आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा Tighi चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

जेव्हा Kishore Kumar यांच्यासाठी म. रफींनी प्लेबॅक दिला!
पन्नास आणि साठच्या दशकामध्ये आपल्या गायकीपेक्षा अभिनयात रमलेल्या किशोर कुमार यांचा जलवा काही वेगळाच होता. या काळात त्याने पार्श्वगायन करताना केवळ स्वत: साठी आणि देव आनंद करीता प्लेबॅक दिला. अभिनयात जास्त व्यस्त असल्यामुळे पार्श्वगायनाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. या काळात किशोर कुमार यांच्या चित्रपटांना चांगले यश मिळत होते. अभिनेता म्हणून त्यांनी रसिकांवर मोठी छाप पाडली होती. एक लोकप्रिय अभिनेता म्हणून त्यांचे डिमांड जबरदस्त होती. ‘नौकरी’, ‘चलती का नाम गाडी’, ‘भाई भाई’ ,’आशा’, ‘मिस मेरी’…. हे सिनेमे किशोरच्या अभिनयासाठी आजही आठवले जातात.

या काळात १९५८ साली एक चित्रपट आला होता ‘रागिनी’. या चित्रपटात किशोर कुमार नायक होता आणि नायिका होती पद्मिनी. हा चित्रपट अशोक कुमार यांनी निर्माण केला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन आर के रखन यांचे होते. हा चित्रपट रसिकांच्या लक्षात आहे किशोर कुमार यांच्या अभिनयासाठी आणि त्याचप्रमाणे या चित्रपटात एक गाणे जे किशोर कुमार वर चित्रीत झाले होते ते चक्क मोहम्मद रफी यांनी गायले होते! अर्थात संपूर्ण कारकिर्दीत किशोर कुमार साठी मोहम्मद रफी यांनी नऊ गाण्यांमध्ये प्लेबॅक दिलेला आहे. त्यापैकी ‘रागिनी’ या चित्रपटातील ‘मन मोरा बावरा निस दिन गाये गीत मिलन के’ हे गाणं सर्वाधिक लोकप्रिय ठरले. किशोर कुमार स्वतः उत्तम गायक असताना त्यांच्यावर चित्रित हे गाणं म.रफीने का गायलं? किंवा म. रफी यांच्याकडून ते गाणं का गाऊन घेण्यात आलं?

याबाबत अजूनही रसिकांमध्ये एक मत होत नाही कारण याबाबत अनेक स्टोरीज आहेत. पैकी सोशल मिडीया /गुगल वरची लोकप्रिय स्टोरी म्हणजे ‘मन मोरा बावरा…’ हे ओ पी नय्यर यांनी स्वरबद्ध केलेले गाणं ‘केदार’ या शास्त्रीय रागावर आधारित आहे. किशोर कुमार यांनी कुठलेही शास्त्रीय संगीताचे विधिवत शिक्षण घेतलं नसल्यामुळे त्यांनी हे गाणं गायला असमर्थता दर्शवली आणि हे गाणं रफी यांच्याकडून गाऊन घेण्यात आले. याबाबतची दुसरी स्टोरी अशी आहे जी चित्रपट अभ्यासक इसाक मुजावर यांनी आपल्या ’चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ’ पुस्तकात सांगितली आहे; आणि मला वाटतं ती जास्त ऑथेंटिक आहे.

‘रागिनी’ या चित्रपटात आधी अभिनेता भारत भूषण काम करणार होते. त्या नुसार चित्रपटाच्या संगीतावर काम सुरू झाले. ओ पी नय्यर त्यांनी भारतभूषण यांच्यासाठी या चित्रपटात रफीचा आवाज वापरायचे ठरवले आणि पहिले गाणे रेकॉर्ड केले ‘मन मोरा बावरा….’ परंतु नंतर अशा काही घटना घडल्या की या चित्रपटातून भारत भूषण यांचा पत्ता कट झाला आणि तिथे किशोर कुमार यांची वर्णी लागली! त्या मुळे या चित्रपटातील इतर गाणी किशोर कुमार यांनी स्वतः गायली आणि ती जबरदस्त लोकप्रिय देखील ठरली. त्यातील सर्वात लोकप्रिय ठरलं ‘मै बांगाली छोकरा करू प्यार को नमस्कारम…’ या शिवाय ’पिया मै हू पतंग तू डोर’,’मुझको बार बार याद न कर’,’मुडमुड हमको देखता ‘ हि गाणी जबरा लोकप्रिय ठरली. ओ पी नय्यर यांनी स्वरबद्ध केलेलं रफी यांनी गायलेले गाणं मात्र बदललेल्या परिस्थितीत देखील चित्रपटात कायम ठेवायचे ठरवले आणि हे गाणं किशोर कुमार वर चित्रीत झाले.
================================
हे देखील वाचा : Shammi Kapoor आणि राजकुमार या दोघांनी जेव्हा रफींच्या स्वराचा हट्ट धरला होता!
================================
किशोर कुमार तानपुरा घेऊन हे गाणं गातो अशी चित्रपटात सिच्युएशन होती या दोन स्टोरीच्या व्यतिरिक्त आणखी देखील काही स्टोरीज या गाण्याबद्दल समाज माध्यमात फिरत असतात. पण मला वाटतं इसाक मुजावर सारख्या ज्येष्ठ चित्रपट अभ्यासकाने मांडलेले तथ्य जास्त ऑथेंटिक वाटते. किशोर कुमार यांच्याकरीता रफीचा स्वर असे एकूण नऊ गाणी आहेत ती पुढील प्रमाणे हमे कोई गम है तुम्हे कोई गम है, चले हो कहां करके बेकरार (भागम भाग), तू मेरा कॉपी राईट मै तेरा कॉपी राईट , अजब है दास्ता तेरी ऐ जिंदगी (शरारत) मै अगर इस मासूम चेहरे को (बागी बादशहा) अपनी आदत है सबको सलाम करना (प्यार दिवाना) पण या सर्व गाण्यांमध्ये गाजलं ते ‘रागिनी’ या चित्रपटातील ‘मन मोरा बावरा….!’