
Kishore Kumar : किशोर कुमार ‘हे’ गाणं गातांना का नर्व्हस होते !
भारतीय सिनेमाच्या सत्तरच्या दशकाचा पूर्वार्धावर राजेश खन्ना भाऊ पाध्येंच्या भाषेत सांगायचं तर ’कंप्लिटली छा गया था’. एका पाठोपाठ तब्बल १८ ब्लॉक बस्टर आणि १५ सुवर्ण महोत्सवी सिनेमे देणारे काका ग्रेटच होते. राजेश– किशोर कुमार– आर डी बर्मन या त्रयीचा हंगामा जबरदस्त होता. ‘कटी पतंग‘ पासून या त्रयीचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर सुरु झाला. यातील ‘ये शाम मस्तानी मदहोश किये जाय‘, ‘प्यार दिवाना होता है मस्ताना होता है’ , ’ये जो मोहब्बत है ये उनका है काम’ ही किशोर यांची तीन सोलो अफाट गाजली. (Kishore Kumar)

या सिनेमाच्या आधी प्रदर्शित झालेल्या आराधना (मेरे सपनो कि रानी, रूप तेरा मस्ताना) या सिनेमात या त्रयीचा चमत्कार सुरु झाला होता. त्यानंतर आलेल्या ‘द ट्रेन‘ या आर डी बर्मन यांनी संगीत दिलेल्या सिनेमात किशोर (Kishore Kumar) यांचा स्वर नव्हता. त्यानंतर १९७१ साली आलेल्या ‘अमर प्रेम’ सिनेमात किशोर यांची तीन अप्रतिम सोलो गाणी होती. (चिंगारी कोई भडके, कुछ तो लोग कहेंगे, ये क्यां हुआ कैसे हुआ), यानंतर अपना देश, शहजादा, मेरे जीवन साथी (ओ मेरे दिल कि चैन, चला जाता हूं किसी के, दिवाना लेके आया है) ,राजा रानी, नमक हराम (दिये जलते है फूल खिलते है), हमशकल, आप की कसम (जिंदगी के सफर मे, जय जय शिव शंकर, करवटे बदलते रहे,सुनो कहो) अजनबी (हम दोनो दो प्रेमी, एक अजनबी हसीना से), १९७४ नंतर राजेश यांचा स्टारडम कमी होवू लागला.
यानंतर राजेश यांचे सिनेमे येत होते पण त्याला पूर्वीसारखे यश मिळत नव्हते. राजेश आता एका हिटसाठी तरसत होते. शक्ती सामंत यांनी १९७६ साली राजेश-हेमा मालिनी यांना घेवून ‘मेहबूबा’ हा सिनेमा बनवला. यातील एका गाण्याच्या किस्सा ऐकण्यासारखा आहे. यातील पंचम यांनी स्वरबध्द केलेलं एक गाणं शिवरंजनी रागावर आधारीत होतं. (Entertainment mix masala)

हे गाणे लता आणि किशोर स्वतंत्र गाणार होते (Tandom song) गीताचे बोल होते ‘मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा‘. सिनेमा पुनर्जन्मावर आधारीत होता त्यामुळे हे गाणे सिनेमात नायक नायिका स्वतंत्र गाणार होते. शिवरंजनी रागावर आधारलेले हे शास्त्रोक्त गाणं गायचं सोपं काम नव्हतं. गाण्यात एका ठिकाणी ‘बीते समय की रेखा….’ च्या वेळी स्वर अगदी टिपेला पोहोचतो आणि लगेच अत्यंत सावध व शांतपणे ’मैने तुमको देखा..’ स्वर स्थिरावतो. स्वरांचा हा खेळ करायला तितकाच ताकतीचा गायक हवा होता. गाणं राजेशवर चित्रित होणार असल्याने साहजिकच किशोरदांकडे आलं.

किशोर यांनी नम्रपणे गाणं गायला नकार दिला. त्यांच्या मते हे गाणं गायची त्याची पात्रता नाही हे गीत मन्ना डे किंवा रफी यांनी गावं. पण शक्ती सामंत यांना हे गाणं त्यांच्याकडूनच गावून घ्यायचं होतं. आर डी बर्मन आणि राजेश यांचा आग्रह किशोर (Kishore Kumar) यांच्यासाठी होता. किशोर यांनी आयडीया केली. तो म्हणाला, “तुम्ही हे गाणं आधी लताच्या स्वरात रेकोर्ड करा.” त्यावर पंचम म्हणाले, ”पण शूटिंग शेड्युलमध्ये तुमच्या स्वरात हे गाणं आधी रेकोर्ड करणे गरजेचे आहे.” त्यावर किशोर म्हणाला, ”ये शेड्युल बिड्युल मै नाही जानता. पहले लता जीसे गवाओ. फिर मै वो गाना शांती से सुनुंगा. उसका अभ्यास करुंगा. उसका पोस्ट मार्टेम करुंगा. उसको खा जाउंगा और फिर गाउंगा !“ त्या पद्धतीने लता यांच्या स्वरात गाणे आधी ध्वनिमुद्रित केले गेले.
===========
हे देखील वाचा : Sridevi : झुरळाला दारू पाजून शेखर कपूरने हा शॉट घेतला!
===========
पंचमने लताच्या स्वरातील गाणं किशोरला देऊन सराव करायला सांगितले. किशोर (Kishore Kumar) गाण्याची प्रॅक्टीस करू लागले. तसा तो नर्व्हसच होते. क्लासिकल गाणे म्हटले की तो थोडा नर्व्हस व्हायचा. जवळपास पंधरा दिवसांनी रेकॉर्डींग ठरले. किशोर अजूनही नर्व्हसच होते. रेकॉर्डींगला दस्तुर खुद्द शक्ती सामंत उपस्थित होते. किशोरवर आणखी दडपण वाढले ! पण काही कारणाने ते स्टुडिओ बाहेर पडले. किशोरने बंगालीतून पंचमला विचारले ‘दादा चले गये क्या?’ पंचमने बंगालीतूनच उत्तर दिले ’हॉं’ लगेच रेकॉर्डींगला सुरूवात झाली आणि काय आश्चर्य विदाऊट रिटेक गाणं रेकॉर्ड झालं सुध्दा! गंमत म्हणजे हे गाणं लताच्या ’मेरे नैना’ पेक्षा जास्त सुपर हिट ठरलं ! जे गीत गायला किशोर (Kishore Kumar) घाबरत होते ते गाणं त्याच्या ’टॉप टेन’ मध्ये जावून बसलं.