
Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…
‘आखरी दाव’ नावाचा चित्रपट होता हे फारसं लक्षात का येत नाही, कारण तो गल्ला पेटीवर यशस्वी ठरला नाही. चित्रपटाच्या जगात कायमच यशाच्या कथा होतात. त्यातील काही यशात दंतकथाही सामिल होतात. आखरी दावबाबत काय झाले? स्टार पटकथाकार सलिम जावेद जोडीने काम करायचे त्या काळात त्यांची यशाची टक्केवारी भारी होती. या नावाला ग्लॅमर होते. वजन होते आणि त्याचा त्यांना देखील विलक्षण अभिमान होता. तो त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसे. (Entertainment News)

तरी त्यांच्या खात्यात ए. सलाम दिग्दर्शित ‘आखरी दाव’, देब मुखर्जी दिग्दर्शित ‘इमान धरम’, सुदेश इस्सार दिग्दर्शित ‘सौदा’ व रमेश तलवार दिग्दर्शित ‘जमाना’ यांचे अपयश आहेच. आमच्या पटकथेवर प्रत्येक लहान मोठ्या दृश्याचे सगळेच बारीक सारीक तपशील असतात (कॅमेरा कुठे असावा, कोणता असावा यापासून सगळेच) त्यामुळेच दिग्दर्शकाला फारसे काम राहत नाही असे एका गॉसिप्स मॅगझिनला त्यांनी दिलेल्या मुलाखतीवरुन वाद ओढवून घेणारे आपल्या या यशावर फारसे कधी काहीच बोलत नाहीत. ‘सौदा’ या चित्रपटाचे ते कधी नावच घेत नाहीत. त्याच्या पोस्टरवर त्यांचे नाव आहे. हाही चित्रपट पडद्यावर आला तोच पडला. आपण अपयशी देखिल ठरलो हे मान्य करायला काय हरकत आहे? तेवढा मनाचा मोठेपणा हवाच.

‘आखरी दाव’ या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण झाली. (मुंबईत मेन थिएटर स्वस्तिक) एव्हाना तुम्हालाही माहिती आहे १९७५ साल हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील अतिशय वेगळे व बहुचर्चित असे गाजलेले वर्ष. विशेषत: रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ मुळे तर कायमच हे वर्ष चित्रपट चर्चेच्या नकाशावर असते. आता तोच शोले प्रदर्शित होत असल्याच्या (अर्थात १५ ऑगस्ट १९७५) वातावरणात ‘आखरी दाव’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची फारशी कोणी दखल घेईल का? ते दिवसच वेगळे होते. ‘शोले’ देखिल असा व इतका खणखणीत व दीर्घकालीन यश प्राप्त करेल असे तरी कुठे कोणाला वाटले होते? पिक्चर हिट होईल की फ्लॉप हे पब्लिकच्या हातात/ मनात/ डोक्यात/ डोळ्यासमोर असते. तो निर्णय त्यांचाच. कॉर्पोरेट युगात नेमका त्याचाच विसर पडला, ते आकडेमोडीने चित्रपटाचे यशापयश सांगू लागले आणि चित्रपट एकावर कोसळू लागलेत.. आता त्या आकड्यांवरचा चित्रपट रसिकांचा विश्वासही उडालाय. आजही शोलेच्या यशाच्या गोष्टी सांगताना त्यात त्याचा सामाजिक सांस्कृतिक प्रभाव दिसतो.
================================
हे देखील वाचा: अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?
=================================
‘आखरी दाव’ पटकथेपासूनच फसला आणि मग दिग्दर्शक ए. सलाम काहीच चमक दाखवू शकला नाही. चित्रपटात जितेंद्र व सायरा बानू अशी जोडी. तशी न शोभणारी. पटतंय ना? जोडीला डॅनी डेन्झोपा, पद्मा खन्ना, रणजित, रमेश देव, इफ्तिखार, सत्येन कप्पू, मोहन चोटी इत्यादींच्या प्रमुख भूमिका. हा गुन्हेगारपट. खरं तर सलिम जावेद म्हटल्यावर त्यात टर्न आणि ट्विस्ट अपेक्षित असतात. भगवती चरण वर्मा यांच्या १९५० च्या कादंबरीवर आधारीत ही पटकथा. दिग्दर्शक ए. सलाम यांनी तत्पूर्वी मर्डर इन सर्कस नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले. (Retro Bollywood News)

