महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
चित्रनगरीतील देऊळ एक, देव अनेक…
चित्रपट स्टुडिओतील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, काही फिक्स्ड सेट्स…कायमस्वरुपी हुकमी जागा. उदाहरणार्थ, देऊळ. अनेक चित्रपटात देवळातील प्रसंग (यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार ‘मधील अमिताभ बच्चन अर्थात विजय देवाशी संवाद साधतो), एखादे गाणे (सुल्तान अहमद दिग्दर्शित ‘हीरा’ या डाकूपटातील सुनील दत्त व आशा पारेख यांच्यावरचे मै तुमसे मिलने आई मंदिर जाने के बहाने…), देवळात चोरी (रवि टंडन दिग्दर्शित ‘आन और बान’ या चित्रपटात होती), गावातील जत्रा वगैरे प्रसंग असतात. कोणी प्रत्यक्ष देवळात जाऊन शूटिंग करते, कोणी देवळाचा सेट (Temple Set) लावते, तर कोणी एकाद्या स्टुडिओतील कायमस्वरुपी देवळाच्या सेटमध्ये (Temple Set) आवश्यक असे बदल अथवा भर घालून, रंगरंगोटी करुन शूटिंग करते. हे दिग्दर्शकावर अवलंबून असते म्हणा अथवा निर्मात्याच्या बजेटवर असते म्हणा. चित्रपटाच्या चित्रचौकटीनुसार निर्णय घेतला जातो. चित्रपट अनेक लहान लहान गोष्टीतून आकार घेत असतो तो असा.
मुंबईतील काही चित्रपट स्टुडिओत असे ‘पक्के देऊळ, बदलता सेट्स’ (Temple Set) असा फिल्मी प्रकार अनेक वर्ष मी अनुभवत आलो आहे. आणि असेच एक हुकमी देऊळ गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत अगदी सुरुवातीपासूनच, म्हणजे १९७८ सालापासून आहे. चित्रनगरीच्या मूळ इमारतीपासून ते साधारण मैलभर लांब आहे. अतिशय सुंदर अशी त्याची रचना आहे. पायर्या, गाभारा आणि अवतीभवतीचा हिरवागार निसर्ग असा छान संगम जूळून आला आहे. लांबून जरी पायर्यांखाली जनरेटर व मेकअप व्हॅन दिसल्या की, देवळात चित्रपट वा मालिकेचे शूटिंग असल्याची खात्री पटते. फक्त आजच्या शूटिंगसाठी याच देवळात मूर्ती कोणत्या देवदेवतीची आहे हे पाहायचे. ती कधी थीमनुसार तर कधी उपलब्धतेनुसार असणे अगदीच स्वाभाविक. या देवळातील शूटिंग (Temple Set) रिपोर्टींगच्या काही आठवणी विशेष आहेत…
राजेश खन्नाने आपल्या आशीर्वाद फिल्म या बॅनरखाली शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अलग अलग ‘ ( १९८५)च्या निर्मितीनंतर एस. व्ही. चंद्रशेखरराव दिग्दर्शित ‘जय शिव शंकर’ या चित्रपटाची निर्मिती करताना याच देवळात या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आयोजन केल्याचे आमंत्रण हाती येताच त्यावरचे डिंपल कापडियाचे नाव मला जणू जोरका धक्का धीरेसे लगे झालं. अहो, त्या दिवसांत या स्टार नवरा बायकोत अजिबात पटत नाही, त्यांच्यात सतत जोरदार शोरदार भांडण होतात म्हणून ते वेगळे राहताहेत आणि डिंपलने ‘बाॅबी’ ( १९७३) नंतर तब्बल बारा वर्षांनी ‘सागर’ ( १९८५) पासून चित्रपट क्षेत्रात पुनरागमन केले वगैरे वगैरे मीठ मसाला हिंग जिरे तेल घालून रंगवलेल्या गाॅसिप्स स्टोरीज, स्कूप, काॅन्ट्रोव्हर्सीज चर्चेत असतानाच हे अचानक एकत्र हीच गोष्ट या मुहूर्ताला कधी बरे हजर राहतोय याची उत्सुकता वाढवत होती. १९८८ सालची ही गोष्ट. पण अगदीच कालपरवाच घडली अशी व इतकी लख्ख आठवतेय, याचे श्रेय त्या रोमांचक क्षणाला.
