‘कधी तू, रिमझिम झरणारी बरसात’ गायकाच्या जीवनाला वेगळं वळण देणारं गीत!
काही गाणी अशी असतात की ती एखाद्या गायकाच्या जीवनात टर्निंग पॉईंट घेऊन येतात. ‘मुंबई पुणे मुंबई’ भाग पहिला यातलं ‘कधी तू, रिमझिम झरणारी बरसात’ हे गीत सुद्धा एका गायकाच्या जीवनाला वेगळं वळण देणारं ठरलं. तो गायक म्हणजे ऋषिकेश रानडे. हे गीत श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले असून संगीतकार अविनाश – विश्वजित यांनी ते संगीतबद्ध केले आहे.
हा किस्सा आहे ऋषिकेश रानडे या गुणी गायकाच्या स्ट्रगल च्या काळातला. गायक ऋषिकेश हा संगीतकार अविनाश – विश्वजित यांच्यासाठी अनेक गाण्यांचे स्क्रॅच रेकॉर्डिंग करत होता. नंतर तो काही चित्रपटांच्या बॅकग्राऊंड म्युझिकसाठी देखील गाऊ लागला. एकदा संगीतकार अविनाश – विश्वजित यांनी ऋषिकेशला बोलावलं आणि सांगितलं की एक रोमँटिक मराठी चित्रपट येत आहे आणि त्याकरिता एक सोलो गाणे आहे. श्रीरंग गोडबोले यांचे शब्द आणि अविनाश – विश्वजित यांची चाल होती. ऋषिकेशच्या आवाजात ‘कधी तू, रिमझिम झरणारी बरसात’ चा एक बेसिक ट्रॅक रेकॉर्ड करून निर्मात्यांना पाठवला गेला. काही दिवसांनी ऋषिकेशला संगीतकार अविनाश – विश्वजित यांनी फोन केला आणि सांगितले की एक चांगली बातमी आहे. मुख्य म्हणजे त्या गाण्याची चाल आणि तुझा आवाज या दोन्ही गोष्टी निर्मात्यांना आवडल्या आहेत आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना सुद्धा ! आपल्या आवाजात एका मराठी चित्रपटाचे सोलो गाणे रेकॉर्ड होणार, हे ऐकून ऋषिकेशला खूप आनंद झाला. सुरुवातीला या गाण्याचे ध्वनिमुद्रण ‘इनसिंक स्टुडिओत’ झाले. पण मग पुन्हा एकदा ‘आजीवसन’ स्टुडिओत गाण्याचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. हे गाणे स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित झाले आहे. ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं हे गीत त्याच्या करिअरमधील एक महत्वाचा टप्पा ठरले. त्या गाण्याला त्या काळात सुद्धा सोशल मीडिया वर लाखो लाईक्स मिळाले होते. आजही ऋषिकेशला एखाद्या कार्यक्रमात या गाण्याची फर्माईश हक्काने केली जाते. अनेक रियालिटी शो मधील नवीन स्पर्धक ऋषिकेशने गायलेलं हे गाणे सादर करतात. खरोखरच हे या गाण्याचे यश म्हणता येईल