Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक
साठच्या दशकातील सुपरस्टार शम्मी कपूर आणि सत्तरच्या दशकातील सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या करीयर ला हातभार लावण्यात अनेक दिग्दर्शकांचा मोठा सहभाग होता पण दिग्दर्शक शक्ती सामंत यांचा मात्र सिंहाचा वाटा होता हे मान्य करावेच लागेल.शक्तिदा च्या दिग्दर्शनाची आज देखील सिने वर्तुळात आदरपूर्वक चर्चा होते. रूपेरी पडद्यावरील नायिकांची प्रतिमा त्यांनी प्रगल्भ केली.व्यावसायिकतेला कलात्मकतेची जोड देत ते एक परिपूर्ण चित्रपटाची निर्मिती करत.

चित्रपटाच्या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून कोणत्याही बाबींकडे दुर्लक्ष न करता ते रसिकांना तब्बल तीस वर्षे एकाहून एक चित्रपटांची मेजवानी पेश करीत होते.शम्मीकपूर करीता साठच्या दशकात त्यांनी ७ चित्रपट बनवले त्यातील पाच सिनेमे सुपर हिट ठरले.राजेशकरीता तर ते गॉडफादरच ठरले. १९६९ साली आलेल्या ‘आराधना’ने सिनेमाची सारी समीकरणे बदलून टाकली. हा सिनेमा चित्रपटाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला. शक्तिदा आणि राजेश हे कॉम्बिनेशन पुढे सात चित्रपटात पार १९८५ पर्यंत दिसले. सत्यजित रे यांच्या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर झळकलेली शर्मिला टागोर शक्तीदांच्या ‘कश्मीर की कली’ मधून हिंदी सिनेमात आली. तिच्या सोबत देखील त्यांचे प्रदीर्घ असोसिएशन राहिले.
अप्रतिम लुभावणार संगीत,भावोत्कट कथानक,साचेबंद पटकथा,गाण्यांच्या शब्दावर विशेष लक्ष, कलाकारांकडून योग्य अभिनय करवून घेण्याचे कसब आणि चित्रपटाला लाभलेली ओघवती गती हि शक्ती सामंत यांची गुणवैशिष्ट्ये म्हणता येतील. समकालीन दिग्दर्शकांसोबत तुलना करतान एक बाब स्पष्ट जाणवते ती अशी की शक्ती सामंत यांच्या चित्रपटात व्यावसायिक मूल्य आणि कलात्मकता याचा सुरेख संगम दिसून येतो. शक्ती सामंत यांचा जन्म प बंगाल मध्ये १३ जानेवारी १९२५ रोजी झाला. पितृछत्र बालवयात च हरवल्याने त्यांचा सांभाळ काकांनी देहरादून येथे केला.
================================
हे देखील वाचा: Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
=================================
देखणा चेहरा आणि रूवाबदार व्यक्तीमत्व लाभलेल्या शक्ती सामंत यांना चित्रपटात हिरो म्हणून चमकायचे होते त्या मुळे १९४४ साली पदवी प्राप्त केल्यावर ते तडक मायानगरी मुंबईत धडकले.पण सगळंच काही सोप्प नव्हतं. संघर्ष कुणाला चुकला नाही? चित्रपटाच्या दुनियेत काही जमत नाही म्हणून ते चक्क दापोलीला शिक्षक म्हणून रुजू झाले! पण सिनेमाचं भूत काही डोक्यातून जात नव्हतं. बॉम्बे टॉकीज मध्ये बंगाली कलाकारांना चांगला स्कोप आहे हे समजल्याने उमेदवारीकरीता त्यांच्या चकरा चालूच होत्या. दादामुनी अशोककुमार यांनी त्यांना हिरोपेक्षा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला. फणी मुजुमदार,ग्यान मुखर्जी यांच्याकडे त्यांनी दिग्दर्शनाचे धडे गिरवले.

