Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप?

Prem Kahani : प्रेम कहानी मे एक लडका होता है एक लडकी होती है
हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर कधीच न आटणारा झरा म्हणजे प्रेमरस… प्रेमाचा प्रचंड मोठा महासागरच जणू.
चित्रपटाच्या नावापासून (इश्क इश्क इश्कपासून प्रेमपर्यंत केवढी तरी) प्रेमाच्या संवादापर्यंत (जिस दिल मे प्यार न हो वो दिल ही क्या… चित्रपट “सागर“) आणि चित्रपटातील प्रणय प्रसंगापासून (रुपेरी पडद्यावर प्रेम करताना पहावे तर ते देव आनंदला. ओटीटीवर त्याचे साठच्या दशकातील असतील नसतील ते चित्रपट पहा. प्रेमात पडणे म्हणजे काय असते ते समजेल ) प्रेमाच्या गाण्यापर्यंत (हम और तुम, तुम और हम… चित्रपट दाग. अशी प्रेमगीते किती सांगावीत. प्रेमातील ओढ, आगळीक, जवळीक, सहवास, संवाद, प्रणय, असोशी, मोकळेपण, विरह प्रत्येक क्षणावर चित्रपटात प्रेमाचे गाणे. राज कपूरच्या चित्रपटातील खासच). चित्रपटाच्या पोस्टरपासून (खास करुन जुना “बरसात”, “बाॅबी”, “ज्युली”, “सागर”, “दिल” यांची पोस्टर) नवीन पिढीतील “प्रेमाची गोष्ट” (याची सुरुवात “दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे” पासूनची)… कधी प्रेमाच्या गोष्टीचा क्लायमॅक्स शोकात्म (एक दुजे के लिए)

अशा या प्रेमरसातील एक विशेष उल्लेखनीय चित्रपट राज खोसला (Raj Khosla) दिग्दर्शित “प्रेम कहानी” (Prem Kahani). मुंबईत प्रदर्शित ७ मार्च १९७५. मेन थिएटर ड्रीमलॅन्ड. खोसला कम्बाईन प्रेझेंटस ही निर्मिती संस्था. चित्रपटाच्या प्रदर्शनास चक्क पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखिल, तरी त्यातील गीत संगीत आजही तारुण्यात आहे, तजेलदार आहे, लोकप्रिय आहे. रेडिओच्या काळापासून ओटीटीपर्यंत गाण्यांच्या प्रवासात यातील गाणी कितीदाही ऐकावीत, आठवावीत, गुणगुणावीत, पहावीत तोच गोडवा, तीच रंगत.
प्रेम कहानी मे एक लडका होता है एक लडकी होती है (पार्श्वगायक लता मंगेशकर व Kishore Kumar), दोनो किसी को नजर नही आये चल दरिया मे डूब जाऐ (Lata Mangeshkar व किशोर कुमार), फूल आहिस्ता फेंको फूल बडे नाजूक होते है (लता मंगेशकर व मुकेश), दोस्तो मे कोई बात चल जाती है (मोहम्मद रफी), क्या मेरी प्रेम कहानी (लता मंगेशकर)… यू ट्यूबवर ही गाणी आपण पुन्हा पहालच. (आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी जुन्या काळातील चित्रपट संगीताचा आनंद घेतेच.) एव्हाना या गाण्यांचा पडद्यावरचा रंग आपल्या डोळ्यासमोर आला असेलच.

