
Jaya Bachchan : मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया….
ख्यातनाम दिग्दर्शक विजय आनंद अभिनयाच्या क्षेत्रात फारसे लोकप्रिय झाले नाहीत. दिग्दर्शक म्हणून मात्र तो सर्वांचा बाप होता. पण तरीही काही चित्रपटांमधून त्यानी अभिनय केला होता. जया भादुरी सोबतचा त्याचा ‘कोरा कागज’ हा चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे कथानकान जबरदस्त होते. त्या मुळेच चित्रपटाला चांगले यश मिळाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल गांगुली यांनी केले होते. १९६३ साली प्रदर्शित झालेल्या बंगाली चित्रपट ‘सात पाके बांधा’ या चित्रपटाचा हा रीमेक होता. मूळ बंगाली चित्रपटांमध्ये सुचित्रा सेन आणि सौमित्र चटर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट आशुतोष मुखोपाध्याय यांच्या कथानकावर आधारीत होता. एक साधीसुधी मध्यमवर्गीय कौटुंबिक कथा या चित्रपटाची होती. पण खूप भावस्पर्शी होती. विजय आनंद,जया भादुरी, ए के हंगल, अचला सचदेव यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. विजय आनंद यांनी या चित्रपटात प्राध्यापक सुकेश दत्त यांची भूमिका केली होती. चित्रपटाचे कथानक टिपिकल मध्यमवर्गीय घरातले होते.
विजय आनंद आणि जया भादुरी यांची मुंबईच्या बेस्ट बस मध्ये भेट होते. दोघांना एकमेकांच्या स्वभाव आवडतात. त्यांचे लग्न होते. जया लग्नावर खूष असते पण तिची आई मात्र आपल्या जावयाच्या मामुली इन्कम वर नाराज असते. त्यामुळे ती समाजात ओढून ताणून मोठमोठ्या गप्पा मारत असते. आपला जावई किती मोठा आहे त्याला आणखी किती मोठे पॅकेज मिळणार आहे, त्याचे आणखी किती मोठे मोठे प्लॅन्स आहेत…. असे खोटेच स्वप्न समाज नातेवाईक यांना दाखवत असते. विजय आनंद ला हे अजिबात आवडत नसतं. जे आहे ते एक्सेप्ट करायला पाहिजे असं त्याचं मत आहे. पण सासू मात्र त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत असते. यातून जया आणि विजय आनंद यांच्यात मतभेद निर्माण होतात आणि ते सेपरेट होतात. जयाची आई तिचे पुन्हा श्रीमंत मुलाशी लग्न करण्यासाठी तिच्या मागे लागते. पण जया विजय आनंदला विसरू विसरू शकत नाही. ती दूर गावी जाऊन शिक्षिकेची नोकरी करू लागते. शेवट अर्थातच गोड होतो. एकदा रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये हे दोघे भेटतात आणि मतभेदाची , गैरसमजाची सगळी शस्त्र गळून पडतात. आणि ते दोघे पुन्हा एकत्र येतात.

या चित्रपटातील गाणी आणि संवाद एम जी हशमत यांनी लिहिले होते. या चित्रपटात तीन गाणी होती. दोन गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती तर एक किशोर कुमार यांनी गायले होते. किशोर कुमार यांनी गायलेलं ‘मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया’ हे गाणं त्या काळात प्रचंड गाजलं होतं. त्या वर्षीच्या बिनाका गीतमालातील सर्वाधिक यशस्वी बिनाका टॉपचे ते गाणे होते. या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा दिग्दर्शक अनिल गांगुली यांनी एकदा रेडिओवरील कार्यक्रमात सांगितला होता. या गाण्याचे शब्द वाचून किशोर कुमार खूप गंभीर झाले होते. कदाचित त्यांनी त्यातील भावना स्वतःच्या आयुष्याची कोरीलेट करून घेतल्या होत्या. अतिशय गंभीर स्वरात त्यांनी हे गाणं गायलं होतं. जे प्रचंड लोकप्रिय ठरलं.
=============
हे देखील वाचा : Manoj kumar करीता किशोर कुमारने एकही गीत गायले नाही!
=============
या गाण्याला फिल्मफेअरच नॉमिनेशन मिळाले होते.( पण अवॉर्ड मात्र ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातील महेंद्र कपूरच्या ‘और नही बस और नही…’ या गाण्याला मिळाले!) ‘कोरा कागज’ हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विजेता चित्रपट ठरला. यातील लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘रुठे रुठे पिया मनावू कैसे…’ या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विजय आनंद मात्र या चित्रपटात काम करताना फारसे कम्फर्टेबल नव्हते. अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या ‘एक होता गोल्डी’ या चित्रपटात त्याचा उल्लेख आहे. या सिनेमासाठी एक मध्यमवयीन प्रौढ अभिनेता नायक म्हणून हवा होता. त्या मुळे हि भूमिका करायला कुणी तयार नव्हते. संजीवकुमार अन्य प्रोजेक्ट मध्ये बिझी असल्याने गोल्डी तथा विजय आनंद ची निवड करण्यात आली. त्याची हि भूमिका बघून त्याला एक नायिका प्रधान चित्रपट मिळाला राज खोसला यांचा ‘मै तुलसी तेरे आंगन की’. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांना या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला हा त्यांना मिळालेला एकमेव फिल्मफेअर पुरस्कार आहे.