
Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!
हिंदी सिनेमातील ज्येष्ठ दिग्दर्शक, गीतकार, कथा पटकथाकार आणि संवाद लेखक गुलजार यांना धर्मेंद्र गेल्यानंतर त्यांच्यासोबत एकही फुलफ्लेज चित्रपट करता आला नाही याची खंत वाटत राहिली. कारण पहिल्याच चित्रपटापासून या दोघांची चांगली मैत्री झाली होती. पण धर्मेंद्र यांना घेऊन एक पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचं त्यांचं स्वप्न मात्र कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. खरं तर गुलजार सत्तरच्या दशकात धर्मेंद्र सोबत एका मेगा प्रोजेक्ट वर काम करत होते पण दुर्दैवाने हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. कोणता होता तो चित्रपट जो धर्मेंद्र यांना घेऊन गुलजार बनवणार होते आणि तो बनू शकला नाही? त्याची नेमकी कारणं काय होती? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. (Dharmendra Movies)
धर्मेंद्र यांचा रुपेरी पडद्यावर प्रवेश अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटापासून १९६० साली झाला. यानंतर त्यांचा महत्त्वपूर्ण चित्रपट होता बिमल रॉय यांचा ‘बंदिनी’(1963). या चित्रपटापासूनच गुलजार यांनी गीतलेखन सुरू केले होते. यातील ‘मोरा गोरा अंग लेले मोहे श्याम रंग दई दे’ हे गाणं गुलजार यांनी लिहिलेलं पहिलं गीत होतं. तसेच या चित्रपटासाठी ते बिमल रॉय यांना असिस्ट देखील करत होते. गुलजार आणि धर्मेंद्र दोघेही पंजाब प्रांतातून आल्यामुळे दोघांची मैत्री लवकर झाली. यानंतर ‘पूर्णिमा’ (1965) या चित्रपटातील गाणी गुलजार यांनी लिहिली होती. या चित्रपटात मीनाकुमारी आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

यातील ‘हमसफर मेरे हमसफर पंख तुम परवाज हम’ आणि ‘तुम्हे जिंदगी के उजाले मुबारक’ ही दोन गाणी जी धर्मेंद्रवर चित्रित झाली होती गुलजार यांनी लिहिलेली होती. अशा पद्धतीने पहिल्यांदा गुलजार आणि धर्मेंद्र यांचा रुपेरी पडद्यावरील असोसिएशन सुरू झाले. यानंतर १९६९ साली असित सेन दिग्दर्शित ‘खामोशी’ या चित्रपटाची कथा पटकथा गुलजार यांची होती. या चित्रपटातील गाणी देखील गुलजार यांनी लिहिली होती. ‘तुम पुकारलो तुम्हारा इंतजार है..’ हेमंत कुमार यांनी गायलेले गाणं या चित्रपटात धर्मेंद्रवर चित्रित झालं होतं. यानंतर १९७० साली ऋषिकेश मुखर्जी यांनी गुलजार यांना एक कथा डेव्हलप करायला सांगितली ज्यात एक टिन एज मधील मुलगी हिंदी सिनेमातील सुपरस्टार दिलीपकुमारची फॅन असते.
गुलजार यांनी ही कथा डेव्हलप केली त्यानी ऋषिकेश मुखर्जी यांना सांगितले की आपल्याला या काळाशी सुसंगत असा नायक निवडायला हवा. त्या काळात सुपरस्टार असलेले दोनच नायक होते एक राजेश खन्ना आणि दुसरा धर्मेंद्र. राजेश खन्ना नव्याने सुपरस्टार झाले होते आणि त्यांच्याकडे डेट्स देखील नव्हत्या. त्यामुळे ही भूमिका धर्मेंद्रकडे आली. ऋषिकेश मुखर्जी यांची ‘गुड्डी’ हा चित्रपट गुलजार यांनी दिग्दर्शित करावा अशी इच्छा होती. परंतु गुलजार त्यावेळी त्यांच्या ‘मेरे अपने’ या चित्रपटात बिझी असल्यामुळे हा सिनेमा ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटाची पटकथा संवाद आणि गाणी गुलजार यांनी लिहिली होती.

यानंतर १९७५ साली ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘चुपके चुपके’ हा चित्रपटाल आला. या सिनेमात धर्मेंद्र, अमिताभ, शर्मिला आणि जया भादुरी यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद गुलजार यांचे होते. धर्मेंद्र सोबत काम करण्याची गुलजार यांची इच्छा दिवसेंदिवस पुढे जात होते. १९७८ साली गुलजार एक चित्रपट बनवत होते ‘किनारा’. यात जितेंद्र आणि हेमामालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यातील एका छोट्या भूमिकेसाठी त्यांना एक कलावंत हवा होता. हेमा मालिनीचा प्रियकर ही ती व्यक्तिरेखा होती. ही छोटी भूमिका कोणाला द्यावी या विचारात असताना हेमाने ही भूमिका धर्मेंद्रला द्या असे सांगितले. धर्मेंद्र यांनी देखील आनंदाने ही भूमिका स्वीकारली. परंतु धर्मेंद्र आणि गुलजार यांचे समाधान झाले नाही कारण भूमिका खूपच छोटी होती. धर्मेंद्र यांनी त्यांना प्रमुख भूमिकेत घेण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केली.
================================
हे देखील वाचा : Amitabh Bachchan यांच्या जंजीर चित्रपटाशी असलेलं धर्मेंद्रचं कनेक्शन!
================================
त्यानंतर गुलजार यांनी एका मेगा प्रोजेक्टवर काम सुरू केले हा सिनेमा होता शरद बाबूंच्या कादंबरी वरील ‘देवदास’. यात देवदास च्या भूमिकेत धर्मेंद्र, पारो च्या भूमिकेमध्ये शर्मिला टागोर आणि चंद्रमुखीच्या भूमिकेत हेमामालिनी असणार होते. सर्वकाही व्यवस्थित चालू होते. या सिनेमासाठी एक गाणं देखील रेकॉर्ड झाले होते. परंतु नंतर पैशाची अडचण निर्माण झाली आणि हा चित्रपट अधुराच राहिला. यानंतर धर्मेंद्र ॲक्शन सिनेमाकडे वळाल्यामुळे गुलजार यांना धर्मेंद्रला घेऊन चित्रपट काढण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. परंतु ज्या ज्या वेळेला हे दोघे भेटत होते त्या त्या वेळेला आपण एखादा चित्रपट करू याची आठवण एक दुसऱ्यांना करून देत होते. पण तो योग मात्र अखेरपर्यंत आलाच नाही!