ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
जेव्हा महागुरूंना मिळालं प्रेक्षकांचं कपडेफाड दगडमार प्रेम!
हा किस्सा आहे महागुरू सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांच्या “हाच माझा मार्ग एकला” या आत्मचरित्रातला. ‘नदीया के पार’ हा सचिन यांचा तुफान गाजलेला हिंदी चित्रपट. याच चित्रपटाचा रिमेक ठरलेल्या ‘हम आपके है कौन’ चित्रपटाने नंतर इतिहास गाजवला पण नदीया के पार चा आपला असा एक फॅन क्लब आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा देशाच्या एक तृतीयांश भागात सर्वाधिक यशस्वी तीन चित्रपटांपैकी तो एक होता. काही ठिकाणी तो ‘शोले’ पेक्षाही अधिक चालला. काही ठिकाणी तर हा चित्रपट १३५ आठवडे चालला. या चित्रपटाने सचिन यांना उत्तम यश दिलं आणि तितकेच भन्नाट अनुभव देखील दिले.
सचिन उत्तर प्रदेशात याच चित्रपटाच्या एका शो ला गेले होते. तेव्हा इतकी तुफान गर्दी होती की सगळ्यांना सचिन यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी सचिन यांच्यावर चक्क दगड फेकून मारले. आपण भेटू शकलो नाही तर किमान दगड तरी सचिन यांना लागावा हा त्यामागचा हेतू होता. असाच अनुभव घेत काही ठिकाणी तर सचिन यांच्या कपड्यांचा एक तुकडा आठवण म्हणून घरी नेता यावा यासाठी चाहत्यांनी सचिन यांचे कपडेही फाडले.
त्याच बरोबर सचिन यांनी आणखी एक भन्नाट अनुभव नमूद केला आहे. ते म्हणतात, दादरला सरदार कुटुंबाच्या मालकीचं ‘प्रीतम’ नावाचं रेस्टॉरंट आहे. त्याचे मुख्य मालक अतिशय प्रेमळ, १९७८ मध्ये ‘अखियोंके झरोखोंसे’ प्रदर्शित झाला होता. एकदा हे प्रीतमचे मालक मला विमानतळावर भेटले. मला बघून जवळ आले. ओ पुत्तर तेरी ‘अखियोंके झरोखोंसे’ देखी की काम किया है! अस म्हणून त्यांनी माझ्या गालावर खाडकन थोबाडीत मारली. मला दोन क्षण चक्कर आली. भानावर आल्यावर कळलं की त्यांनी कौतुकाने थोबाडीत मारली होती. प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत मला झेपणारी नव्हती. त्यानंतर जेव्हा त्यांचे दर्शन व्हायचं मी मागच्या मागे कन्नी कापायचो. प्रेमाने का होईना पण पुन्हा मुस्कटात खायची माझी इच्छा नव्हती.”
=====
हे देखील वाचा: महागुरू म्हटलं कि अभिनेते सचिन पिळगावकर हे आपल्याला लगेच आठवतात. परंतु आपल्या या महागुरुचे महागुरू कोण बरं?
=====
एकूण काय, बकवास काम केलं म्हणूनच नाही तर चांगले काम केल्याची पोचपावती सुद्धा अशा कपडेफाड, दगडमार किंवा रंगवल्या तोंडाने मिळू शकते. प्रेक्षकांच्या प्रेमाविषयी काहीच सांगता येत नाही बुवा!