निर्मिती सावंत यांची अशीही फॅन
नाट्यकलावंतांना खरी उमेद देतात ते त्यांचे चाहते. एखादं नाटक पुन्हा पुन्हा पहाणारे चाहते, कलाकारांसाठी खास भेट घेऊन येणारे चाहते,कलाकारांच्या भेटीसाठी आटापिटा करणारेच चाहते यांच्यापेक्षा एका खूप वेगळ्या चाहतीचा अनुभव सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी घेतला आहे. ‘डबलट्रबल’ या व्यावसायिक नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण करणा-या निर्मिती सावंत यांची जाऊबाई जोरात, शामची मम्मी, व्हॅक्युम क्लीनर, श्री बाई समर्थ अशी सगळीच नाटकं खूप गाजली.
‘शामची मम्मी’ नाटकाचा प्रयोग खेड इथे नव्या नाट्यगृहात होणार होता. या नाट्यगृहातील तो पहिलाच प्रयोग. नाटकाची पूर्ण तयारी झाली. दुसरी घंटा वाजली. तिसऱ्या घंटेच्या आधी एक मुलगा निर्मितीताईंजवळ आला. तो काही सांगू पहात होता. पण नाटक सुरू व्हायच्या काही क्षण आधी कुठल्याही अन्य कलाकाराप्रमाणे निर्मितीताई पूर्णपणे नाटकाच्या माहोलमध्ये शिरल्या होत्या.त्यामुळे त्यांनी त्या मुलाला नंतर नंतर सांग करत तिथेच थांबवलं.
हेही वाचा : नाट्यप्रयोगात बाळ रडते तेव्हा…
नाटक सुरू झालं. पहिल्याच प्रवेशात निर्मितीताई देवांना नमस्कार करताहेत असं दृश्य होतं. नमस्कार करत करत निर्मितीताईंनी प्रेक्षकात नजर फिरवली. कितीही मोठा कलाकार असला तरी नाटकाचा प्रेक्षकवर्ग कसा आहे हे पाहण्यात प्रत्येक कलाकाराला रस असतोच. तर प्रेक्षकांकडे पाहताच निर्मितीताईंना धक्काच बसला.समोर चक्क स्ट्रेचरवरून कुणी तरी नाटक पहायला आलं होतं. हा धक्का कसाबसा पचवत निर्मिती ताईंनी ते दृश्य पूर्ण केलं आणि त्या विंगेत आल्या. हे असं काय आहे? हा प्रश्न त्यांना पडला होता. तिसऱ्या घंटेच्या आधी निर्मितीताईंशी बोलू पाहणारा तो मुलगा तिथेच उभा होता. त्याने त्या स्ट्रेचरवरच्या प्रेक्षकाची कथा सांगितली. त्या स्ट्रेचरवर एक दुर्धर आजाराने ग्रासलेली मुलगी होती. दीर्घकाळ ती हॉस्पिटलमध्येच होती. निर्मिती सावंत यांची ती जबरदस्त फॅन!. त्याकाळी निर्मिती यांची ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ मालिका तुफान गाजत होती. त्या मालिकेतील हे गंगुबाईचं पात्र त्या मुलीला विलक्षण प्रिय होतं त्यामुळे नाटकाच्या दौऱ्यासाठी निर्मिती सावंत खेडला आल्या आहेत हे कळताच हॉस्पिटलमधून रितसर परवानगी घेऊन आणि सगळ्या वैद्यकीय सुविधांसह ती मुलगी स्ट्रेचरवरुन फक्त आणि फक्त निर्मिती सावंत यांना पहायला आली होती. कुठल्याही कलाकाराला नि:शब्द करणारा हा प्रसंग. अर्थातच निर्मिती यांनी त्या मुलीची प्रयोगानंतर भेटही घेतली आणि भविष्यात तिच्याशी संपर्कही ठेवला.
कित्येक नाटकांतून हाडाचा कसबी कलाकार आपल्या अभिनयामधुन प्रेक्षकांना आनंदानुभव देत असतो. पण काही वेळा हे असे प्रसंग त्या कलाकाराला माणूस म्हणून, अभिनेता म्हणून समृद्ध करुन जातात.कोणत्याही नाटकातून कमावलेल्या पैशांपेक्षा हे असे क्षण म्हणजे त्या कलाकारांची खरी श्रीमंती!
हे वाचलेत का ? जेव्हा बाळासाहेबांनी दिली होती गलगलेंना दाद…