….आणि Lata Mangeshkar आणि सचिन देव बर्मन यांच्यातील मतभेद मिटले!

….आणि Lata Mangeshkar आणि सचिन देव बर्मन यांच्यातील मतभेद मिटले!
कधी कधी एखाद्या वाईट गोष्टीतून देखील चांगल्या गोष्टींची निर्मिती होत असते आता हेच पहा ना. १९५७ सालच्या ‘सितारो से आगे’ या चित्रपटाच्या नंतर लता मंगेशकर आणि संगीतकार सचिन देव बर्मन यांनी पुढची चार-पाच वर्षे एकत्र काम करत नव्हते. याला कारण अगदी क्षुल्लक होतं. याबाबत सिने रसिकांमध्ये नेहमी चर्चा चालू असते की नेमकं काय कारण होतं लता आणि सचिन देव बर्मन यांचे भांडण होण्याचे? खरं तर लता मंगेशकर हा सचिन देव बर्मन यांचा त्या काळात (पन्नास च्या दशकात) अत्यंत आवडीचा स्वर होता. ते असं म्हणत की ‘मला फक्त तुम्ही हार्मोनियम आणि लता मंगेशकर द्या. मी जगातलं सर्वोत्तम गाणं तुम्हाला करून देतो!” आणि त्या काळातली लता आणि सचिन दा यांची गाणी पाहिलं की आपल्या लक्षात देखील येते की कॉम्बिनेशन खूपच जबरदस्त होते.
ठंडी हवाये लहराके आये, चाँद फिर निकाला मगर तुम न आये, तुम न जाने किस जहां मे खो गये ,फैली हुई है संपनोकी बाहे .. ही पन्नास च्या दशकातील या युतीची गाणी त्यांच्या कर्तृत्वाची आणि लोकप्रियतेची साक्ष द्यायला पुरेशी आहेत. मग लता आणि सचिनदा यांच्यात वितुष्ट नेमकं आलं कसं? यातलं एक कारण असं सांगितलं जातं की ‘सितरो से आगे ‘ सिनेमातील एक गाणे लताने रेकॉर्ड केले होते पण या गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर सचिनदा यांच्या असं लक्षात आलं की गाण्यांमध्ये काहीतरी कमतरता आहे. कुठेतरी काही मिस होत आहे. म्हणून त्यांनी गाणं रेकॉर्डिंग झाल्यानंतर लता मंगेशकर यांना पुन्हा बोलावलं आणि सांगितलं की आपल्याला हे गाणं पुन्हा एकदा रेकॉर्ड करावे लागेल! गाण्याचे बोल होते ‘ सैया कैसे धरू धीर..’ परंतु काही कारणाने लता मंगेशकर या गाण्याच्या रेकॉर्डिंगला येऊ शकल्या नाहीत . त्या काळामध्ये प्रचंड बिझी होत्या. त्यामुळे सिनेमांमध्ये पूर्वीचंच रेकॉर्डिंग ठेवावा लागले.

संगीतकार सचिन देव बर्मन यांना मात्र हे खूप इन्सल्टींग वाटलं आणि त्यांनी लता मंगेशकर सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुढची पाच वर्ष सचिन दा यांच्याकडे लता अजिबात गायली नाही. उपद्रवी लोकांनी दोघांचे कान भरले त्या मुळे दुरावा वाढत गेला. या काळात सचिनदा यांच्याकडे आशा भोसले भरपूर गात होत्या. पण हे भांडण मिटलं 1961 साली . पण या मिटलेल्या भांडणामुळे तीन चांगल्या गोष्टी घडल्या दोन दिग्गज कलावंत संगीत क्षेत्रामध्ये आले त्यातील पहिले होते संगीतकार राहुल देव बर्मन. त्यांचा पहिला चित्रपट होता 1961 सालचा ‘छोटे नवाब’. खरंतर सचिन देव बर्मन आणि लताचे त्या काळतील ताणलेले संबंध पाहताना सचिनदाच्या मुलाने लताकडे अप्रोच होणं बऱ्याच जणांना आश्चर्यकारक वाटलं. परंतु आर डी बर्मन यांनी असं काही मनात न आणता लताला सरळ विचारले,” मी पहिलाच चित्रपट संगीतबद्ध करतोय. या माझ्या पहिल्या सिनेमातील पहिले गाणे आपण गावे अशी माझी इच्छा आहे.”
लता लगेच तयार झाली आणि रिहर्सल साठी ती बर्मन त्याच्या घरी आली. पहिलं गाणं होतं मालगुंजी रागातील ‘घर आजा घेर आई बदरिया सावरिया..’ पहिल्याच दिवशी जेव्हा लता रिहर्सल करत होती तेव्हा आतल्या रूममध्ये सचिन देव बर्मन बसले होते. ते पडद्याच्या मागून लता कडे पाहत होते. लताचे जेव्हा तिकडे लक्ष गेलं तेव्हा लता तात्काळ उठली आणि बर्मनदाच्या जाऊन पाया पडली! दोघांमधील मतभेदाचे गिले शिकवे एका क्षणात दूर झाले. सचिन आणि लताला आशीर्वाद देत सांगितले,” माझ्या पुढच्या सिनेमात तू नक्की गाशील.”
================================
हे देखील वाचा : Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?
================================
आता पाच वर्षाच्या गॅप नंतर लताने सचिनदाकडे गायलेले गाणं होतं ‘मोरा गोरा अंग लई लै मोहे शाम रंग दई दे ..’ हे बंदिनी या बिमल रॉय यांच्या चित्रपटातील! हे गाणं लिहिलं होतं गीतकार गुलजार यांनी. त्यांनी लिहिलेलं हे पहिलं सिनेमाचं गाणं होतं. लता सचिनदादाच्या मतभेदनंतर हे दोन रत्न भारतीय चित्रपट सृष्टीला मिळाले होते. एक आरडी बर्मन आणि दुसरे गुलजार. आणि याबरोबरच तिसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या गाण्यामुळे लता आणि सचिन देव बर्मन यांच्यात वितुष्ट निर्माण झालं ते गाणं सचिन दा यांनी पॉलिश करून आपल्या नवीन चित्रपटात लता कडून गाऊन घेतले! हे गाणं होतं ‘गाईड’ चित्रपटातील ‘मोसे छल किये जाये ..’ म्हणजे बघा एका वाईट गोष्टीतून तीन चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या!