Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Kishore Kumar : अवघ्या दोन तासात किशोर कुमारने रेकॉर्ड केले होते ‘हे’ कल्ट क्लासिक गाणे!
सिनेमाच्या सुवर्ण काळातील आठवणी भन्नाट असतात. या आठवणी आज देखील रसिकांना तो काळ नजरे पुढे आणतात. त्या काळातील गाणी, त्या काळातील सिनेमे, अभिनेते, अभिनेत्री रसिकांसाठी ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. या काळात सर्व कलावंतांमध्ये एक निरोगी स्पर्धा होती. प्रत्येक कलाकाराला दुसऱ्या कलावंताबाबत आदर होता. आस्था होती. त्यामुळे त्या काळात बनलेल्या कलाकृती आज पन्नास साठ वर्षानंतर देखील अजरामर आहेत. या सुवर्णकाळातील अनेक कथा आज देखील मोठ्या आत्मीयतेनं सांगितल्या जातात. अशाच एका क्लास गाण्याची भावस्पर्शी आठवण! (Kishore Kumar songs)
किशोर कुमार यांनी एक गाणे केवळ दोन तासांमध्ये रिहर्सल आणि रेकॉर्डिंग करून एक विक्रम केला होता. आज हे गाणं कल्ट क्लासिक म्हणून ओळखलं जातं. पण हे गाणं जेव्हा किशोर कुमार कडे आले आणि त्यानंतर अवघ्या दोन तासात हे गाणं रेकॉर्ड झालं देखील होतं! इतक्या कमी वेळात इतकं अप्रतिम गाणं कसं काय तयार झालं होतं? कोणते होते ते गाणे? आणि काय होता नेमका किस्सा? साठच्या दशकाच्या शेवटी मराठी लेखक चंद्रकांत काकोडकर यांच्या कादंबरीवर आधारित एक हिंदी चित्रपट राज खोसला दिग्दर्शित करीत होते. या सिनेमात बलराज सहानी , राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या प्रमुख भूमिका होत. या चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते तर गाणी आनंद बक्षी यांनी लिहिलेली होती. चित्रपट होता ‘दो रास्ते’. (Bollywood classic movies)

या चित्रपटातील सर्व गाणी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर गाणार होते. जवळपास सर्व गाण्यांचे रेकॉर्डिंग देखील झाले होते. फक्त एक गाणे शिल्लक होते. या गाण्याची रिहर्सल मोहम्मद रफी यांनी केली होती. फक्त रेकॉर्डिंग बाकी होते. जेव्हा रेकॉर्डिंग साठी संगीतकार लक्ष्मीकांत यांनी म. रफी यांच्या घरी फोन लावला तेव्हा त्यांना असे कळाले की रफी साहेब अचानकपणे परदेशात गेलेले असून पुढचे तीन महिने काही ते भारतात परत येणार नाहीत! आता मात्र सर्व प्रोडक्शन युनिट चांगले घाबरले. कारण या चित्रपटाचे केवळ हे एकच गाणे रेकॉर्डिंग करायचे राहिले होते आणि हे गाणे खूप महत्वाचे होते. गाण्याचे बोल होते ‘खिजा के फूल पे आती कभी बहार नही मेरे नसीब में ऐ दोस्त तेरा प्यार नही….’ (entertainment)

