
Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक वर्ड !
बऱ्याचदा गीतकराला गाण्यात हवे असलेले शब्द ऐनवेळेला आठवत नाहीत, सापडत नाही. निर्मात्याला पाहिजे असलेला हुक वर्ड त्याला काही केल्या मिळत नाही. प्रतिभावान गीतकाराची प्रतिभा कधी कधी अशी ऐनवेळी दगा देते. सोपं असतं पण तेच नेमकं त्यावेळी सुचत नसतं. असाच काहीसा प्रकार गीतकार इंदीवर (Indeevar) यांच्याबाबत झाला होता. तीन चार दिवस ते हव्या त्या शब्दांसाठी झटत होते, पण काही केल्या हवे तो शब्द मिळत नव्हता. पण या चित्रपटाचे संगीतकार आनंदजी यांनी तो हुक वर्ड दिला आणि मग गीतकाराने त्यावर एक सुपरहिट गाणे लिहिले. हे गाणे इतके लोकप्रिय ठरले की तब्बल ३०-३५ वर्षानंतर शाहरुख खानला या गाण्याचा मोह पडला आणि त्याने हेच गाणे नव्या स्टाईलमध्ये त्याच्या ‘रईस’ या मुव्हीमध्ये घेतले! चाळीस वर्षानंतर देखील या गाण्याची लोकप्रियता आजही अबाधित आहे. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता नेमका किस्सा?

निर्माता दिग्दर्शक फिरोज खानने आपल्या एफ के इंटरनॅशनल या बॅनरखाली १९८० साली कुर्बानी हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट सुरुवातीपासूनच मोठ्या स्केलवर बनत होता. या चित्रपटात डिस्को क्वीन नाझिया हसन हिचे ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये…’ हे बेफाम गाणं होतं. या गाण्याने भारतात डिस्को युग खऱ्या अर्थाने सुरु झालं. Feroz Khan आपल्या चित्रपट निर्मिती करताना कुठलीही कसर सोडत नसे. त्याच्या सिनेमाचे सेट्स, विदेशातील शूटिंग्स, थरारक रेस, उंची हॉटेल्स, सेक्स, महागड्या गाड्या दाखवताना तो कुठेही काटकसर करत नसे. ‘Qurbani’ च्या वेळी नेमकं हेच चाललं होतं. (Indeevar)
‘कुर्बानी’ मध्ये त्याला हरेक प्रकारचं गाणं त्याला हवं होतं. त्याने त्यात कव्वाली घेतली होती. ‘कुर्बानी कुर्बानी कुर्बानी अल्लाह को प्यारी है कुर्बानी’, एक अप्रतिम युगलगीत घेतले होते ‘क्या देखते हो सुरत तुम्हारी’, एक अरेबियन म्युझिक वरील ‘हम तुम्हे चाहते है ऐसे’ हे गाणं घेतलं होतं, नाझिया हसनचे जबरदस्त डिस्को गीत होतेच. आता फिरोज खानला या चित्रपटात एक कॅब्रे डान्स नंबर हवा होता. (Untold stories)
त्यासाठी त्याने गीतकार इंदीवर (Indeevar) यांना गाण्याची सिच्युएशन सांगितली. एक फडकते कॅब्रे सॉंग लिहायला सांगितले. इंदीवर प्रतिभावान संगीतकार. पण या वेळी त्यांची प्रतिभा त्यांना दगा देत होती! अनेक प्रकारचे अनेक मुखडे फिरोज खानला ते दाखवत होते. पण फिरोझला ते काही पसंत पडत नव्हते. एक पंच हवा होता. पब्लिकला पटकन अपील होईल असे शब्द हवे होते. म्हटलं तर काम सोपं होतं पण काही केल्या जमत नव्हतं. दोन-तीन दिवस असेच गेले.

शेवटी एकदा गाडीतून घरी जात असताना फिरोज खानला संगीतकार Kalyanji–Anandji पैकी आनंदजी म्हणाले, ”मी काही शब्द सुचवू का?” फिरोज खानने ‘हो’ म्हटल्यानंतर त्यांनी शब्द सांगितले ’लैला मै लैला कैसी हू लैला हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला…’ आणि लगेच त्यांनी आपल्या हाताच्या चुटकीच्या बीटवर त्याची धून देखील बनवली. फिरोज खान जागच्या जागी उडालाच. तो म्हणाला, ”अरे य्यार… हेच तर पाहिजे होतं!” दुसऱ्या दिवशी त्यांनी गीतकार इंदीवरला बोलावून ती ओळ ऐकवली. इंदीवरला (Indeevar) देखील ती ओळ खूप आवडली आणि लगेच त्यांनी एका झटक्यात त्याचे पुढचे तीन अंतरे लिहून काढले! एक फर्स्ट क्लास क्लब कॅब्रे सॉंग तयार झाले होते.
============
हे देखील वाचा : धर्मेंद्र आणि राखी यांचा ‘Jeevan Mrityu’
============
हे गाणं कांचन या गायिकेने गायले. सोबतीला अमित कुमारचा स्वर होता. कांचन ही गायिका म्हणजे कल्याणजी आनंदजी यांचे बंधू बाबला (आर्केस्ट्रा वाले) यांची बायको. तिने तशी खूप कमी गाणी गायली. पण जेवढी गाणी ती सगळी लोकप्रिय ठरली. अशा प्रकारे इंदीवर (Indeevar) ज्या हुक वर्ड्स पासून चार-पाच दिवस तळमळत होते ते अचानकपणे संगीतकार आनंदजी यांनी सांगितले आणि हे हिट गाणं तयार झालं. २० जून १९८० या रमजान ईदच्या मुहूर्तावर ‘कुर्बानी’ प्रदर्शित झाला आणि प्रचंड लोकप्रिय ठरला. यातील हरेक गाणं पब्लिकन डोक्यावर घेतले होते.