूर आणि गोविंदा यांचे ‘ड्युप्लीकेट’ किडनॅप करतात असा अफलातून प्रकार रंगला. किशोर भानुशाली अर्थात देव आनंद, विजय सक्सेना (अमिताभ बच्चन) यांच्यात ‘खराखुरा’ अमजद खान असा भन्नाट माल मसाला मिक्स प्रकार होता. ही थीम वाईट नव्हतीच. विशेष म्हणजे ‘शोले’ तुफान हिट ठरलेल्या मिनर्व्हा थिएटरमध्येच ‘रामगढ के शोले’ (२२ जून १९९१) रिलीज झाला. अर्थात, या चित्रपटाचे आयुष्य मुंबईत दोन आठवड्याचे होते तरी देशातील अनेक छोट्या छोट्या शहरात हा चित्रपट तुफान चालला आणि मग विजय सक्सेनाला अर्थात अमिताभच्या ड्युप्लीकेटला आणखीन काही चित्रपट मिळाले. त्यात एक होता, बसंती टांगेवाली आणि त्यात अर्थातच हेमा मालिनीची ड्युप्लीकेट नायिका होती…..
‘ड्युप्लीकेट’ची ही न संपणारी स्टोरी आहे. मराठीतही दादा कोंडके यांचा असाच एक ड्युप्लीकेट होता, आणि दक्षिणेतील रजनीकांतच्या ड्युप्लीकेटने ‘ओरिजिनल’पेक्षा जास्त मुलाखती दिल्या. खरा रजनीकांत क्वचितच मुलाखती देतो, याचे कारण म्हणजे त्याची क्रेझ त्यापेक्षा भारी आहे…
हे ‘नकली’ असली हीरो आहेत. त्यांचेही आपले चित्रपट आहेत. ‘रामगढ के शोले’च्या यशानंतर त्याचाच दिग्दर्शक अजित देवानी याने सुभाष घई निर्मित आणि मुकुल आनंद दिग्दर्शित ‘त्रिमूर्ती’ या चित्रपटाचे ‘तीन मोती’ (१९९५) या नावाने बिडंबन केले. पण रंगले नाही. त्या चित्रपटात शाहरूख खान आणि संजय दत्त (मूळ चित्रपटात सुरुवातीला संजय दत्तच होता, पण मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी त्याला पुन्हा गजाआड जावे लागले होते, मग अनिल कपूर आला) यांचे ‘ड्युप्लीकेट’ होते आणि मूळ चित्रपटाची पार्टी रंगलेल्या जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्येच याही चित्रपटाची पार्टी रंगली….
दिलीप ठाकूर