किशोरच्या एका सिनेमाने शक्ती सामंत यांना रडवले, तर दुसऱ्याने हसवले… काय होता हा किस्सा
भारतीय हिंदी सिनेमातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून जिचा आजही उल्लेख होतो त्या मधुबालेने सर्व टॉपचे अभिनेते सोडून किशोर कुमार सोबत लग्न केले, ही त्या काळातली फार मोठी ‘ब्रेकिंग न्यूज’ होती. कारण किशोरची कारकीर्द त्यावेळेला नुकतीच सुरु झाली होती. मधुबाला किशोर कुमार सोबत लग्न करेल असे कुणालाही कधीच वाटले नव्हते. तिचे खरे नाव जोडले गेले होते ते दिलीप कुमार सोबत. (Lesser Known story of Shakti Samanta and Kishore Kumar)
दिलीप कुमार आणि मधुबाला दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होती. त्यामुळे त्यालाही तिच्यासोबत लग्न करण्याची खूप इच्छा होती. पण मधुबालाच्या वडिलांना हा ‘निकाह’ मान्य नव्हता. त्यांच्या नात्याला त्यांचा विरोध होता. मधुबाला वरील प्रेमाचा स्वीकार दिलीप कुमार यांनी चक्क हाय कोर्टामध्ये केला होता. तरीही अखेर यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही.
१६ ऑक्टोबर १९६० या दिवशी मधुबाला आणि किशोरचे लग्न झाले. यावेळी किशोरने मुस्लीम धर्म स्वीकारला अशी देखील अफवा त्या काळी पसरली होती. किशोर कुमारने मधुबाला सोबत पाच सिनेमे केले. ढाके की मलमल (१९५६), चलती का नाम गाडी (१९५८),महलो के ख्वाब (१९६०), झुमरू (१९६१) आणि हाफ तिकीट(१९६२). यातील चलती का नाम गाडी, झुमरू आणि हाफ तिकीट या सिनेमांना चांगले यश मिळाले. पण एक सिनेमा या दोघांचा असा होता जो अर्ध्याहून अधिक बनला आणि मग त्यातून मधुबाला बाहेर पडली. हा सिनेमा मग पूर्ण झाला का? कोणती अभिनेत्री त्यात आली? त्याचाच हा किस्सा…
जाग उठा इंसान (१९५७) या चित्रपटानंतर दिग्दर्शक शक्ती सामंत ‘बारूद’ नावाचा चित्रपट बनवत होते. हा चित्रपट कोळसा खाणीवर आधारित होता. या चित्रपटाची नायिका म्हणून त्यांनी मधुबालाचे नाव निश्चित केले होते. याच काळात मधुबाला आणि किशोर यांच्यात ‘आंख मिचौली’ सुरु झाली होती. त्यांचा ‘चलती का नाम गाडी’ फ्लोअर वर होता. आता किशोर कुमारने शक्ती सामंत यांच्याकडे या ‘बारूद’ चित्रपटामध्ये नायक म्हणून मला साइन करा, असा आग्रह धरला. (Lesser known story of Shakti Samanta and Kishore Kumar)
शक्ती सामंत यांनी सांगितले, “यातील भूमिका तुमच्या प्रतिमेला साजेशी नाही त्यामुळे मी तुम्हाला साईन करू शकत नाही.” परंतु किशोर कुमारने आग्रहच धरला आणि त्याने सांगितले, “हा चित्रपट आणि याचा विषय खरंतर मधुबालाला सूट होणार नाही. कारण कोळशाच्या खाणीमध्ये ती शूटिंग करू शकणार नाही. तिची प्रकृती पाहता तिला या चित्रपटात तुम्ही काम करू देऊ नका किंवा विषयच बदला. त्यावर शक्ती सामंत यांनी किशोर कुमारला विचारले, “मग कुठला विषय घेऊ?” त्यावर किशोरने त्यांना एक कॉमेडी चित्रपट बनवा असे सांगितले. अशा पद्धतीने किशोर कुमार आणि मधुबालाला घेऊन शक्ती सामंत यांनी ‘नॉटी बॉय’ या चित्रपटाची सुरुवात केली.
या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले. सात आठ रिळे तयार झाली. पण अचानक मधुबालाला हृदययविकाराचा त्रास सुरू झाला आणि डॉक्टरनी तिला चित्रपटातून काम करायला बंदी घातली. चित्रपट बंद पडला. पण शक्ती सामंत यांना चित्रपट बंद करून चालणार नव्हते. त्यांनी मधुबालाच्या जागी कल्पना या नवोदित अभिनेत्रीला घेऊन चित्रपट बनवला. त्यासाठी त्यांनी आधीचे सगळे शूट रद्द केले. मोठा खर्च या निमित्ताने झाला कारण जवळपास निम्मा सिनेमा तयार झाला होता. पण किशोर कुमारच्या आग्रहाने त्यांनी पुन्हा कल्पना सोबत रिशूट केले आणि चित्रपट बनला.
=====================
हे ही वाचा: जेव्हा पाकिस्तानी राष्ट्राध्याक्षांकडून फिरोज खान यांच्या सिनेमांवर बंदी घातली गेली!
‘त्या’ एक गोष्टीमुळे रमेश सिप्पी यांच्या बायकोने धरला होता सहा महिने अबोला…
====================
सिनेमामधली सचिन देव बर्मन यांचे संगीत आणि गाणी चांगली होती. तसेच या सिनेमात किशोर कुमारसाठी एका गाण्यात मन्नाडे यांनी पार्श्वगायन केले आहे. १९६२ साली चित्रपट प्रदर्शित झाला पण प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली. मोठ्या हौसेने किशोर कुमारने शक्ती सामंत यांना ‘नॉटी बॉय’ हा सिनेमा बनवायला लावला, पण तो त्यामध्ये त्यांचे नुकसानच झाले. (Lesser known story of Shakti Samanta and Kishore Kumar)
पण काय गंमत असते पहा शक्ती सामंत यांनी याच काळात किशोर सोबत आणखी एक सिनेमा सुरु केला होता. नायिका होती जमुना, तर संगीत चित्रगुप्त यांचे होते. हा सिनेमा होता ‘एक राज’ या सिनेमाला मात्र चांगले यश मिळाले. अशाप्रकारे किशोरच्या एका सिनेमाने शक्ती सामंत यांना रडवले, तर दुसऱ्याने हसवले.