१९५५ साली त्याना पहिला चित्रपट ‘बहु’ दिग्दर्शन करण्यास मिळाला. या सामाजिक चित्राला यश न मिळाल्याने त्यानी ट्रॅक बदलला.अशोककुमार ला घेवून त्यांनी ‘इन्स्पेक्टर’ हा चित्रपट बनविला त्याला माफक यश मिळाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना त्यांनी ग्यान मुखर्जी ची शैली वापरली. गुन्हेगारी थाटाची चित्र शैली रसिकांना आवडते हे त्यांच्या लक्षात आले. पुढचे शेरू आणि हिल स्टेशन (नई मंझील नई राहे नया हैं कारवां अपना) चांगले हिट ठरले. म्युझिकल क्राईम थ्रिलर हा फंडा डोक्यात ठेवून त्यांनी १९५७ साली स्वत:च्या ‘शक्ती फिल्म्स’ ची स्थापना करून पहिली निर्मिती केली, हावडा ब्रिज! अशोक कुमार, मधुबाला,हेलन, के एन सिंग हि स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाला संगीत ओ पी नय्यर यांचे होते.
‘आईये मेहरबान’ आणि ‘मेरा नाम चिन चिन चू’ या अनुक्रमे आशा आणि गीता दत्तने गायलेल्या गाण्यांनी कहर लोकप्रियता हासील केली.आता शक्ती सामंत प्रस्थापित दिग्दर्शक बनले. त्यांनी १९५९ साली ‘इन्सान जाग उठा’ हा सामाजिक चित्रपट मधुबाला आणि सुनील दत्त याना घेवून बनवला . कथानक चांगले होते गाणी सचिनदा यांनी स्वरबद्ध केली होती. (चांदसा मुखडा क्यूं शरमाया, जानूं जानूं री काहे खनके रे तोरा कंगना ) पण सिनेमाला हवं तसं यश नाही मिळू शकले. साठच्या दशकाच्या आरंभी त्यानी शम्मीकपूरला घेवून ‘सिंगापूर’ आणि ‘किशोरकुमार ला घेवून ‘नॉटी बॉय’ हे सिनेमे बनविले. १९६२ साली त्यांनी शम्मी, शकीलाला घेवून ‘चायना टाऊन’चे दिग्दर्शन केले. ‘बार बार देखो हजार बार देखो’ हे रफीचे गाणें आणि शम्मीचा निराळा लूक सर्वाना पसंद पडला. साठच्या दशकात हिंदी सिनेमा सप्तरंगात न्हावू लागला.

शक्तिदा यांनी शम्मी कपूर, शर्मिला टागोर याना घेऊन १९६४ ‘कश्मीर की कली’ हा चित्रपट बनविला. काश्मीरच्या नयनरम्य घाटीत खुलणारी हि संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांनी उचलून धरली.आजही या चित्रपटाच्या दृश्य प्रतिमा रसिकांच्या नजरेसमोर आहेत. शर्मिलाचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. दिवाना हुआ बादल, ये चांदसा रोशन चेहरा, बलमा खुली हवा में, इशारो इशारो में दिल लेने वाले, आणि सेक्सोफोन चा अप्रतिम वापर केलेले है दुनिया उसीकी जमाना उसीका हि ओपी ने स्वरबध्द केलेली रफी-आशा ची गाणी सिनेमाला सुपर हिट करून गेली. शर्मिला आता शक्तीदांची लाडकी अभिनेत्री बनली.

मनोजकुमार सोबत तिला त्यांनी ‘सावन की घटा’(१९६६) मध्ये चमकवले. जुल्फो को हटा दो चेहरेसे थोडासा उजाला होने दो, मेरी जान तुमपे सदके अहसान इतना कर दो, हौले हौले साजना धीरे धीरे साजना हि ओपीची गाणी मस्त जमून आली होती. यात चुलबुली मुमताज पण होती.त्या काळात परदेशात चित्रीकरणाची जबरदस्त क्रेझ होती.१९६७ साली त्यांनी ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरीस’ हा चित्रपट शम्मी कपूर आणि शर्मिला ला घेवून बनवला. यात शर्मिलाचा डबल रोल होता.प्राण यात खलनायक होता तर साईड किक राजेंद्रनाथ होता.शक्तिदा यांचा प्रत्येक चित्रपटात काही नवीन द्यायचा प्रयत्न असायचा. या संगीतप्रधान (संगीत : शंकर जयकिशन) चित्राला गुन्हेगारीचा बॅक ड्रॉप होता. आसमान से आया फरिश्ता या गाण्याच्या चित्रीकरणात शम्मीने चक्क हेलीकॉप्टर ला पकडून गाणं शूट केलं.

