दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘अर्थ’ चित्रपटावेळी महेश भट व ‘या’ अभिनेत्रीचं झालं भांडण
विवाहबाह्य संबंध या विषयावर बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले अजूनही येत आहेत पण ज्या सिनेमाची कायम चर्चा होत असते तो चित्रपट म्हणजे महेश भट (Mahesh Bhatt) दिग्दर्शित ‘अर्थ’. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्याकाळी मोठी हवा निर्माण केली होती. खरंतर कलात्मक चित्रपटाच्या कॅटेगरीत जावा असा विषय असलेला हा चित्रपट पण मुख्य प्रवाहात येऊन याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. पण याच चित्रपटाच्यानंतर अभिनेत्री स्मिता पाटील आणि दिग्दर्शक महेश भट यांच्यात काही काळासाठी विसंवाद निर्माण झाला होता तर स्मिता पाटील आणि शबाना आजमी या दोन अभिनेत्रीमध्ये चांगलाच वादंग झाला होता हे तुम्हाला माहिती आहे का ? या दोघींमधील वादाची चर्चा मिडीयात रंगली होती. ऐंशीच्या दशकातील हा सिनेमा सिने इतिहासातील माइलस्टोन सिनेमा होता. एकूणच हा चित्रपट सर्वार्थाने एक महत्त्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटाची कथा स्वतः दिग्दर्शक महेश भट यांनी लिहिली होती. खरंतर ही त्यांची स्वतःचीच आत्मकथा होती. सत्तरच्या दशकाच्या शेवटी अभिनेत्री परवीन बाबी हिच्या सोबत त्यांचे अफेअर खूप गाजले होते. त्यावेळी महेश भट विवाहित होते. किरण भट हिच्यासोबत त्यांचा प्रेमविवाह झाला होता. पूजा आणि राहुल हे दोन अपत्य त्यांना होते. असे असतानाही त्यांच्या आयुष्यात परवीन बाबी आली आणि मोठे वादळ निर्माण करून गेली.
याच कथेला त्यांनी रुपेरी पडद्यावर आणायचे ठरवले. या चित्रपटात कुलभूषण खरबंदा नायकाच्या भूमिकेत होते तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये शबाना आजमी तर प्रेयसीच्या भूमिकेमध्ये स्मिता पाटील होत्या. या चित्रपटात राज किरण, रोहिणी हट्टंगडी यांच्या देखील प्रमुख भूमिका होत्या. विवाहबाह्य संबंधावरील या चित्रपटातील या दोन्ही नायिका वास्तविक जीवनात अशाच प्रकारच्या संबंधातून जात होत्या. स्मिता पाटील यांचे त्यावेळी राज बब्बर सोबत प्रेम प्रकरण चालू होते. अभिनेते राज बब्बर तेव्हा विवाहित होते. नादीरा बब्बर यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. असे असतानाही त्यांच्या आयुष्यामध्ये स्मिता पाटीलचा प्रवेश झाला होता. तर दुसरीकडे शबाना आजमी आणि गीतकार जावेद अख्तर यांचे प्रेम प्रकरण चालू होते. ज्यावेळी अख्तर यांचा ऑलरेडी हनी इरानी सोबत त्यांचा प्रेमविवाह झाला होता आणि झोया अख्तर आणि फरहान हे त्यांचे आपत्य देखील होते! याचाच अर्थ शबाना आणि स्मिता ह्या दोघीही विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्या होत्या आणि त्यांच्या दोघांच्याही कौटुंबिक जीवनात वादळ निर्माण झाले होते.
याच काळात ‘अर्थ’ या चित्रपटाचे चित्रीकरण देखील चालू होते! ‘अर्थ’ या चित्रपटातून महेश भट (Mahesh Bhatt) यांनी एक सामाजिक संदेश देखील द्यायचे ठरवले होते. हा संदेश असा होता ‘ एखाद्या गाफील मोहाच्या क्षणातून विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करणे सोपे असते परंतु ते निभावणे खूपच अवघड असते आणि या अशा संबंधातून कोणाचेच भले होत नाही.’ हा नरेटीव्ह घेऊन महेश भट चित्रपटाची आखणी करत होते. त्यामुळे सहाजिकच चित्रपटात शबाना आजमी यांच्या भूमिकेला जास्त फुटेज आणि वेटेज मिळत गेले. याच कारणामुळे स्मिता पाटील यांच्या भूमिकेवर एडिटिंग टेबलवर बऱ्यापैकी कात्री चालली. स्मिताला हे अजिबात पटले नाही. प्रेक्षकांची सहानभूती देखील साहजिकच शबानाकडे गेली. कारण हा सिनेमा बनवताना महेश भट (Mahesh Bhatt) यांनी शबाना आजमी चे कॅरेक्टर समोर ठेवून त्या पर्स्पेक्टीव्हनी चित्रपट बनवला होता. नंतर शबाना आजमी हिला या चित्रपटासाठी नॅशनल आणि फिल्मफेअर अवार्ड मिळाले.
=======
हे देखील वाचा : दो बेचारे बिना सहारे, देखो पूछ पूछ कर हारे…
======
स्मिता पाटील हिने महेश भट (Mahesh Bhatt) सोबत भरपूर वाद घातला. स्मिता पाटील आणि शबाना आजमी यांच्यात शीतयुद्ध सुरुवातीपासून चालूच होते. कारण समांतर चित्रपटांमधून या दोघी एकमेकींच्या स्पर्धक म्हणून कायम समोर येत होत्या. याचा स्फोट ‘अर्थ’ च्या वेळी झाला. आणि दोघींमध्ये भरपूर वादावादी पण झाली. मीडिया मधून त्याकाळी भरपूर यावर छापून येत होते. या सर्व प्रकारामुळे ‘अर्थ’ या सिनेमाची मोठी हवा निर्माण झाली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा चित्रपट सुपरहिट होण्याला जगजीत सिंग आणि चित्रासिंग यांचे संगीत देखील कारणीभूत ठरले. यातील ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो’,’झुकी झुकी सी नजर’,’कोई ये कैसे बताये’,’तू नही तो जिंदगी’ या गझल्स खूप गाजल्या. स्मिताने याच काळात महेश भट सोबत आणखी एक फिल्म साइन केली होती ‘आज’ या नावाची. यात कुमार गौरव तिचा नायक होता. तो खूपच रखडला. स्मिता पाटील चे १३ डिसेंबर १९८६ रोजी अकाली निधन झाले. त्यामुळे हा चित्रपट रखडला आणि १९८७ साली प्रदर्शित झाला. स्मिता आणि शबानाचा ‘अर्थ’ हा शेवट चा चित्रपट ठरला!