राजेश खन्ना जज समोर जाऊन का म्हणाले “मुझे गिरफ्तार करके जेल में डाल दो”!
भारतात बऱ्याचदा चित्रपट कलावंतांना त्यांच्या ‘स्टारडम’चा ॲटीट्युड समाजात दाखवावासा वाटत असतो. आपल्या जनमानसात असलेल्या प्रतिमेचा उपयोग (खरंतर दुरुपयोगच) समोरच्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर दबाव टाकण्यासाठी करणं, सर्वार्थाने चुकीचं असतं. पण लोकप्रियतेच्या नशेत आपण काय करतो हेच बऱ्याच वेळेला कलाकाराला कळत नाही. रील लाईफ आणि रियल लाईफमध्ये फरक असतो हे समजावून घेतच नाहीत. सुपरस्टार राजेश खन्ना याच्या बाबतीतला हा किस्सा आपल्याला हेच सांगून जातो. (IT case against Rajesh Khanna)
१९८३ साली राजेश खन्नाने त्याच्या मुंबईतील ‘आशीर्वाद’ या बंगल्यामध्ये एका मिनी थिएटरची निर्मिती केली होती. यासाठी लागणारा पैसा त्याला कुठून मिळाला होता याची नोंद त्याने ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ फाईल करताना केली नव्हती. तसेच महानगरपालिकेला देखील याची कल्पना दिली नव्हती. त्यादृष्टीने ती बेनामी प्रॉपर्टी झाली होती. कारण यासाठी कुठलीही परवानगी राजेश खन्नाने घेतली नव्हती. (IT case against Rajesh Khanna)
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने राजेश खन्नावर कोर्टात केस दाखल केली. कोर्टाकडून राजेश खन्ना यांना तीन वॉरंट पाठवली गेली. तिन्ही वेळी राजेश खन्ना किंवा त्याचे वकील कोर्टाकडे फिरकलेच नाहीत. कोर्टाला हा अपमान वाटला आणि त्यांनी फायनल वॉरंट राजेश खन्नाच्या नावाने काढलं. यावेळी राजेश खन्नाला कोर्टात उपस्थित राहणं गरजेचं होतं.
आपण स्टार आहोत, सुपरस्टार आहोत आपल्याला वेगळी ‘ट्रीटमेंट’ मिळायला पाहिजे, असं राजेश खन्नाला वाटलं. त्यामुळे तो रागातच तावातावाने सीएसटी जवळच्या कोर्टामध्ये गेला. कोर्टात अर्थातच खूप गर्दी होती. दुसऱ्या एका केसची सुनावणी चालू होती. त्यावेळी राजेश खन्ना गर्दीतून जोरजोराने बडबड करत, जज साहेबांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि हातवारे करीत जोरात म्हणाला, “माय लॉर्ड, मै गुनहगार हूं. मुझे गिरफ्तार कर लो. मुझे जेल के सलाखो के पीछे डाल दो.” (IT case against Rajesh Khanna)
त्याचे हे फिल्मी डायलॉग ऐकून तिथे जमलेल्या लोकांची करमणूक झाली असली तरी जज साहेबांना हा प्रकार अजिबात आवडला नाही. दुसरी केस चालू असताना उपटसुंभा सारखं येऊन पुन्हा ‘जज’ला अक्कल शिकवणं न्यायाधीश महोदयांना अजिबात आवडलं नाही. त्यांनी तिथल्या तिथे सुपरस्टार राजेश खन्नाला खडसावलं आणि “यापुढे तुम्ही आणि तुमचे वकील मला या ‘अवतारात’ आणि या ॲटीट्युडमध्ये दिसता कामा नये आणि तसं झालं तर कोर्टाचा अवमान समजून तुमच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.” असं सांगितलं. तसंच, “तुमची पहिली वेळ म्हणून आज मी तुम्हाला केवळ समज देत आहे!” अशी जाणीव पण करून दिली. (IT case against Rajesh Khanna)
========
हे देखील वाचा – किशोर कुमारच्या ‘या’ गाण्यातील अश्लील ओळींमुळे बप्पी दाच्या डोक्याला झाला ताप
========
राजेश खन्ना जज साहेबांचे खडे बोल ऐकून भानावर आला आणि कोर्टाची माफी मागून तो निघून गेला. न्यायमूर्ती व्ही एस पाटील यांचा त्या कोर्टातील तो शेवटचा दिवस होता दुसऱ्या दिवशीपासून ते कुर्ला कोर्टामध्ये जॉईन होणार होते. जाता जाता त्यांनी राजेश खन्ना यांना चांगलाच ‘डोस’ दिला. जज साहेबांनी म्हटल्याप्रमाणे राजेश खन्नाला पुन्हा या जजसाहेबांसमोर जाण्याचा प्रसंगच आला नाही कारण न्या. पाटील साहेब कुर्ला कोर्टात जॉईन झाले. पुढे या कोर्टात ही केस काही वर्षे चालू राहिली आणि राजेश खन्नाला ३,६१,५०६ रु. दंड भरायला लागलाच! त्यानंतर त्याची या केस मधून मुक्तता करण्यात आली. (IT case against Rajesh Khanna)