परदेशातील चकाचक लोकेशन्स, वेगवान कथानक (कथा सचिन भौमिक यांची होती), एकाहून एक सरस गाणी अकेले अकेले कहां जा रहे हो, रात के हमसफर, अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा या मुळे सिनेमाला बंपर यश मिळाले. या चित्रपटानंतर शक्ती सामंत यांनी ‘जाने अंजाने’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. शम्मी, लीना, विनोद खन्ना अशी तगडी स्टार कास्ट त्यात होती. पण शम्मीच्या व्यस्ततेमुळे शूटिंग लांबत गेले त्यामुळे त्यांनी राजेश शर्मिला ला घेऊन ‘आराधना’ सुरू केला. ‘जाने अंजाने’च्या मानाने हि लो बजेट फिल्म होती. राजेश चा तोवर एकही हिट सिनेमा झाला नव्हता. ‘आराधना’ ने मात्र सिनेमाची परिभाषा आणि गणितं पार बदलून टाकली.
‘कोरा कागज था ये मन मेरा’, ‘गुनगुना रहे है भंवर’,’रूप तेरा मस्ताना’, ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’, ‘बागोमें बहार है’ या गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. ‘न्यू सुपरस्टार इज बोर्न’ अशा हेडलाइन्स झळकल्या.राजेश खन्ना आणि किशोरकुमार यांच्यासाठी ‘आराधना’ हा चित्रपट आणि शक्तिदा हे दिग्दर्शक लकी ठरले.दोघांची यशोशिखराकडे जाणारी मोठी वाटचाल सुरू झाली. शर्मिला, किशोरकुमार आणि शक्ती सामंत यांना फिल्म फेयर अवार्ड मिळाले.पुढे रडत खडत ‘जाने अंजाने’(तेरी नीली नीली आंखो के दिल पे तीर चल गये) १९७२ साली प्रदर्शित झाला. तत्पूर्वी ‘पगला कहीं का’ (तुम मुझे यूं भूला न पाओगे)हा सिनेमाही आला होता.

गुलशन नंदाच्या कादंबरीवर १९७० साली त्यांनी ‘कटीपतंग’ बनविला. यात खर तर आधी शर्मिलाच नायिका असणार होती पण तिच्या प्रेग्नंसी मुळे ती भूमिका आशा पारेख ला मिळाली.नायक विधवेवर प्रेम करतो असला विषय घेवू नका असा सल्ला शक्तीदाच्या मित्रांनी दिला पण ते ठाम होते . आणि काय परफेक्ट सिनेमा बनविला! किशोरची तीन अप्रतिम सोलो (प्यार दिवाना होता है, ये जो मुहोब्बत है,ये शाम मस्तानी) लताचे अनफरगेटेबल ‘ ना कोई उमंग है ‘ आशाचे ‘ मेरा नाम है शबनम ‘ आणि मुकेशचे क्लास ‘जिस गली में तेरा घर न हो बालमा’ आर डी च्या संगिताची जादू आजही कायम आहे. १९७१ साली राजेश , शर्मिला ला घेऊन त्यांनी ‘अमर प्रेम’ हा क्लासिक चित्रपट बनविला. बंगालच्या पार्श्वभूमीवारील हि तरल प्रेमकथा गाजली त्यातील गीतांनी. आर डी यांनी शास्त्रीय संगीतावर आधारीत अप्रतिम गाणी दिली.
गीतकार आनंद बक्षी यांचे सर्वोत्कृष्ट गीताकारीचे काम बहुधा येथेच झाले असावे.चिंगारी कोई भडके (राग-भैरवी) रैना बीती जाय (राग-तोडी आणि खमाज) ये क्या हुआ (राग- कलावती) कुछ तो लोग कहेंगे (राग – खमाज) असली अल्टीमेट हिट गाणी यात होती.१९७२ साली त्यांचा ‘अनुराग’ झळकला. मौसमीचा पहिला हिट सिनेमा.राजेशचा यात गेस्ट अॅपीयरंस होता.या सिनेमाकरीता शक्तीदांना फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. पुढे राजेश सोबत त्यांनी अजनबी,अनुरोध, मेहबूबा हे चित्रपट केले. बंगाली अभिनेता उत्तमकुमार आणि शर्मिला हि पेयर घेऊन ते ‘अमानुष’(दिल ऐसा किसीने मेरा तोडा) आणि ‘आ्नंद आश्रम’ (सारा प्यार तुम्हारा मैने बांध लिया हैं आंचल में) हे दोन अभिजात चित्रपट बनवले. अमिताभ सोबतचे ‘द ग्रेट गॅम्बलर’ आणि ‘बरसात की एक रात हे सिनेमे मात्र तिकीट बारीवर फारसा चमत्कार घडवू शकले नाहीत.ऐंशीच्या दशकात त्यानी राजेशच्या होम प्रोडक्शन ‘अलग अलग ‘ चे दिग्दर्शन केले. नंतर ते पुन्हा काही काळ बंगाली सिनेमाकडे वळले.
================================
हे देखील वाचा:
=================================
शक्ती सामंत यांनी व्यावसायिक यश मिळविताना कधीही आणि कुठेही कलात्मकते सोबतची नाळ तोडली नाही. इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन वर ते काही वर्षे होते तर सेन्सोर बोर्डावर अध्यक्ष म्हणून सात वर्षे होते. त्यांच्या सिनेमांचे महोत्सव देशात आणि परदेशात आयोजित केले गेले. ९ एप्रिल २००९ रोजी त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतीय सिनेमाच्या यशस्वी दिग्दर्शकाच्या यादीत शक्ती सामंत यांचे नाव अग्रणी आहे यात तिळमात्र शंका नाही.