महाभारत… लवकरच !
सध्या चित्रपट शौकीनांना एका चित्रपटाच्या टिझरची मोहीनीचं पडली आहे. कारण या चित्रपटाच्या टीझरला काही मिनीटात लाखो लाईक पडले आहेत. हा टीझर आहे एका भव्यदिव्य चित्रपटाचा…महाभारत…हो महाभारत… बाहुबली या चित्रपटांनं एस एस राजामौली यांचं नाव सुपरिचित झालं.
या महाभारत चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. त्यावरुन त्याची स्टारकास्ट कोण आहे हे समजल्यावर हा चित्रपट किती भव्य…दिव्य आणि बिग बजेट होणार याचीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : ‘बाहुबली’ खरचं ठरला सर्व रेकॉर्ड्सचा बाहुबली
बाहुबली नंतर राजामौली असाच एखादा भव्यपट साकारत असल्याची चर्चा होती. प्रभास हा त्यांचा लाडका अभिनेता आहे. प्रभासला घेऊन ते रामायण नावाचा चित्रपट साकारत आहेत. मात्र त्याचबरोबर आणखी एक भव्यपट राजामौलीच्या मनात आहे, आणि त्यासाठी बॉलिवूड आणि टॉलिवूड चे मान्यवर कलाकार एकत्र येणार अशी चर्चा होती.
मात्र महाभारतावर चित्रपट काढणं म्हणजे एक दिव्य आहे. आत्तापर्यंत महाभारतावर काढलेल्या मालिकाही भव्य स्वरुपाच्या होत्या, आणि त्यांना तेवढाच प्रेक्षकवर्ग मिळाला. अर्थात महाभारतावर चित्रपट काढायचा म्हणजे पहिल्यांदा मर्यादा होती ती वेळेची…
महाभारताचा कालखंड अवघ्या तीन तासात कसा बसवायचा हा पहिला प्रश्न होता.
मात्र राजामौली यांनी याबाबत आत्तापर्यंत कुठलाही खुलासा केला नसला तरी हा चित्रपटही बाहुबलीसारखा दोन भागात येणार अशी शक्यता आहे. गेली काही वर्ष राजामौली आणि त्यांची रिसर्च टीम यावर काम करत आहे. महाभारतकालीन काळ…त्याचे सेट…दागिने…कपडे आणि राजामौली ज्यासाठी ओळखले जातात ते म्हणजे खास शस्त्र निर्मितीचे काम सध्या सुरु आहे.
महाभारत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करुन राजामौली यांनी कलाकारांची माहिती दिली आहे. साधारण 2023 च्या दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी शक्यता आहे. एवढा काळ का, कारण आहे या चित्रपटाची स्टारकास्ट…महाभारतामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती भीष्म पितामह यांची…राजामौली यांच्या महाभारतामध्ये ही पितामह यांची भूमिका बॉलिवूडचे वास्तविक पितामह अर्थात अमिताभ बच्चन साकारणार आहेत.
