‘Mi Pathishi Ahe’ सांगणार नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी

Rajendra Kumar : दिग्दर्शकाच्या नावा शिवाय “लव्ह स्टोरी” सुपरहिट
चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम हे सर्वज्ञात आहे. दिग्दर्शक म्हणजे चित्रपट निर्मिती युनिटचा कर्णधार असेही म्हटले जाते. त्याचं व्हीजन म्हणजेच चित्रपट. असे असूनही एखादा चित्रपट त्याच्या नावाशिवाय पडद्यावर येतो आणि इतकेच नव्हे तर सुपरहिट देखील होतो असे घडलयं. चित्रपटाच्या जगात कधी, काय, कशाला, कुठे घडेल हे अजिबात सांगता येत नाही हेच खरे.
पहिल्यांदा हे कधी घडले माहितेय ?
राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) निर्मित डिंपल फिल्म बॅनरच्या “लव्ह स्टोरी” (Love Story) या चित्रपटाच्या वेळेस. मुंबईत हा चित्रपट २७ फेब्रुवारी १९८१ रोजी प्रदर्शित झाला. मुंबईत मेन थिएटर मेट्रोत त्याने रौप्य महोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीते आणि R. D. Burman चे तरुण संगीत आजही लोकप्रिय आहे. कैसा तेरा प्यार कैसा गुस्सा है तेरा, कितना हसीन है यह सपना, तेरी याद आ रही है, यह लडका जरा दीवाना लगता है या गाण्यांचा खास उल्लेख हवाच. कुमार गौरवचा हा पहिलाच चित्रपट. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी Kumar Gaurav साठी गाण्यात अमित कुमारचा आवाज वापरला हे जास्त योग्य ठरले.

राजेंद्र कुमारचा मुलगा कुमार गौरव म्हणून त्या काळात हा चित्रपट घोषणेपासूनच गाजला. राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) साठच्या दशकातील “ज्युबिलीकुमार” हेही एक खास वलय होतेच. “स्टार सन्स” ही त्या काळातील बहुचर्चित गोष्ट. एकामागोमाग एक स्टार सन्स चित्रपटसृष्टीत आले आणि मीडिया, चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांत एक प्रकारचा उत्साह होता. सुनील दत्त पुत्र Sanjay Dutt, धर्मेंद्र पुत्र Sunny Deol, नूतन पुत्र Mohnish Bahl, देव आनंद पुत्र Suneil Anand, राज कपूर पुत्र Rajiv Kapoor हे त्या सुमारास काही महिन्यांच्या अंतराने रुपेरी पडद्यावर आले… काही आजही लोकप्रिय आहेत.
“लव्ह स्टोरी” मध्ये कुमार गौरवची नायिका विजयता पंडित होती (ती सुलक्षणा पंडितची बहिण), चित्रपटात राजेंद्र कुमार, माला सिन्हा, डॅनी डेन्झोपा, अमजद खान इत्यादींच्याही भूमिका. पूर्वप्रसिध्दीचा अधिकाधिक फोकस कुमार गौरववर. एक नवीन रोमॅन्टीक नायक अशी त्याची प्रतिमा (इमेज) एस्टॅब्लिश केली जात होती. अशातच चित्रपट पूर्ण होत आला असतानाच या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल आणि निर्माता अभिनेता यांच्यात काही तात्विक वाद झाला. तो असा काही विकोपाला गेला की राहुल रवैल चित्रपटातून बाहेर पडला. खुद्द दिग्दर्शक असा बाजूला होतोय ही अतिशय धक्कादायक गोष्ट. तोपर्यंत असे निर्माता व दिग्दर्शक यांच्यात अधूनमधून वाद होत पण कोणी प्रदर्शनास सज्ज असलेल्या चित्रपटावरचा हक्क सोडत नसे. (Bollywood mix masala)

चित्रपटाच्या पोस्टरवर राजेंद्र कुमार सादर करीत आहे, “लव्ह स्टोरी” असे आले. चित्रपटाची गाणी रिदम हाऊसपासून इराणी हाॅटेलमधील जुक्स बाॅक्सपर्यंत सगळीकडेच लोकप्रिय. चित्रपट रसिकांसमोर येण्यास हे पूरक होते. या चित्रपटाच्या चित्रीकरण काळात कुमार गौरव व विजयता पंडित प्रेमाचा अभिनय करता करता खरोखरच प्रेमात पडल्याचेही गाॅसिप्स मॅगझिनमधून रंगवून रंगवून लिहिले गेले. लव्ह स्टोरीची पटकथा मिर्झा ब्रदर्स यांची होती. त्या काळातील तेही एक यशस्वी पटकथाकार. तर राघु कर्मकार हे छायाचित्रणकार तर संकलन डेव्हिड धवनचे. (कालांतराने डेव्हिड धवन यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखला गेला.) जुने चित्रपट असे संदर्भ पुढे आणतात. चित्रपटात अनेक प्रकारच्या अडथळ्यांवर मात करीत करीत रंगलेली टीनेजर प्रेमकथा.
मेट्रो चित्रपटगृहात “लव्ह स्टोरी” च्या भव्य दिमाखदार प्रीमियरला चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार (आज त्यांना सेलिब्रिटीज म्हणतात) आवर्जून उपस्थित. अहो काही झाले तरी राजेंद्र कुमारच्या पुत्राचा पहिलाच चित्रपट होता आणि मिडिया हाईप जबरदस्त होता. मुद्रित माध्यमाचे ते युग होते आणि त्यातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचत असे. (Bollywood tadka)

या सगळ्यात याच चित्रपटाचा दिग्दर्शक राहुल रवैल मात्र नव्हता. चित्रपट हा दिग्दर्शकाच्या शैलीने ओळखला जातो. दिग्दर्शकाच्या कर्तबगारीने त्याची ओळख व विश्वासार्हता ओळखली जात असते. ही एक दीर्घकालीन परंपरा. “लव्ह स्टोरी” डोक्यावर घेताना रसिक प्रेक्षकांनी असा कसलाच विचार केला नाही. चित्रपट अभ्यासक आणि विश्लेषक यांच्यासाठी खरं तर हा आश्चर्याचा धक्काच. एकदा का चित्रपट आवडला की प्रेक्षक त्याच चित्रपटाच्या बाबतीत पडद्यामागे काय काय घडले ते पाहतीलच असे नव्हे. (अभिनेता व अभिनेत्री यांच्यातील पडद्यामागची प्रेमकथा वर्षानुवर्ष चघळली जाते. कारण त्यात रंजकता असते.)
=============
हे देखील वाचा : shahenshah : पडद्यावर पोलीस, थिएटरवर बंदोबस्त
=============
दिग्दर्शकाच्या (Rajendra Kumar) नावाशिवाय चित्रपट प्रदर्शित होतो आणि त्या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे हे विचारात न घेताच तो चित्रपट लोकप्रिय ठरतो अशी ही अनोखी “लव्ह स्टोरी“! चित्रपट पाहण्याचे जणू व्यसन असणाऱ्यांना मात्र या सगळ्याच गोष्टी माहीत असतात. पण खुद्द निर्मात्यानेच दिग्दर्शकाच्या नावावर काट मारलीय म्हटल्यावर काय हो? चित्रपटाच्या जगात वाद कसेही असू शकतात, घडू शकतात आणि त्यातूनच नवीन गोष्टी जन्माला येत जातात. एक यशस्वी चित्रपट असाही. तरीदेखील “तेरी याद आ रही है”. तेच जास्त महत्वाचे म्हणायचे?