एक ही मारा लेकीन सॉलिड मारा ना…
मेगा स्टार अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांनी सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटात एकत्र भूमिका केल्या. हेराफेरी, खून पसीना, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी… सर्वच सर्व सुपरहिट ठरले. वाढत्या लोकप्रियते सोबतच या दोघांमध्ये त्या काळात सुप्त संघर्ष देखील असायचा. मीडिया देखील वेगवेगळ्या बातम्या तिखट मीठ लावून प्रसिद्ध केल्यामुळे दोघांमध्ये बऱ्याचदा काहीसे मतभेद देखील व्हायचे. त्या काळात कादर खान बऱ्याच चित्रपटांचे डायलॉग लिहीत असायचे. विशेषतः प्रकाश मेहरा आणि मनमोहन देसाई या दोन मातब्बर दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे संवाद कादर खान(kader khan) लिहीत असत. या दोघांकडे अमिताभ बच्चन अनेक वर्ष प्रमुख नायक असायचे.
एकदा टीव्हीवरील एका चैनल वर कादर खान यांना एक प्रश्न विचारला होता.” तुमच्या मल्टीस्टार सिनेमांमध्ये कधी असे झाले का की कोणत्या कलाकारांनी येऊन तुम्हाला सांगितले की ‘हा डायलॉग बरोबर नाही’, ‘हा डायलॉग मलाच का?’, ‘माझ्या भूमिकेचे फुटेज कमी आहे’, ‘या डायलॉगमुळे माझी इमेज मार खाते आहे!’ ‘माझ्या भूमिकेची व्यक्ति रेखाच नाही’ त्यावर कादर खान(kader khan) म्हणाले, ”बऱ्याचदा हे कलाकार माझ्याकडे डायरेक्ट येत नसत. ते प्रकाश मेहरा आणि मनमोहन देसाई यांना भेटत असे पण हे दोघे दिग्दर्शक माझ्याकडे बोट दाखवून सांगत असे: तुम्ही कादर खान सोबत बोला. मी त्यांना व्यवस्थित पटवून देत असे!” तरीही कलाकारांची बारीक कुरबुर चालायचीच. एकदा मात्र असा प्रसंग झाला की विनोद खन्नाने कानाला खडा लावला की यापुढे मी माझा कादर खान यांनी लिहीलेला डायलॉग बदलणार नाही. काय होता हा किस्सा?
हा किस्सा १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाच्या वेळेचा आहे. या चित्रपटात सिकंदर म्हणजे अमिताभ बच्चन जोहरा बेगमच्या म्हणजे रेखाच्या प्रेमात असतो. जोहरा एक तवायफ असते. अमिताभ आणि विनोद खन्ना या सिनेमात जिगरी दोस्त असतात. अमिताभ जोहराकडे जात असतो हे विनोदला माहीत असते. जोहराने सिकंदरला आपल्या जाळ्यातून मुक्त करावे अशी त्याची इच्छा असते. म्हणून तो एकदा रेखाला भेटायला कोठ्यावर जातो आणि तिला विचारतो, ”क्या किमत लोगी तुम सिकंदर को अपनी जाल से हटाने की?” त्यावर रेखा म्हणते, ”तुम दे भी क्या सकते हो? पाच हजार? दस हजार? पचास हजार?” त्यावर विनोद खन्ना म्हणतो, ”इतने पैसे मे तो मैं तुम्हे सिकंदर की तस्वीर भी न दू” पण या डायलॉगवर विनोद खन्ना कम्फर्टेबल नव्हता.
तो कादर खान यांना म्हणाला, ”यार ये डॉयलॉग में मजा नही आ रहा है!” प्रकाश मेहरा आणि कादर खान यांना मात्र खात्री होती की हा डायलॉग जबरदस्त आहे आणि प्रेक्षकांच्या टाळ्या घेणारा आहे. पण विनोद खन्ना मात्र या डायलॉग वर नाराज होता. कादर खान(kader khan) म्हणाले, ”ठीक आहे. आपण हा डायलॉग बदलून टाकू या. अदलाबदल करू यात. तुझे डायलॉग आपण रेखाला देवूत रेखाचे डायलॉग तुला देतो.” त्याप्रमाणे बदल केले.
आता नवीन सिच्युएशन नुसार रेखा आणि विनोद खन्ना यांचे डायलॉग बदलले गेले. आता विनोद खन्ना रेखाला विचारतो, ”क्या किमत लगाई है तुमने मेरे दोस्त सिकंदर को अपनी जाल से दूर करने की? पाच हजार? दस हजार? पचास हजार? बोलो..” त्यावर रेखा थंड स्वरात म्हणते, ”इतने पैसे मे तो मे सिकंदर की तस्वीर भी ना बेचू तुम तो पूरा सिकंदर बेचने की बात करते हो!!” रेखाच्या या डायलॉगवर थिएटरमध्ये प्रेक्षकांनी स्टॅंडिंग ओव्हीएशन देत टाळ्यांचा गजर केला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विनोद खन्नाने आपली चूक कबूल केली. तो कादर खान यांना म्हणाला,” मी कानाला हात लावतो. यापुढे तुम्ही लिहिलेले डायलॉग मी चेंज करणार नाही!”
========
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ अंडररेटेड पण ग्रेट सिनेमा
========
असाच काहीसा प्रकार मनमोहन देसाइ यांच्या ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटाच्या वेळी देखील आला होता. या चित्रपटात अमर (विनोद खन्ना) अँथनी (अमिताभ बच्चन) ची त्याच्या वस्तीत जाऊन फुल पिटाई करतो असा शॉट होता. अमिताभ त्या वेळेला मेगास्टार होता. एका पोलीस अधिकाऱ्याकडून असा मार खाऊन घेणे त्याला थोडेसे त्याच्या इमेजला मारक होईल असे वाटत होते. त्याने तशी तक्रार कादर खान यांच्याकडे केली. कादर खान(kader khan) म्हणाले, ”या सीन मध्ये तू मार खात नाहीस तुझी व्यक्तिरेखा या सिनेमात मार खात आहे. हा फरक लक्षात घे आणि या व्यक्तिरेखेतून कसा ट्विस्ट देता येईल ते पहा.” अमिताभने ही भूमिका साकारताना कॉमेडीचा जॉनर ठेवत या फाईट सिक्वेन्सला वेगळा ट्विस्ट दिला. यात त्याचा या सीन नंतर डायलॉग होता, ”एक ही मारा लेकीन सॉलिड मारा ना…” या अमिताभचे डायलॉगवर पब्लिक जाम खुश झाले! आणि अमिताभ बच्चनला आपल्या इमेजची भीती वाटत होती ती दूर झाली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये हा किस्सा सांगितला आहे.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी