मोठा पडदा ते तिसरा पडदा, व्हाया टीव्ही/व्हिडिओ/चॅनल…
अमिताभ बच्चनबद्दल सतत नवीन काही सांगावेसे वाटते अथवा सांगायची वेळ येते हेदेखील त्याचे खूप खूप मोठे यश आहे.
ताजे उदाहरण, त्यांचा नवीन चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ हा १२ जून रोजी तिसऱ्या पडद्यावर अर्थात ऑनलाईन रिलीज होत आहे. अमेझॉन प्राईम व्हीडीओवर हे प्रदर्शन होईल. या माध्यमातून जगभरातील चित्रपट रसिकांना त्याचा भरभरून आनंद घेता येईल. लॉकडाऊनच्या दिवसात देशविदेशातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत आणि ती कधी सुरू होणार याचे उत्तर कोणाकडेही नाही. अशा पार्श्वभूमीवर आता नवीन चित्रपट ऑनलाईन अर्थात तिसरा पडदा पध्दतीने प्रदर्शित होणे स्वाभाविक आहे. रायझिंग सन फिल्म आणि किनो वर्क्स यांनी आपला हा सूजीत सरकार दिग्दर्शित चित्रपट या माध्यमात रिलीज करण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे निर्माते रॉनी लाहिरी आणि शील कुमार हे आहेत. त्यांनी बदलत्या काळाबरोबर नवीन पाऊल टाकले आहे.
हे होतानाच अमिताभ बच्चन यांनी ‘आणखीन एक विक्रम प्रस्थापित केला आहे’. काही कर्तबगार माणसे अनेकदा तरी आपलेच विक्रम मोडतात आणि नवीन विक्रम प्रस्थापित करतात. ते करताना ते दमत नाहीत, थांबत नाहीत, आपल्या गुणवत्ता, मेहनत आणि शैली या गुणांवर पुढे वाटचाल करीत असतात.
बघा ना, अमिताभ बच्चनची भूमिका असलेला पहिला हिंदी चित्रपट ‘सात हिंदुस्थानी’ (रिलीज ७ नोव्हेंबर १९६९) प्रदर्शित झाला तेव्हा एकपडदा चित्रपटगृहे अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचा काळ होता. ती आपली परंपरागत चालत आलेली पध्दत होती. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचण्याच्या बदलत्या काळाबरोबर नवीन पध्दती आल्या, इतकेच नव्हे तर अमिताभ बच्चनला एबी आणि मग बीग बी असे म्हटले जाऊ लागले. तरी त्यांची उर्जा आणि सातत्य कायम आहे. या सर्व काळात ‘नायक ते महानायक’ असाही त्यांनी प्रवास सुरू ठेवला आहे.
मुंबईत २ ऑक्टोबर १९७२ साली दूरचित्रवाणी आले. त्यावर शनिवारी संध्याकाळी मराठी तर रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपट दाखवले जात. अमिताभची भूमिका असलेला त्याच्या करियरच्या सुरुवातीचा एक फ्लॉप ‘संजोग’ नावाचा एक चित्रपट असाच एकदा याच दूरदर्शनवर कधी तरी पाहिल्याचे आठवतेय. पण तो चित्रपट लक्षात ठेवण्यासारखा नव्हता.
१९८२ साली देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओचे आगमन झाले तेव्हा अनेक चित्रपट अधिकृत आणि अनधिकृत मार्गाने व्हिडिओवर येऊ लागले. मला आठवतेय, आमच्या गिरगावातील खोताची वाडीतील एकाकडे व्हिडिओ होता आणि तो पन्नास पैशात नवीन चित्रपट दाखवे. त्या काळात आठ आणे मोठी रक्कम होती. मी अमिताभचा ‘अंधा कानून’ असाच एन्जॉय केला. चाळीतील एका खोलीत आम्ही सगळे दाटीवाटीने बसलो होतो. त्या दशकात अनेक नवे आणि जुने हिंदी चित्रपट व्हिडिओवर आले. त्यात अमिताभचेही होतेच. याच काळात मुंबईत धारावी, ओशिवरा भागात आणि देशभरात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर छोटी व्हिडिओ थिएटर्स सुरु झाली. सरकारने पंचाहत्तर प्रेक्षक संख्या ही अट घातली होती. पण तेथे जमिनीवर अथवा बाकड्यावर बसून चित्रपट पहायला मिळू लागले.
