
Mili Movie : अमिताभ बच्चन यांच्या ‘आये तुम याद मुझे…’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा!
हिंदी सिनेमाच्या सुवर्ण काळातील काही आठवणी आज देखील मनाला हेलावून जातात. त्या काळातील कलाकारांचं आपल्या कलेविषयी असणारे प्रेम इतर कलावंतांच्या विषयी असणारी आत्मीयता आणि उत्कृष्ट तेच घडवण्याचा ध्यास यातून ज्या कलाकृती निर्माण झाल्या त्या आज देखील आपल्या अंतर्मनाला भिडतात. या काळात बनलेली गाणी आज देखील तितक्याच उत्कटतेने ऐकली जातात. मला वाटतं हे यश त्या सर्व कलाकारांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे होते. असाच एक किस्सा सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या त्यांच्या शेवटच्या चित्रपटातील एका गाण्याचा आहे. हा चित्रपट होता ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘मिली’.

२० जून १९७५ रोजी प्रदर्शित झालेला ‘मिली’ हा सिनेमा आपल्या वसंत कानेटकर यांच्या ‘अखेरचा सवाल’ या नाटकावर आधारित होता. यात अमिताभ बच्चन, जया भादुरी आणि अशोक कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट गंभीर विषयावर आधारीत असून नायिका प्रधान होता. चित्रपटाची गाणी गीतकार योगेश यांनी लिहिली होती. हा चित्रपट स्वरबध्द करताना सचिन यांची प्रकृती अतिशय तोळा मासाची झाली होती. यातील गाण्यांचे रेकॉर्डिंग राहुल देव बर्मन यांच्या निगराणी खाली झालं होतं. या काळात आर डी बर्मन देखील प्रचंड बिझी होते. त्यामुळे बऱ्याचदा गाण्याच्या रिहर्सलच्या वेळेला ते त्यांच्या म्युझिशियनसलाच पाठवत असे. सचिन देव बर्मन यांनी गाण्याच्या ट्युन्स तयार केल्या होत्या. या ट्यून गीतकार योगेश यांच्याकडे पोहोचवल्या गेल्या. त्यांनी त्यावर गाणी राहायला सुरुवात केली.

किशोर कुमार यांनी या चित्रपटात दोन गाणी गायली होती. ‘बडी सुनी सी है जिंदगी ये जिंदगी’ आणि ‘आये तुम याद मुझे..’ आज जो किस्सा मी सांगणार आहे तो दुसऱ्या गाण्याचा आहे ‘आये तुम याद मुझे..’ जेव्हा गीतकार योगेश यांच्याकडे सचिनदा यांची ट्यून पोहोचली त्यावेळेला त्यांनी त्यावर शब्द लिहायला सुरुवात केली. गाणं तयार झालं.सचिनदा यांनी शब्द ओके केले. त्या ट्यूनवर त्यांनी ते गाणं एका डमी कलाकाराकडून गाऊन घेतलं. ही टेप घेऊन गीतकार योगेश किशोर कुमार यांच्या घरी गेले; कारण या गाण्याची रिहर्सल किशोर कुमार यांच्या घरी होणार होती. किशोर कुमार यांनी आपल्या ‘गौरीकुंज’ या घरी सर्व म्युझिशियन्स, ऋषिकेश मुखर्जी आणि योगेश यांना बोलावले.
================================
हे देखील वाचा : Kishore Kumar : किशोर कुमार ‘हे’ गाणं गातांना का नर्व्हस होते !
=================================
सचिनदा यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या गाण्याची रिहर्सल करायला स्टुडिओत जायला नको वाटत होतं म्हणून त्यांनी रिहर्सल आपल्या घरी ठेवली होती. किशोर कुमार यांनी गीतकार योगेश यांना टेप मागितली आणि गाणे ऐकायला सुरुवात केली. पण काहीतरी तांत्रिक प्रॉब्लम असा झाला होता की गाण्याची ट्यूनच वाजत होती. आवाज काही येत नव्हता. गीतकार योगेश यांना देखील खूप आश्चर्य वाटले कारण त्यांनी स्वतः ती टेप ऐकली होती. आता काय करायचे? किशोर कुमार यांनी योगेश यांना विचारले ,” त्या गाण्याचा कागद तुमच्याकडे आहे का?” योगेश म्हणाले,” हो. आहे.” त्यावर किशोर कुमार म्हणाले,” आता तुम्ही या ट्यून वर तुमच्या आवाजात गाणं म्हणा. ते मी ऐकतो आणि त्यानुसार रिहर्सल करतो.”

योगेश यांना थोडी भीती वाटली कारण ते काही गायक नव्हते पण किशोर कुमार यांच्या आग्रहाखातर त्यांनी गायला सुरुवात केली. गाण्यांमध्ये बरेच उतार चढाव आहेत. त्यामुळे ते बऱ्याचदा चुकत होते. एकदा तर त्यांचे उच्चार देखील बिघडले. त्यावर एक म्युझिशियनस कुचकट हसत म्हणाला “योगेशजी, क्या गा रहे हो. अच्छी तरह से गाईये. किशोर जी सून रहे है. “ त्या एका म्युझिशियनसचा हा अपमानित स्वर ऐकल्यानंतर योगेश शांत झाले. गप्प बसले. पण किशोर कुमार चिडले. गीतकाराचा अपमान त्यांना सहन झाला नाही. ते त्या म्युझिशियनसला म्हणाले,” योगेश एक प्रख्यात गीतकार आहे. ते गायक नाहीत. हे लक्षात घ्या. त्यांच्याकडून चूक होणे अपेक्षित आहे. पण या पद्धतीने त्यांचा अपमान केलेला मला आवडलेला नाही. ताबडतोब तुम्ही त्यांची माफी मागा. आणि पुन्हा असला प्रकार करू नका.” त्या ज्युनिअर म्युझिशियनने ताबडतोब योगेश यांची माफी मागितली.
================================
=================================
आता मात्र, किशोर कुमार यांचा मूड गेला होता. त्यांनी सांगितलं ,”ठीक आहे. मला ही गोष्ट अजिबात आवडली नाही . आता मला रिहर्सल करायची इच्छा देखील नाही. आपण उद्या भेटू.” आणि त्यांनी सर्वांना घरी पाठवून दिले. ऋषिकेश आणि योगेश यांनी समजूत काढली पण किशोर यांचा मूड गेला होता. सर्व जण घरी गेल्यानंतर योगेश यांनी किशोर कुमार यांना फोन करून माफी मागितली त्यावर किशोर कुमार म्हणाले,” अरे भाई योगेश तू माफी मागतोयस? मी तुला काहीच म्हणालो नाही. आणि तू गीतकार आहेस. तू गीत खूप चांगले लिहिलेल आहेस. आणि तुझ्याकडून गायच्या अपेक्षा नाहीतच. तू तुझं काम चोख केलं आहेस.” दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे म्युझियन्स एकत्र आले किशोर कुमार यांनी थोडे इम्प्रोव्हायझेशन करून गाणं तयार केलं. आणि गायलं. सर्वांना गाणं खूपच आवडले. गाण्यांमधील भावना किशोरच्या धीर गंभीर स्वरात खूप चांगल्या उमटत होत्या. दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग ठरलं. राहुल देव बर्मन यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डिंग पार पाडलं. ही टेप सचिनदा यांना ऐकवण्यात आली त्यांना देखील खूप आवडली. अशा पद्धतीनं ‘आये तुम याद मुझे…’ हे यमन रागातील गाणे रेकॉर्ड झालं.