
Madhubala : पोस्टरवरच मनी बॅक गॅरंटी देणारा चित्रपट कोणता ?
जुन्या हिंदी सिनेमाचे किस्से आज पुन्हा एकदा वाचताना खूप मजा येते. मागच्या आठवड्यात असेच जुने चित्रपट विषयक मासिक चाळताना एका सिनेमाच्या पोस्टरने लक्ष वेधून घेतले. या पोस्टरवर निर्मात्याने चक्क मनी बॅक गॅरंटी दिली होती. त्यात असे लिहिले होते की या चित्रपटातील गाणी आणि चित्रपट जर तुम्हाला आवडला नाही तर तिकिटाचे संपूर्ण पैसे तुम्हाला लगेच मिळतील! मला वाटतं अशा प्रकारची जाहिरात करणारा हा जगातील पहिला चित्रपट निर्माता असावा. या जाहिरातीमुळे म्हणा किंवा यातील अप्रतिम संगीतामुळे हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला होता. आज देखील या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गाणं रसिकांच्या मनात ताजं आहे. कोणता होता चित्रपट आणि काय होती नेमकी मनी बॅक गॅरंटी? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
11 जून 1950 या दिवशी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा होता ‘निराला’ या चित्रपटात मधुबाला आणि देव आनंद ही जोडी होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते देवेंद्र मुखर्जी. या चित्रपटाची गाणी पी एल संतोषी यांनी लिहिली होती तर संगीत सी . रामचंद्र यांचे होते या चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेले एक गाणं होतं ‘महफिल में जल उठी शमा परवाने के लिए प्रीत बनी है दुनिया मे मर जाने के लिए..’ पी एल संतोषी यांनी खूप भावस्पर्शी शब्द या गाण्यात पेरले होते आणि लताने आपल्या कोवळ्या स्वरात फार नजाकती ने हे गाणं गायलं होतं.

सी रामचंद्र यांचं अतिशय मेलडीअस संगीत या गाण्याला लागलं होतं. हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर सर्वांना प्रचंड आवडले. या सिनेमाच्या रेकॉर्ड स जेंव्हा मार्केट मध्ये आल्या सर्वत्र प्रचंड लोकप्रिय झाल्या. मधुबाला देखील या गाण्यावर खूप चांगला अभिनय केला होता या चित्रपटाचे निर्माते शहा आणि चोरडिया होते. त्यांनी एक आयडिया केली. त्यांनी पोस्टरवरच मनी बॅक गॅरंटी हे शब्द मोठ्या अक्षरात छापले आणि हा चित्रपट आणि यातील गाणी जर तुम्हाला आवडली नाहीत तर तात्काळ तुमचे पैसे तुम्हाला परत केले जातील अशी गॅरंटी दिली. हे पोस्टर त्या काळात खूपच चर्चिले गेले होते. हा चित्रपट सुपरहिट झाला. मधुबाला आणि देव आनंद ही जोडी त्या काळात तशी नवी असली तरी तरुणाई मध्ये लोकप्रिय होती. मधुबाला आणि देव आनंद यांनी एकूण आठ चित्रपटात एकत्र काम केले. (नादान ,निराला ,मधुबाला ,शराबी, अरमान ,आराम, काला पानी , जाली नोट)
सी. रामचंद्र यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. कारण आज सत्तर-पंचाहत्तर वर्षे झाली तरी त्यांची गाणी समाज माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत . त्यांच्या गाण्यांचे रीमिक्स ,रील्स आज देखील जनमानसात प्रचंड आवडीने पाहिल्या जातात. गोरे गोरे ओ बाके छोरे कभी मेरे गली आया करो, शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो, शोला जो भडके दिल मेरा धडके, इना मीना डिका, मेरी जान मेरी जान संडे के संडे, मेरे पिया गये रंगून किया है वहा सें टेलीफोन ही त्या काळात धाडसाने त्यांनी बनवलेली पाश्चात्य ट्यूनस वरील गाणी प्रचंड गाजली. भारतात वेस्टर्न म्युझिक रुजवण्याचं काम सी रामचंद्र यांनी केलं.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
अर्थात यासाठी त्यांना फार मोठ्या टीकेला देखील सामोरे जावे लागले. सी रामचंद्र केवळ वेस्टर्न ट्यून बनवत नव्हते त्यांच्या अस्सल भारतीय संगीताची जादू काही निराळी च होती. ये जिंदगी उसी की है जो किसिका हो गया (अनारकली) धीरे से आजा रे अखियन मे (अलबेला) देख हमे आवाज न देना (अमरदीप) आधा है चंद्रमा रात आधी (नवरंग) दिल लगाकर हम ये समझे (जिंदगी और मौत ) अशी अप्रतिम गाणी त्यांनी रसिकांना बहाल केली. लता मंगेशकर यांनी सर्वाधिक चांगली गाणी सी रामचंद्र यांच्याकडेच गायली होती. 1963 साली प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लता मंगेशकर यांनी जे देशभक्तीपर गीत गायले होते ते सी रामचंद्र यांनी स्वरबद्ध केले होते. हे गीत ‘ऐ मेरे वतन के लोगो..’ आज भारतातील सर्वाधिक गायले जाणारे लोकप्रिय देशभक्तीपर गीत आहे!