तर आपल्या देशात १९९२ साली उपग्रह वाहिनीच्या आगमनाने माहिती आणि मनोरंजन यांचा स्फोट झाला. घरबसल्या चोवीस तास काही ना काही पाहता येऊ लागले. आता बीग बी म्हणून ओळखल्या जात असलेल्या या सुपर स्टारचा ‘खुदा गवाह’ याच वर्षी प्रदर्शित झाला. या दशकात हिंदी चित्रपटाच्या अशा स्वतंत्र वाहिन्या सुरु झाल्या. त्यावर अनेकदा तरी बीग बीचे जुने चित्रपट प्रक्षेपित करताना जणू त्याच्या चित्रपटाचा महोत्सव रंगला. एव्हाना चित्रपट दिग्दर्शक आणि रसिकांची पिढी ओलांडूनही बीग बी कार्यरत होते.
तर २००० साली बीग बी यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ चे सूत्रसंचालन सुरु केलं. तोपर्यंत मोठा स्टार असा ‘छोट्या पडद्यावर येणे’ डाऊन मार्केट मानले जात होते. पण शुध्द हिंदी, अनेक विषयांचा अभ्यास आणि हॉट सीटवरील प्रत्येक स्पर्धकाला कन्फर्ट झोन देणे या गुणांवर बीग बीनी हा खेळ मस्त रंगवला. तो त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती केन्द्रीत राहिला आणि मग त्याचे एकेक करत अनेक सिझन आले.
नवीन शतकातील पहिल्या दशकात मल्टीप्लेक्स युग आले. चकाचक पॉलीश्ड चित्रपटगृहे ही संस्कृती रुजली. एकाच जागी पाच सात छोटी मोठी थिएटर हा ट्रेण्ड आला. या काळात कभी खुशी कभी गमपासून बीग बीचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पा, बदला, पिकू वगैरे वगैरे बरेच. त्यांनी वयपरत्वे आपल्या भूमिकांचा ट्रेण्ड बदलला.
हे सगळे बदल होत जाताना आता अगदी मोबाईल फोनवन अर्थात आपल्या हातातही सिनेमा आला. आणि तेथेही बीग बी कार्यरत आहेत. म्हणजे त्यांचा चित्रपट आपल्याला प्रवासातही पहायला मिळतोय.
डिजिटल युगात तर चित्रपट आपल्यापर्यंत पोहचणे आणखीन सोपे झाले. एक नवीन माध्यमच एस्टाब्लिश होत आहे. तेथेही आता अनेक नवीन चित्रपट थेट ऑनलाईनला अर्थात तिसरा पडद्यावर प्रदर्शित होऊ लागले आहेत आणि तेथेही बीग बी यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
एकाच स्टारचा आपले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा केवढा मोठा आणि बदलता प्रवास सुरू आहे बघा. कधी काळी अगदी ‘गल्ली चित्रपटा’ मध्येही अमिताभच्या ‘जंजीर’, ‘खून पसिना’, ‘हेरा फेरी’ यांना जबरदस्त मागणी होती, तर रमेश सिप्पी दिग्दर्शित ऑलटाईम बहुचर्चित चित्रपट ‘शोले’ (रिलीज १५ ऑगस्ट १९७५) या मल्टी स्टार कास्ट चित्रपटातही अमिताभ सरस आहेच….
म्हटलं ना, बीग बी हा कदापी न संपणारा विषय आहे. अगदी टीकाकारही मागे पडले पण सतत नवीन माध्यमांसह बीग बीची चौफेर आणि यशस्वी वाटचाल सुरु आहे. अर्थात, या प्रवासातील गंगा जमुना सरस्वती, तुफान, जादुगर असे अनेक चित्रपट निराशाजनकही आहेत. काही दणकून फ्लॉपही झाले, म्हणून काही प्रवास थांबला नाही. तेच तर महत्वाचे आहे….
दिलीप ठाकूर