एका खाजगी बसने आम्ही मिडियावाले या मुहूर्ताला जात असतानाच आम्ही बोरुबहाद्दरांनी पॅड अथवा वही तर फोटोग्राफर्सनी अगोदरपासूनच फ्लॅशसह कॅमेरे सज्ज ठेवले होते. हे पिक्चर सेलिब्रिटीज पती पत्नीमधील दुरावा कमी करत असतानाचा या क्षणाचा ऑखो देखा हाल मस्त लाईव्ह अनुभव होता. या पिक्चरचा निर्माता असला तरी ‘तो राजेश खन्ना होता’ त्यामुळेच तो थोडा उशीरा सेटवर आला यात आश्चर्य नव्हते. डिंपल तत्पूर्वीच नारंगी साडीत आली आणि धडाधड फ्लॅश उडू लागले. या दोघांनी व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून व्यावसायिकदृष्ट्या एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय ‘देवळाच्या सेटवर’ (Temple Set) अंमलात आणत होते हा यात वेगळा टच. देवाच्या साक्षीने हे घडत होते. याच वातावरणात राजेश खन्ना व डिंपल आम्हा सिनेपत्रकारांना स्वतंत्रपणे आवर्जून भेटले. (म्हणूनच मोठे स्टार अथवा सेलिब्रिटीज चित्रपट निर्माते व्हावेत, ते एकदम नाॅर्मल वागू लागतात.) या दोघांवर आमची नजर असतानाच या चित्रपटातील जितेंद्र, पूनम धिल्लाॅन, चंकी पांडे, संगिता बिजलानी असे एकेक करत आले. राजेश खन्नाला शुभेच्छा द्यायला दिग्दर्शक विजय आनंद, बी. आर. चोप्रा, राहुल देव बर्मन, शक्ती सामंता, कमलेश्वर,के. सी. बोकाडिया वगैरे अनेक आले. देवळाचा परिसर पाहुणे, आम्ही मिडियावाले आणि मोठे मोठ्ठे पुष्पगुच्छ यांनी भरुन/खुलून/रंगवून गेला. मुहूर्त दृश्य होताच प्रसाद म्हणून भला मोठा मिठ्ठास पेढा. बरेच दिवस या मुहूर्ताची चर्चा रंगली.
याच देवळातील ‘आठवणीतील फिल्मी मुहूर्त’ दीपक शिवदासानी दिग्दर्शित ‘लढाई’ ( १९८८) या चित्रपटाचा! त्या काळात “सेटवरची रेखा आणि तिचं वावरणं” हा चक्क एका माहितीपूर्ण लेखाचा हिट टाॅपिक होता (प्रत्येक काळाची काही खास वैशिष्ट्य असतातच म्हणा.) या मुहूर्ताच्या वेळच्या सगळ्याच गोष्टी रेखाभोवती होत्या. मिथुन चक्रवर्ती व मंदाकिनी मुहूर्ताला हजर होते इतकेच. रेखा देवळातील मूर्तीची पूजा करताना ‘अन्यायाचा सूड उगवायची शपथ घेते’ असे मुहूर्त दृश्य होते. रेखाने ते सहज साकारत मुहूर्ताचा मूड कायम ठेवला. आमंत्रणावर दिलेल्या वेळेपेक्षा दीडेक तासांनी मुहूर्त झाला या तद्दन फिल्मी संस्कृतीची एव्हाना सवय झाली होतीच म्हणा. (Temple Set)
याच देवळात स्टार मेकअपमन दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या आणि श्रीधर जोशी दिग्दर्शित ‘आक्का ‘( १९९४) मधील अमिताभ व जया बच्चन यांच्यावरील ‘तू जगती अधिपती, नमन तुला पहिले श्री गणपती ‘ या श्रीगणेश भक्तीगीताचे शूटिंग होत असतानाच दीपक सावंत आपल्या साहेबांच्या अर्थात अमिताभच्या सहकार्यामुळे प्रचंड भारावून गेले होते. आजही ते ही आठवण ते आवर्जून सांगतात. यानिमित्त अमिताभ व जयाजी पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या पडद्यावर आले हे याच देवळाच्या साक्षीने घडले. दिलीप कल्याणी निर्मित व राजू पार्सेकर दिग्दर्शित ‘दुर्गा म्हणत्यात मला’ ( २०१२) मधील ‘अखंड ज्योत तेवते, तुझ्या निरांजनातील ‘या गाण्याचे शूटिंग याच देवळाच्या आवारात रंगले. या शूटिंग रिपोर्टीगसाठी हजर असतानाच दीपाली सय्यद या नृत्य गीतासाठी कमालीची मेहनत घेत होती आणि घामटं निघत असतानाच पुन्हा पुन्हा सज्ज होत होती, हा अनुभव वेगळाच व थक्क करणारा होता. यावेळच्या शूटिंगमधील फिल्मी देवी तिला प्रसन्न झाली असती तरी आश्चर्य वाटले नसते. फिल्डवर्कवर असे अस्सल लाईव्ह अनुभव बरेच येतात.
======
हे देखील वाचा : फिल्मी मुहूर्ताचा थाटमाट
======
या अशाच आणखीन चित्रपट स्टुडिओतील देवळातील माझ्या आठवणी अनेक. प्रत्येक वेळेस त्यातील मूर्ती बदलली जातेय, लहान मोठी असते याची मला सवय आपोआप लागली तरी हे स्टुडिओतील देव किती चित्रपटांना पावले हा मात्र वेगळाच विषय… आमचे दिग्दर्शक मनमोहन देसाई एका मुलाखतीत म्हणाले होते, आपल्या देशात कुटुंबात एकादी व्यक्ती आजारी पडली की एकजण त्याला घेऊन डाॅक्टरकडे जाते तर दुसरी व्यक्ती देवळात जाऊन आशीर्वाद मागते, आजारी माणूस बरा व्हावा म्हणून नवस बोलते. आपली हीच संस्कृती, परंपरा व सवय आहे. मनजींच्या याच उत्तरात मला अनेक चित्रपट स्टुडिओत देऊळ (Temple Set) आणि अनेक चित्रपटात देवपूजा का असते याचे उत्तर मिळाले.