सिनेमातील हे सिच्युएशनल गीत असल्यामुळे त्याला टाळता देखील येणार नव्हते. रफी नाहीत म्हटल्यावर अन्य पर्यायांचा विचार सुरु झाला. एक पर्याय होता किशोर कुमार यांचा . पण… तो वर राज खोसला यांच्या चित्रपटातून किशोर कुमार यांचा स्वर कधीच ऐकायला मिळाला नव्हता. काही स्पेसीफिक कारण नव्हतं पण या सिनेमा पर्यंत तरी राज खोसला यांनी किशोरचा स्वर वापरला नव्हता. ज्या काळात देव आनंद साठी किशोर कुमार हे समीकरण जवळपास निश्चित होतं त्या काळात देखील राज खोसलांच्या चार सुपरहिट सिनेमां मध्ये देव आनंद वर चित्रीत सर्व गाणी मोहम्मद रफी, मन्ना डे किंवा हेमंत कुमार यांनी गायली होती. देव आनंद पडद्यावर असून किशोर कुमारला या चित्रपटांमध्ये एकही गाणे नव्हते हे चित्रपट होते सीआयडी, कालापानी सोलवा साल आणि बंबई का बाबू…(Mohammad rafi)
आता येऊ मूळ गाण्याच्या किस्स्याकडे. जेव्हा रफी अवेलेबल नाही असे राज खोसला यांना कळाले त्यावेळेला किशोर कुमार यांच्याकडून हे गाणे गाऊन घेण्याचा निर्णय झाला. त्या पद्धतीने संगीतकार लक्ष्मीकांत यांनी किशोर कुमार ला फोन केला. पण तेव्हा किशोरने सांगितले आज रात्रीच तो परदेशात काही दिवसांसाठी चालला आहे ! आता मात्र राज खोसला यांच्या पायाखालची जमिन हादरली. कारण एका गाण्या साठी चित्रपटाचे प्रदर्शन लांबवणे त्यांना अजिबात परवडणारे नव्हते. म्हणून त्यांनी लक्ष्मीकांत यांना किशोर कुमार यांना आग्रह करण्याचे सांगितले. त्यावर किशोर कुमार म्हणाला,” जे गाणे अद्याप पाहिलेले देखील नाही त्या गाण्याची रेकॉर्डिंग मी कशी करू? मी परदेशातून आल्यानंतर हे गाणे नक्की गाईन.” पण तोवर वास खोसला यांच्याकडे वेळ नव्हता. (Bollywood untold stories)
=============
हे देखील वाचा : Manoj kumar करीता किशोर कुमारने एकही गीत गायले नाही!
=============
लक्ष्मीकांत यांच्या हातातून फोन घेऊन राज खोसला किशोर कुमार यांना म्हणाले,” किशोर, आमची क्रिटिकल कंडिशन समजून घे मित्रा.. हे गाणं जर रेकॉर्ड झालं नाही आणि सिनेमा वेळेत रिलीज झाला नाही तर माझे लाख रुपये नुकसान होऊ शकते!” किशोर कुमारच्या लक्षात आले की सिच्युएशन खूपच वाईट आहे. राज खोसला किशोर कुमारला म्हणाले,” मी स्वतः कार घेऊन तुझ्या घरी येतो. आपण गाणे रेकॉर्ड करू आणि तिथून मी तुला एअरपोर्टवर सोडायला येतो.” आता मात्र किशोर कुमार यांचा नाईलाज झाला. त्याच्याकडे होकार देण्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्या पद्धतीने राज खोसला स्वतः गाडी घेऊन किशोर कुमार कडे गेले आणि स्टुडिओ त्यांना घेऊन आले. (Entertainment dhamaka)

गाण्याचा कागद किशोर कुमार यांच्या हातात दिला. किशोरने एक दोनदा रिहर्सल केली. सिनेमातील सिच्युएशन आधी समजून घेतली. गाण्यातील भाव लक्षात घेऊन त्यांनी एका टेक मध्ये हे गाणे रेकॉर्ड केले. गाण्याचे बोल होते ‘खिजा के फूल पे आती कभी बहार नही मेरे नसीब में ऐ दोस्त तेरा प्यार नही…’ रेकॉर्डिंग झालं की ताबडतोब किशोर कुमार एअरपोर्ट कडे रवाना झाला. अवघ्या दोन तासात रेकॉर्ड झालेले हे गाणं आज पन्नास वर्षानंतर देखील कल्ट क्लासिक म्हणून ओळखले ते. राजेश खन्ना आणि किशोर कुमारच्या टॉप टेन गाण्यामध्ये या गाण्याचा समावेश होतो! (Bollywood tadaka)