राजेश खन्ना व मुमताज त्या काळातील छान जमलेली रुपेरी जोडी. नरेन्द्र बेदी दिग्दर्शित “बंधन” (१९६९), राज खोसला दिग्दर्शित “दो रास्ते” (१९६९) पासून ही जोडी चित्रपट रसिकांना आवडू लागली. दो रास्तेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली तेव्हा Mumtaz ने सहनायिका ते नायिका असा प्रवास केला होता, आपली मेहनत, रुपडं, आत्मविश्वास आणि अनुभवातून सुधारत गेलेला अभिनय असा हा प्रवास होता. Rajesh Khanna चा ही सुरुवातीचा काळ होता. “दो रास्ते” पडद्यावर येईपर्यंत शक्ती सामंता दिग्दर्शित “आराधना” ( १९६९) च्या यशाने राजेश खन्ना स्टार झाला. (शर्मिला टागोरसोबतचा हा चित्रपट “पुन्हा एकदा” अलिकडेच प्रदर्शित होताच पहिल्यासारखीच गर्दी.) (Prem Kahani)
“दो रास्ते” च्या यशानंतर राजेश खन्ना व मुमताज, मनमोहन देसाई दिग्दर्शित “सच्चा झूठा”(१९७०), जम्बो दिग्दर्शित “अपना देश” (१९७०), दुलाल गुहा दिग्दर्शित “दुश्मन” (१९७२), जे. ओम प्रकाश दिग्दर्शित “आप की कसम” (१९७४), मनमोहन देसाई दिग्दर्शित “रोटी” (१९७४) अशी छान जमत जमत “प्रेम कहानी” (Prem Kahani) पर्यंत आली. दोघांत मस्त केमिस्ट्री जमली होती. सचिन भौमिक दिग्दर्शित “राजा रानी”( १९७३), राजेश खन्ना व शर्मिला टागोर जोडी असताना मुमताज स्पेशल ॲपिरियन्स होती. के. बालचंदर दिग्दर्शित “आयना” (१९७७) राजेश खन्ना व मुमताज जोडीचा शेवटचा चित्रपट. (Bollywood mix masala)

“प्रेम कहानी”साठी (Prem Kahani) राज खोसला यांनी राजेश खन्ना व मौसमी चटर्जी अशी जोडी जमवली आणि त्यांच्यावर मुहूर्त दृश्यही चित्रीत केले. मौशमी चटर्जी कोलकात्यावरुन मुंबईत आली तेव्हा तिला शक्ती सामंता दिग्दर्शित “अनुराग” (१९७३), राज खोसला दिग्दर्शित “कच्चे धागे” (१९७१) अशा काही चित्रपटातून भूमिका मिळाल्या. त्यांच्या यशाने तिचा नायिका म्हणून मार्ग सुकर झाला. पण राजेश खन्नाला वाटले “प्रेम कहानी” मध्ये आपली लकी नि हुकमी नायिका मुमताजच हवी. आले सुपर स्टारच्या मना तेथे निर्माता व दिग्दर्शक तरी काय करणार? मुमताजला लग्न करुन संसारात रमायचे होते. याच कारणास्तव ती नवीन चित्रपट स्वीकारत नव्हती.
हरमेश मल्होत्रा दिग्दर्शित “लफंगे”, राजकुमार कोहली दिग्दर्शित “नागिन” या चित्रपटातील आपले शूटिंग पूर्ण करण्यास तिने प्राधान्य दिले. तरी K. Balachander दिग्दर्शित “आयना” रखडलाच. यात “प्रेम कहानी” (Prem Kahani) साठी तारखा देणार त्या कधी आणि कशा? आपला “हुकमी हिरो” राजेश खन्नाची विनवणी तिने मान्य केली व मौसमी चटर्जी या चित्रपटातून “आऊट” झाली. गाॅसिप्स मॅगझिन्सना ही एकदम हाॅट केक स्टोरी. जबरा ब्रेकिंग न्यूज. केवढं उलटसुलट लिहिलं गेले हो. त्यात भर पडली मौशमी चटर्जीने एका गाॅसिप्स मॅगझिनला दिलेल्या सडेतोड मुलाखतीची. राजेश खन्नाची नायिका बनण्याची संधी हुकते म्हणजे काय? तेदेखील आपल्यावर मुहूर्ताचे दृश्य होवूनदेखील. (कालांतराने सोशल मिडियात त्या मुहूर्ताचा फोटो पहायला मिळाला. चित्रपटसृष्टीतील अशा अनेक दुर्लक्षित गोष्टी सोशल मिडियात फोटोसह पाह्यला मिळताहेत.)
==============
हे देखील वाचा : Rajendra Kumar : दिग्दर्शकाच्या नावा शिवाय “लव्ह स्टोरी” सुपरहिट
==============
“प्रेम कहानी” (Prem Kahani) ची तबकडी प्रकाशित होताच गाणी ऐकता ऐकता लोकप्रिय झालीदेखील. बिनाका गीतमालामध्ये चल दरिया मे डूब जाऐ पहिल्या तीन गाण्यात पोहचलेही. दिग्दर्शक राज खोसला यांना संगीताचे उत्तम ज्ञान. त्यांच्या दिग्दर्शनातील मेरा साया, वह कौन थी इत्यादी चित्रपटातील गाणी आवर्जून पहावीत. आनंद बक्षी व Laxmikant–Pyarelal यांनी चित्रपट गीत संगीतात केवढी तरी मोलाची भर घातलेली. राजेश खन्नाच्या चित्रपटातील गाणी हा वेगळाच विषय. “प्रेम कहानी” त्यात मास्टरपीस.
हा चित्रपट प्रेम त्रिकोण. इंग्रजकालीन गोष्ट. एका छोट्या शहरात घडलेली. राजेश नारायण (राजेश खन्ना) व कामिनी सिन्हा (मुमताज) यांची “प्रेम कहानी” छान रंगात न्हाऊन निघत असतानाच राजेशचा मोठा भाऊ (त्रिलोक कपूर) स्वातंत्र्य लढ्यात मारला जातो म्हणून त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी राजेश स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होतो. एकदा पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झाला असता तो आपला पोलीस इन्स्पेक्टर मित्र धीरज कुमार (शशी कपूर) घरात लपतो. तेव्हा त्याला दिसते की आपली प्रेयसी कामिनी हिने आपल्याच मित्रासोबत लग्न केलेय… राही मासूम रझा आणि जयंत धर्माधिकारी यांची पटकथा व राही मासूम रझा यांचे संवाद.