राजामौली यांचा लाडका कलाकार, म्हणजेच प्रभास यात भीमाच्या भूमिकेत दिसणार आहे. जंगल आणि कमांडो या चित्रपटातून चमकलेला विद्युत जामवाल याचीही या चित्रपटात वर्णी लागली आहे. तो नकुलची भूमिका करणार आहे. तर रणवीर सिंग सहदेव म्हणून असेल. ऋतिक रोशन दानवीर कर्णाच्या भूमिकेत असेल. तर अजय देवगण दुर्योधनाची भूमिका साकारणार आहे. धनुर्धर अर्जून हा या पाचपांडवामधील प्रमुख योद्धा होता. या अर्जुनाची भूमिका फरहान अख्तरच्या वाट्याला आली आहे. या पाच पांडवाची पत्नी, द्रौपदीची भूमिका कोणाला मिळेल याची उत्सुकता होती. या भूमिकेसाठी टॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. पण ही आव्हानात्मक भूमिका दिपीका पादुकोणच्या वाट्याला आली. यापूर्वी तिनं साकारलेली पद्मावतीची भूमिका त्यासाठी मदतीला आली. पाच पांडव आणि द्रौपदी यांचा मार्गदर्शक म्हणून ओळखला जाणा-या कृष्णाची भूमिकेसाठी चक्क अमिर खानला साईन करण्यात आलं आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या पांच पांडवाच्या आईच्या, देवी कुंती यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या व्यतिरिक्तही महाभारतामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांचं महत्त्व कधीही नाकारता येणार नाही. त्यामध्ये पाच पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचं नाव पहिल्यांदा घेण्यात येतं. ही महत्त्वाची भूमिका रजनीकांत साकारणार आहेत. याशिवाय ऐश्वर्या राज बच्चन गंगा म्हणून पडद्यावर दिसणार आहे. तर विद्या बालन सत्यवतीच्या भूमिकेत आहे. तर अभिषेक बच्चन दुष्यंत म्हणून पडद्यावर दिसेल…
ही स्टारकास्ट पाहिल्यावर या चित्रपटाला विलंब का होणार याचा अंदाज आला असेल. कारण या सर्व कलाकारांना एकत्र पडद्यावर आणणं हेच खरं आव्हानात्मक आहे. त्यातून महाभारतासारखा भव्य चित्रपट साकारतांना त्यांच्या सलग तारखा मिळणं ही गरजेचं आहे. त्यामुळे या सर्व कलाकारांच्या एकत्र तारखा मिळवणं हेच आता सर्वात कठीण काम झालं आहे. कारण कोरोनामुळे या सर्व कलाकारांचे शेड्यूल पुढे गेले आहे. त्यातल्या त्यात प्रभास सर्वाधिक व्यस्त कलाकार आहे. सध्या प्रभास दोन ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या वर्षअखेरीस हे चित्रपट प्रदर्शित होणार होते. पण कोरोनामुळे त्यांचे शेड्युल पुढे गेले आहे. त्यामुळे हे चित्रिकरण पूर्ण झाल्यावरच तो महाभारतासाठी वेळ काढणार आहे.
हे वाचलेत का ? येतोय ओम राऊतचा आदिपुरुष
वास्तविक महाभारतावर चित्रपट काढण्यासाठी अमिर खान काही वर्ष प्रयत्नशिल होता. या भव्य चित्रपटाचे किमान पाच भाग काढावे असा अमिरचा विचार होता. महाभारतावर चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी त्यांनी काही कथाकारांना आग्रहही केला होता. तसेच या चित्रपटाची स्टारकास्ट कशी असेल, कपडे, दागिने, सेट याचा अंदाज घेण्यासाठी त्यानं आपली एक टीम कामाला लावली होती. पण या चित्रपटासाठी किमान दहा वर्षाचा कालावधी तरी जाईल असा अनुमान त्याच्या रिसर्च टीमनं काढला. तसेच महाभारतावर चित्रपट काढण्यासाठी स्टारकास्टही तेवढीच मान्यवर लागणार. अशा कलाकारांना पाच चित्रपटांसाठी बांधिल ठेवण्यासाठी आगामी काही रक्कम देऊन बुक करावे लागते. एकूण हे सर्व बजेट अनेक कोटींच्या घरात जाणार होते. त्यामुळे अमिर खाननं या सर्वाचा अंदाज घेऊन आपलं हे ड्रीम प्रोजेक्ट काही महिन्यातच गुंडाळलं होतं. आता राजामौली यांच्या चित्रपटात कृष्णाची भूमिका मिळाल्यानं अमिर खूष झाला आहे.
राजामौली हे त्यांच्या भव्य सेटसाठी तसेच युद्धभूमिवरील दृश्यांसाठी ओळखले जातात. महाभारतात या दोन्हीही गोष्टी कशा असतील याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. मात्र त्यासाठी किमान दोन वर्षाचा कालावधी जाईल हे नक्की!