‘राधा ही बावरी’ गाणे हिट होण्यासाठी एक वर्ष लागलं!!!
काही गाणी एखाद्या गायकाच्या जीवनात एक वेगळं वळण घेऊन येतात. एखादे गाणे कालांतराने एकदम लोकप्रिय होते आणि मग ते गीत सर्वांच्या मनात कायम घर करते, असं घडलं होतं स्वप्नील बांदोडकर याने गायलेल्या ‘राधा ही बावरी’ या गाण्याच्या बाबतीत !
सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी एक कोकणी गीतांचा अल्बम संगीतबद्ध केला होता. त्यात गायक शंकर महादेवन यांनी ‘नीळ रंगान रंगला’ हे गाणे गायले होते. इंद्रजित शर्मा यांनी त्या अल्बमचे संगीत संयोजन केले होते. त्याच अल्बमसाठी स्वप्नील बांदोडकर याने देखील काही गीते गायली होती. स्वप्नील ला एकंदरीतच तो अल्बम मराठी भाषेत करण्याची इच्छा होती. त्या संबंधी तो सागरिका म्युझिकच्या सागरिका दास यांच्यासोबत बोलला. कोकणी अल्बम मराठीत करण्याच्या संदर्भात दीप कारापुरकर यांची रीतसर परवानगी सुद्धा घेतली. मग गाणी मराठीत करण्यासाठी विविध गीतकारांना सांगण्यात आलं. ‘नीळ रंगानं रंगला’ हे गाणे मात्र मनासारखे कोणाकडून लिहिले जात नव्हते. शेवटी स्वप्नील संगीतकार अशोक पत्की यांना म्हणाला की “अशोकजी, तुम्हीच हे गीत लिहा ना !” सुरुवातीला अशोक पत्की तयार नव्हते, पण स्वप्नीलने त्यांना खूप आग्रह केला कारण अशोक पत्की उत्तम लिहितात, हे त्याला माहित होते. दोन दिवसांनंतर अशोक पत्की यांनी स्वप्नील बांदोडकरला शब्द दिले,
“रंगात रंग तो श्यामरंग, पाहण्या नजर भिरभिरते;
ऐकून तान विसरून भान, ही वाट कोणाची बघते;
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी, साद ऐकुनी होई;
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी”
हे शब्द सर्वांना खूप आवडले आणि मग स्वप्निलच्या आवाजात हे गाणे ध्वनिमुद्रित पण झालं.
‘तू माझा किनारा’ या अल्बममध्ये ते गीत होते मात्र हे गाणे हिट होण्यासाठी एक वर्ष लागलं होत. त्या काळात सोशल मीडिया, यु ट्यूब या गोष्टी प्रसिद्धीसाठी सक्रिय नव्हत्या. गाण्यांच्या रेकॉर्डस्, सीडी, कॅसेट ची विक्री किती जास्त होते, याला महत्व देणारा असा तो काळ होता. एकदा स्वप्नीलला कोल्हापूरहून कोणाचा तरी फोन आला आणि त्याला विचारण्यात आलं की “राधा ही बावरी” हे गाणे तुम्ही गायले आहे का? हे गाणे खूप हिट आहे आणि त्याची महाराष्ट्रात पायरसी होत आहे. “ही गोष्ट स्वप्नीलने सागरिका यांना सांगितली. त्याचा योग्य शोध ही घेण्यात आला. पायरसी थांबवण्यात आली आणि मग ‘राधा ही बावरी’ च्या ओरिजिनल गाण्याच्या अल्बमची विक्री कमालीची वाढली. स्वप्नीलच्या आवाजाला एक नवी ओळख मिळाली. त्याने गायलेल्या मूळ गाण्यांमध्ये ‘राधा ही बावरी’ ची लोकप्रियता आजही टिकून आहे. आजही त्याला कार्यक्रम सादर करताना या गाण्याची फर्माईश केली जातेच. एफ एम रेडिओ वाहिन्यांवर सुद्धा हे गाणे तुफान लोकप्रिय झाले