चित्रपटात विनोद खन्नाने साकारलेली शेर खानची भूमिका सुरुवातीस फिरोझ खान साकारणार होता. पण राज खोसला दिग्दर्शित मेरा गाव मेरा देश, कच्चे धागे या चित्रपटात आपणास चांगली संधी मिळाली म्हणून याही चित्रपटात आपण असावे असे विनोद खन्नाला मनोमन वाटले आणि राज खोसला यांनी त्याची इच्छा पूर्ण करताना फिरोझ खानऐवजी त्याची निवड केली. विशेष भूमिकेत असे श्रेय त्याला दिले. यासह या चित्रपटात त्रिलोक कपूर, के. एन. सिंग, युनुस परवेझ, लीला मिश्रा, पूर्णिमा, मुराद यांच्या प्रमुख भूमिका.
==============
हे देखील वाचा : Bollywood movies : मोठे चित्रपट, मोठे यश… छोट्यानाही मिळू देत
==============
चित्रपटाचे छायाचित्रणकार काका ठाकूर व संकलन वामन भोसले यांचे. (काका ठाकूर कालांतराने दिग्दर्शक झाले आणि “धरम” या चित्रपटात विनोद खन्ना, वर्षा उसगावकर, शिल्पा शिरोडकर या कलाकारांची निवड करीत कोल्हापूरात एक चित्रीकरण सत्र पार पडलेही. दुर्दैवाने हा चित्रपट बंद पडला. बंद पडलेल्या चित्रपटांच्या कथा व्यथा अधिकच रंजक.)
“प्रेम कहानी”च्या (Prem Kahani) ड्रीमलॅन्ड चित्रपटगृहावरील आगाऊ तिकीट विक्रीला प्रचंड लांबलचक रांग लागली. पहिल्या तीन दिवसांची सर्व तिकीटे हाऊसफुल्ल. पण फर्स्ट शोपासूनच पब्लिक रिपोर्ट काहीसा नरमच आला आणि सोमवारपासून करंट बुकिंग खिडकी उघडली तरी गाण्याच्या लोकप्रियेवर चित्रपटाने शंभर दिवसाचा मुक्काम केला. तरी “प्रेम कहानी” फ्लाॅप चित्रपट म्हणून ओळखला जातोच पण राजेश खन्नाचा “पडता काळ” याच चित्रपटापासून सुरु होतो असे अधोरेखित होत गेले. अरेरे. राजेश खन्नाला आपली लकी नायिका मुमताज यावेळी फळली नाही. गाणी मात्र आजही लोकप्रिय… पन्नास वर्षांनंतरही ! प्रेम कहानीची गाणी तारुण्यात.