त्याशिवाय त्यांचे चित्रपट म्हणजे ‘सलाखें’, ‘जमानत’, ‘गंगा और सूरज’, ‘गर्म खून’, ‘आग और दाग’ वगैरे. सगळेच चित्रपट सर्वसाधारण. निर्माते एम. एम. मल्होत्रा यांच्यामुळेच ए. सलाम यांना सलिम जावेद यांची पटकथेवरील चित्रपट दिग्दर्शित करण्यास मिळाला. अन्यथा सलिम जावेद आपल्या पटकथेवर कोण बरे दिग्दर्शक काम करतोय याबाबत जास्त जागरुक. तेही बरोबरच आहे म्हणा. कारण आपण जे लिहिलंय ते तसेच प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवे. जितेंद्र तेव्हा फॉर्मात असूनही ‘आखरी डाव’ या आपल्या चित्रपटाला वाचवू शकला नाही. सायरा बानूची ही खरं तर सेकंड इनिंग.
हे दोघे व्यावसायिकदृष्ट्या एकत्र कसे आणि का आले? त्यांनी एकूण किती चित्रपटांचे पटकथा संवाद लेखन केले? त्यातील किती सुपर हिट झाले? कोणते फ्लॉप झाले? ते दोघे नेमके कोणत्या कारणांनी वेगळे झाले? मग त्यांनी स्वतंत्रपणे वाटचाल कशी सुरु केली? ती कशी झाली? त्यापलीकडे जाऊन त्यांनी बरेच काही हिंदी चित्रपटसृष्टीला, पटकथा संवाद लेखकांना, प्रेक्षकांना दिले आहे.

प्रकाश मेहरा निर्मित आणि दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३) मध्ये अमिताभने साकारलेल्या सूडनायकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि अमिताभला Angry Young Man अशी इमेज मिळाली. त्यानंतर सलिम जावेद लिखित ‘मजबूर’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘त्रिशूल’, ‘इमान धरम’ , ‘काला पत्थर’, ‘डॉन’, ‘शान’, ‘दोस्ताना ‘ आणि ‘शक्ती ‘ या चित्रपटात अमिताभने भूमिका साकारली. ते सगळेच चित्रपट रौप्य महोत्सवी हिट. अपवाद ‘इमान धरम’चा. त्याचे स्वागतच थंड झाल्याचे आठवतेय. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’ देखील अमिताभसाठीच लिहिला होता. पण अमिताभ नेमका तेव्हाच राजकारणात लोकसभेत खासदार असल्याने तो योग हुकला.
लेखनात जावेद अख्तरचा कल (ते जुने चित्रपट मोठ्याच प्रमाणावर पाहत) व व्यवहारात सलिम खान यांची हुशारी यातून ही जोडी जमली. सलिम जावेद यांनी लिहिलेले इतर चित्रपट ‘सीता और गीता’, ‘आखरी डाव’, ‘सौदा’, ‘चाचा भतिजा’, ‘हाथ की सफाई’, ‘यादो की बारात’, ‘क्रांती’, ‘जमाना’ आणि ‘मिस्टर इंडिया’. याशिवाय दोन कन्नड चित्रपटही त्यांनी लिहिले. एकूण सव्वीस पटकथा संवाद लेखनात त्यांनी असा आणि इतका जबरदस्त ठसा उमटवला की, त्यांना सेलिब्रेटिज स्टेटस मिळाले. त्यांच्याबाबत स्टोरीज, किस्से, दंतकथा, गोष्टी पसरु लागल्या. त्यातली एक खूपच चांगली होती, ‘सर्वाधिक मानधन घेणारे पटकथा संवाद लेखक’ ही त्यांच्याबाबतची चर्चा रंगली. तोपर्यंत सिनेमा लिहिणे म्हणजे काय हे जनसामान्यांपर्यंत पोहचले नव्हते. चित्रपट टेबलावर आकाराला येतो, ते म्हणजे बंदिस्त पटकथा लेखन आणि अचूक संकलन. अगोदर लेखणी आणि मग कात्री नीट चालवता यायला हवी. चित्रपट माध्यम सोपे नाही म्हणतात ते उगीच नाही. (Salim-Javed News)
================================
हे देखील वाचा : Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…
=================================
सत्तरच्या दशकात बरेच काही घडले. त्यात सलिम जावेद यांच्या युगात पटकथा संवाद लेखकाला ग्लॅमर आले. खरं तर हिंदी चित्रपटाच्या पटकथा लेखनात वसंत साठे, के. ए. अब्बास, राम केळकर, ग. रा. कामत, मधुसूधन कालेलकर, सचिन भौमिक, के. के. शुक्ला, के. बी. पाठक, कादर खान ही एकेकाळची नावे बरीच मोठी. चित्रपट माध्यम व व्यवसाय यांची उत्तम जाण असलेली. असो. ‘आखरी दाव’ नावाचाही एक चित्रपट होता एवढीच खरं तर नोंद. असे अनेक चित्रपट पडद्यावर येताच ते उतरण्याची घाई करतात. पण जेव्हा तो चित्रपट यशाची टक्केवारी अतिशय भारी आहे अशा सलिम जावेद यांच्या पटकथेवरील असेल तर….