Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish

फडावरची लावणी फेमस करणाऱ्या लावणीसम्राज्ञी Sulochana Chavan!
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavhan) यांनी आपल्या अंदाजात ठसकेबाज लावणी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवली… फडावरची लावणी सुलोचना यांनी अधिक लोकप्रिय केली… वयाच्या नवव्या वर्षापासून सुलोचणा यांनी गाणं गायला सुरुवात केली… आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी जाणून घेऊयात सुलोचना यांचा सांगितिक प्रवास…
तर, मुंबईच्या गिरगावात लहानाच्या मोठ्या झालेल्या सुलोचना यांनी उर्दू, मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकांतही काम केलं होतं… एका मुलाखतीत सुलोचना यांनी नेमकी लावणी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली याचं उत्तर दिलं होतं… एबीपी माझाशी बोलताना सुलोचना म्हणाल्या होत्या की, “आमच्याकडे एक मोठा ग्रामोफोन होता. आणि माझ्या भावाने एक रेकॉर्ड आणलं होतं. वत्सलाबाई कुंपेकर यांची सरकारी पाहुणेमधील बैठकीच्या लावणीची रेकॉर्डिंग लावली होती. ती लावणी अशी होती.. “सांभाळ गं…सांभाळ गं…सांभाळ दौलत लाखाची गं..तुझ्या ज्वानीची कस्तुरी पाहून गं..चहूबाजूंनी येतील पारधी गं..सांभाळ गं” हे रेकॉर्डींग चालू होतं.आणि तेव्हा आईने ती बंद करायला सांगितली होती. तेव्हा घरात फार वातावरण तापलं होतं पण ती लावणी ऐकूनच मी दुसऱ्या लावण्या म्हणायला लागले. आणि तिथून प्रवास सुरु झाला”…

या मुलाखतीत सुलोचना यांनी पहिल्या रेकॉर्डिंगचाही किस्सा सांगितला होता… त्या म्हणाल्या होत्या की,”माझं पहिलं रेकॉर्डिंग मी परकर पोलक्यात ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटासाठी केलं होतं. विशेष म्हणजे त्यांच्या आवाजात बालिशपणा नव्हता आणि म्हणून त्यांना एकावर एक प्रोजेक्ट मिळत गेले”… दरम्यान, सुलोचना यांना लग्नाआधीच सी. रामचंद्र, मोहम्मद रफी, मन्ना डे यांच्यासारख्या अनेक दिग्गज गायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती…
सुलोचना यांनी ‘रंगल्या रात्री’ अशा या मराठी चित्रपटात पहिल्यांदा लावणी गायली होती… मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, “मी खरं तर मूळ हिंदीची कलाकार होते. सुरुवातीला एका ठिकाणी मी दोन मराठी लावण्या गायल्या होत्या. त्यानंतर माझ्या नवऱ्याने कलगीतुरा कार्यक्रमही सुरू केला होता. त्याठिकाणी म्हटलेली लावणी ऐकून वसंत पवार यांनी मला पहिली लावणी दिली.जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ‘मला हो… म्हणत्यात लवंगी मिरची’ ही माझी पहिली लावणी. ती इतकी लोकप्रिय झाली, की त्या लावणीच्या बळावर मला अनेक पुरस्कार मिळाले”…
================================
हे देखील वाचा : Sanju Rathod : मराठी पोट्ट्याने पॉप म्युझिकचं अख्खं मार्केट जाम केलंय!
================================
इतकंच नाही तर चित्रपती व्ही शांताराम (V.Shantaram) यांनी सुलोचना यांच्या रेकॉर्डिंगचा स्पीड पाहात तुला भुतानं झपाटलं आहे का गं? असं विचारलं होतं.. तर झालं असं होतं की, मल्हारी मार्तंडचं रेकॉर्डिंग संपलं आणि त्याचवेळी शांताराम बापू स्टडिओत आले होते… त्यांनी मंगेश देसाईंना विचारलं की किती गाण्याचं रेकॉर्डिंग झालं? त्यावर देसाई म्हणाले की १० गाणी. ते ऐकताच शांताराम यांनी सुलोचना यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की, “सुलोचना, तुला भुताने झपाटलंय का गं? अगं एका दिवसात दहा-दहा गाणी गायची?”… त्यांची ही कौतुकाची थाप खरंच फार मोठी होती असल्याचंही सुलोचना यांनी म्हटलं होतं… भारतीय संगीतसृष्टीत आपल्या गायकीने अमुल्य योगदान देणाऱ्या सुलोचना चव्हाण यांना कलाकृती मीडियातर्फे भावपूर्ण आदरांजली.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi