
Multiplex चा रंग काही वेगळाच!
चित्रपट कसा आहे, याबरोबरच चित्रपट कसा दिसतो हेदेखील महत्त्वाचे. त्यातूनच चित्रपट कसा पहावा याचेही उत्तर मिळते. तुम्ही ‘धुरंदर’ नक्कीच पाहिला आहे, एन्जॉय केला आहे. अतिशय उत्तम असा एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट करणारा व्यावसायिक चित्रपट आहे आणि मला जे म्हणायचं आहे, ते तुमच्या चांगलेच लक्षात आले आहे. मल्टीप्लेक्सचा भव्य दिव्य दिमाखदार पडदा, उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम, चित्रपटाची तीन तास चौतीस मिनिटे अशी लांबी, चित्रपटात एकात एक गुंतलेले अनेक घटक, पटकथेत अतिशय हुशारीने पेरलेली कमी अधिक प्रमाणात जुन्या चित्रपटातील गाणी, FA9LA या बहरेन अरबी असं फ्लिपराची रॅप, त्या बलोची लोकसंगीतावरचे अक्षय खन्नाचे नृत्य, चित्रपटाचे कला दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, वेशभूषा, रंगभूषा यांचा प्रभावी वापर, संजय दत्त, रणवीर सिंग, आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी वगैरे वगैरे अनेक लहान मोठे कलाकार आणि या सगळ्यावर दिग्दर्शक आदित्य धर यांनी घेतलेली मेहनत हे सगळे मल्टीप्लेक्सच्या भव्य स्क्रीनवर एकदम कम्माल दिसते.
मी गिरगावात लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील रिगल चित्रपटगृहापासून ताडदेवच्या गंगा जमुना चित्रपटगृहापर्यत सर्वच सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहांत ‘स्टॉलचा हुकमी प्रेक्षक’ या नात्याने (पडद्यासमोरच्या पहिला चार रांगा.) मराठी व हिंदी चित्रपट पाहून पाहून मोठा झालो. त्या काळातील अशा सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये टाळ्या व शिट्ट्यांनी पिक्चर एन्जॉय करण्यात वेगळाच आनंद मिळाला. गल्ली चित्रपटही एन्जॉय केले. माझ्या सिनेपत्रकारातीची पाळेमुळे अशी खोलवर रुजलीत. समाजातील खालच्या माणसापर्यंत पोहोचलेल्या चित्रपटांवर लिहिणं बोलणं सांगणं ऐकणं हा एक अलिखित नियमच मी पाळला.

आपल्या देशात नवीन शतकाच्या सुरुवातीस आलेले मल्टीप्लेक्स कल्चर पंचवीस वर्षात कमालीचे रुजताना तेथे चित्रपट पाह्यचा तर सकाळच्या वेळेत तिकीट दर कमी असतात म्हणून पहावा लागतो. मल्टीप्लेक्स हे प्रामुख्याने उच्च मध्यमवर्ग आणि उच्चभ्रू वर्ग यांच्या ‘एन्टरटेन्मेंट’साठी आहे आणि तेथे यायचं तर स्वतःची चार चाकी गाडी हवी असा अलिखित नियम. महागडा समोसा पॉपकॉर्न आणि शीतपेये यांचा आस्वाद घेत घेत चित्रपट पाहणारे तेथे अनेक. पिक्चर पाहायला गेल्यावर मध्यंतरात काही खायला हवेच (अथवा वडापाव खाव्वा) असं अजिबात नाही अशा संस्कारांत वाढलो. म्हणून तर एकेक करत करत अनेक सिंगल स्क्रीन थिएटर काळाच्या ओघात लुप्त होत जाताना कायमच हळहळतो. चित्रपटगृह आणि मिडियात आल्यावर मुंबईतील जुने चित्रपट स्टूडिओ यात मी रमलो. घडलो. त्यांचं पाडलं जाणे मला कायमच जुन्या आठवणींत नेणारं…
मल्टीप्लेक्स हे आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला सुखावणारे. आणि त्याच मल्टीप्लेक्सच्या भव्य पडद्यावर ‘दशावतार’, ‘कैरी’ असे मराठी चित्रपट आ’णि ‘पुष्पा’, ‘कांतारा’, ‘ऍनिमल’, ‘पठाण’, ‘पुष्पा २’ असे पडद्याच्या कानाकोपऱ्यात भरलेले चित्रपट पाहण्याची आवड निर्माण होणं स्वाभाविक आहे. मुंबईतील ट्राम केव्हाच बंद झाली. मला आठवतंय साधारण १९६९ सालापर्यत ग्रॅन्ड रोड येथील नोव्हेल्टी चित्रपटगृहासमोर ट्रामचे रुळ होते. आणि वडिलधाऱ्यांकडून माहिती मिळे, त्यावरुन नाना चौक ते माझगाव अशी ट्राम होती. मुंबईतील घोडागाडी कालबाह्य झाली, लहानपणी गिरगावात खोताची वाडीच्या नाक्यावर घोडागाडीवाला असे. जुन्या कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटात ट्राम, घोडागाडी, ॲम्बेसेडर टॅक्सी पाहायला मिळतात.
================================
हे देखील वाचा : कमबॅक Akshaye Khanna आणि विनोद खन्ना यांचा
================================
आज मुंबईने मल्टीप्लेक्स, मेट्रो ट्रेन,मोनो रेल्वे, कोस्टल रोड, अटल सेतू असं नवे रुपडे धारण केले आहे. आणि मल्टीप्लेक्स युगात आजचा चित्रपटही तांत्रिक प्रगतीने अतिशय देखणा असा झाला आहे. (अर्थात, त्याची थीम आणि त्याचे प्रभावी सादरीकरण या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. चित्रपट माध्यम आणि व्यवसाय आता गरीब राहिलेला नाही. हा फार खर्चिक उद्योग आहे.) फार पूर्वी म्हटले जाई, ‘पिक्चर दिल से बनती है, पैसे से नहीं’. आजच्या स्पर्धात्मक युगात म्हणावं लागेल, ‘बहोत पैसा है तो दिलसे फिल्म बनती है’.

मल्टीप्लेक्सला मोबाईल स्क्रीन लॅपटॉप ओटीटी हे पर्याय आहेत. पण महामनोरंजक सुपर डुपर हिट चित्रपटाची खरी रंगत मल्टीप्लेक्सच्या आलिशान वातावरणात आणि त्यातील आलिशान खुर्चीत बसून चित्रपट एन्जॉय करण्यात आहे. मल्टीप्लेक्सने पॉपकॉर्न स्वस्त केला नाही तर चालेल पण तिकीटाचे दर कमी केले (ते फक्त एकच दिवस नकोत) आणि ऑनलाईन बुकींगची अट रद्द केल्यास (ते जुन्या काळातील चित्रपट रसिकांना जमत नाही) तेथील रसिकांची गर्दी वाढत वाढत जाईल. तिकीट खिडकीत हात घालून तिकीट काढण्यातील आनंद काही वेगळाच असतो तो ऑनलाईन बुकींगमध्ये नाही. हातात सिनेमाचं तिकीट आल्यापासून आपण चित्रपटाशी जोडलं जातो.
================================
हे देखील वाचा : Bollywood Celebrity : कलाकाराचा मृत्यू …. कधी खेळ मांडला, कधी गांभीर्य
================================
मल्टीप्लेक्समधील चित्रपटाच्या यशाची टक्केवारी वाढवायची असेल तर तिकीट खिडकी, लॉबीकार्ड (पूर्वी ते पाहण्यातही आनंद मिळे. चित्रपटात अमूक प्रसंग कधी असेल असे मनाचे खेळ सुरू होत), वडापाव (काही मल्टीप्लेक्समध्ये तो महाग मिळतो म्हणे. पोटभर द्या हो, ते पुरेसे आहे) थिएटर डेकोरेशन या जुन्या काळातील प्रथा कायम ठेवाव्यात असं वाटतं तर खरं…. त्यात परंपरा आणि नवता यांची केमिस्ट्री राहिल. मल्टीप्लेक्समधील ऐसपैस जागेत मूकपटांपासूनच्या काही माईलस्टोन चित्रपटांचे मोठे फोटो/ पोर्ट्रेट लावून आजच्या पिढीतील चित्रपट रसिकांना चित्रपटाच्या इतिहासाची ओळख करून द्यावी. त्या काळातील चित्रपटांमुळे आजचे सुगीचे दिवस आले हे विसरु नये…