रफींच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे काही खास किस्से…
आज २४ डिसेंबर ! ख्यातनाम पार्श्वगायक महंमद रफी यांचा जन्म दिवस. सिनेमासंगीताच्या इतिहासात महंमद रफी यांच्या नावाशिवाय आपण तसूभरही पुढे सरकू शकत नाही. रफीच्या स्वराचे चाहते जसे आपल्या देशात होते तसेच ते जगभरात होते. रफीच्या स्वराला जात, धर्म, वंश, लिंग, राव, रंक असे काहीही बंधन नव्हते. त्याचेच हे दोन किस्से.
४ फेब्रुवारी हा श्रीलंकेचा स्वातंत्रदिन. या सोहळ्याच्या निमित्ताने १९८० साली त्यांनी म.रफीला निमंत्रित केले होते. कोलंबोत एका मोठ्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला १२ लाख रसिकांची उपस्थिती होती. हा एक मोठा विक्रम होता. श्रीलंकेचे राष्ट्रपती जे आर जयवर्धने आणि पंतप्रधान प्रेमदासा हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. खरं तर ते उदघाटन करून लगेच निघणार होते पण रफीच्या धुंद स्वरांनी त्यांना खिळ्वून ठेवले. त्यांनी त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून रफीच्या गीतांचा स्वरानंद घेतला. ज्या देशात, प्रांतात रफी गाण्याच्या कार्यक्रमात जात असे तिथल्या स्थानिक भाषेत एक गाणे नक्की गात असे. त्या दिवशी देखील रफीने सिंहली भाषेत एक गाणे गायले. त्यावेळी सारे प्रेक्षक इतके खूष झाले की त्यांच्या नाच गाण्याला आवर घालण्यासाठी पोलीसांना पाचारण करावे लागले!
रफी यांना बॉक्सिंगचे खॆळ पाहण्याचा मोठा शौक होता. एकदा शिकागो येथे एका शो साठी रफी गेले होते योगायोगाने तिथे त्या काळचा बॉक्सिंग चॅंपियन महंमद अली तिथेच होता. रफीने त्याला भेटण्याची इच्छा प्रकट केली. अलीची भेट मिळणं सोपं नव्हतं. पण वकीलातीतील अधिकार्यांनी जेंव्हा ‘तू जसा बॉक्सिंग मध्ये चॅंपियन आहेस तसेच रफीसाब गाण्यातील चॅंपियन आहेत’ असे सांगितल्यावर तो लगेच भेटायला तयार झाला व या दोन महान ’महंमदांची’ भेट झाली. या दोघांची भेट अविस्मरणीय ठरली. या दोघांचा बॉक्सिंग पोझ मधील एकमेकांना ठोसा लगावतानाचा फोटो त्या काळी खूप गाजला होता. म.रफी यांनी भारतातील सर्व भाषांमधून गायन केले. त्यांनी दोन इंग्रजी गाणी देखील गायली आहेत.
हे हि वाचा : तोरबाज: अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमचं वास्तव…
वस्तुत: ही गाणी म्हणजे त्यांनीच हिंदीत गायलेल्या दोन लोकप्रिय गीतांचा इंग्रजी अवतार आहे. हम काले है तो क्या हुआ दिलवाले हैं(गुमनाम) याचे ‘द शी आय लव्ह इज ब्यूटीफूल ब्यूटीफूल’ आणि बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है (सूरज) याचे ‘ऑल दो वुई हेल फॉम डिफरंट लॅन्डस’ ही ती गाणी होती. दोन्ही गाणी हरींद्रनाथ चट्टोपाध्याय आणि लिहिली होती व संगीत शंकर जयकीशन यांचे होते!