‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ऋषीकपूर – डिम्पल चा बॉबी ४७ वर्षाचा झाला.
राजकपूर दिग्दर्शित ‘बॉबी’ हा चित्रपट आज २८ सप्टेंबर २०२० ला ४७ वर्षे पूर्ण करीत आहे. आर के च्या चित्रपटांच्या यादीत ‘बॉबी’ ला खूप महत्वाचे स्थान आहे. आर के चा कोसळता डोलारा सांभाळण्याचे महत्वाचे काम या चित्रपटाने केले.
या सिनेमाच्या मेकिंग खूपच इंटरेस्टिंग आहे. १८ डिसेंबर १९७० ला राज कपूरचा महत्वकांक्षी ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट झळकला आणि फर्स्ट रन ला सुपर फ्लॉप झाला. राज करीता हा मोठा धक्का होता. जोकर त्याने अगदी मनापासून बनवला होता. याच चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात रणधीर कपूर याने त्याच्या दिग्दर्शनात ‘कल आज और कल’ हा सिनेमा बनवायला सुरुवात केली होती. यात कपूर खानदानाच्या तीन पिढ्या एकत्र काम करीत होत्या. हा सिनेमा बरोबर एक वर्षांनी म्हणजे १७ डिसेंबर १९७१ रोजी प्रदर्शित झाला. त्याला देखील तसे माफकच यश मिळाले. संगीतकार जयकिशन यांचे १२ सप्टेंबर १९७१ ला निधन झाले. २९ मे१९७२ मध्ये पृथ्वीराज कपूर यांचे निधन झाले. राजकपूर साठी हे सर्व धक्क्यामागून धक्के होते. एक मोठे बॅनर अपयशाच्या गर्तेत सापडले होते. राज ला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले होते पण स्वाभिमानी राज ला आपले कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करायचे होते. वीस वर्षे प्रेक्षकांची पसंत अचूक ओळखणाऱ्या राज ने ‘जोकर’ चे अपयश खूपच पर्सनली घेतले होते.
या धक्क्यातून सावरत असतानाच राज कपूर यांनी युवा पिढीला आवडेल असे कथानक घेऊन चित्रपट तयार करायचे ठरवले. ख्वाजा अहमद अब्बास यांनी राजला कथानक ऐकवले. के ए अब्बास आणि वसंत साठे यांनी स्क्रीन प्ले लिहिला. जैनेन्द्र जैन यांनी संवाद लिहिले. ‘शो मस्त गो ऑन’ हे राज कपूर चे ब्रीद वाक्य होते. १९७१ सालच्या विजयादशमीला त्याने या चित्रपटाचा मुहूर्त केला. चित्रपटाचे नाव ठरले ‘बॉबी’! मुहूर्त नवोदित नायिका डिम्पल कपाडिया वर केला त्यावेळी ती अवघ्या १४ वर्षाची होती. गंमत म्हणजे तोवर या चित्रपटाचा नायक ठरला नव्हता. या चित्रपटापासून आर के च्या नेहमीच्या टीम मधील संगीतकार/गीतकार/गायक कुणीही नव्हते. गीतकार आनंद बक्षी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा आर के टीम मध्ये समावेश झाला. दोन कोवळ्या जीवांची प्रेम कथा रंगवताना राजकपूर यांनी अमीर–गरीब हा संघर्षाचा फार्म्युला निवडला. यथावकाश या चित्रपटाचा नायक म्हणून ऋषी कपूर यांची निवड झाली. नायकाच्या पार्श्वगायनासाठी शैलेंद्र सिंग यांची निवड झाली. नरेंद्र चंचल, विठ्ठल भाई पटेल, इंद्रजीत तुलसी हे पहिल्यांदाच हिंदी सिनेमात आले.
प्राण, प्रेमनाथ, दुर्गा खोटे या बुजुर्ग कलावंताना सोबत घेवून राजने ऋषीकपूर- डिम्पल ला घेवून हा पहिला सुपर हिट ‘टीन एज लव्ह स्टोरी’ सिनेमा बनवला. यात सोनिया सहानी, फरीदा जलाल, अरुणा इराणी यांच्या ही भूमिका होत्या. ऋषीकपूर ने ‘जोकर’ मध्ये या पूर्वी भूमिका केली होती. डिम्पल ला ‘संघर्ष’ आणि ‘गुड्डी’ या सिनेमात काम करण्याची संधी आली होती खरी पण ती काही वर्क आउट झाली नाही. तरुणाईला आवडणाऱ्या प्रसंगाची यात रेलचेल होती. विशेषतः लायब्ररीत तिच्या डोळ्यावर आरसा चमकवणे, बाईक वरून पळून जाताना डिम्पलने ऋषीच्या कानाचा चावा घेणे! प्रेमनाथ याची भूमिका त्याचे अटायर आणि सतत ‘म्युन्सिपाल्टी’ म्हणणे लोकप्रिय झाले. सिनेमात आठ सुपर हिट गाणी होती. लताचा स्वर सोडला तर आर के चा हा सिनेमा म्हणजे नवे पॅकेज होते. ’मै शायर तो नही’, ’मुझे कुछ कहना है’, ’ना मांगू सोना चांदी’, ‘झूठ बोले कौवा काटे’,’ हम तुम एक कमरे में बंद हो’,’ए ए फसा’, ’बेशक मंदीर मस्जिद तोडो’ आणि ‘आन्खियो को रहने दे अन्खियो के आस पास ‘या गाण्यांनी पब्लिक दिवाने झाले. डिम्पल ची लाल बिकिनी मधील गौरांग काया बघायला लोक थिएटर वर गर्दी करू लागले. तिच्या बॉबी डिझाईन पोलक्याची मोठी लाट आली होती. गुलमर्ग ला जिथे सिनेमाचे शूटिंग झाले तो पिकनिक स्पॉट बनला.
राज ने सिनेमा हिट होईल याची पुरेपूर काळजी घेतली होती. सिनेमाचे कथानक नेहमीच्या पठडीतले असले तरी त्याची मांडणी सर्वथा नवीन होती. युथफुल लव्ह स्टोरी ने देशभर एकच धमाल उडवून दिली. ‘प्रेम नाम है मेरा प्रेम चोप्रा’ म्हणत शेवटच्या काही रीळात एन्ट्री घेतलेला प्रेमचोप्रा छाप पाडून गेला.सिनेमाचे शूटिंग मुंबई, काश्मीर, गोवा आणि पुण्या जवळच्या लोणी काळभोर इथल्या राज बागेत झाले.यातला प्रणय धाडसी होता. बॉबी मधील बोल्ड दृश्यांनी पब्लिक मध्ये मोठी हलचल निर्माण झाली. ‘फ्रेश चेहरे, तरुणाईचे संगीत, कलावंतांचा उत्कृष्ट अभिनय आणि राज मधला मुरब्बी दिग्दर्शक याने सिनेमाला प्रचंड यश मिळाले.
या सिनेमाने प्रचंड बिझिनेस केला. तब्बल ११ कोटींचा व्यवसाय देशभरात केला. तसेच रशियात तो राज च्याच ‘आवारा’ नंतरचा सुपर हिट सिनेमा ठरला. द आशियातील सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया तील प्रेक्षकांनी ‘बॉबी’ ला गर्दी केली. फिल्मफेयर चे ११ नामांकने मिळाली त्यातील ५ पुरस्कार मिळाले. ऋषी कपूर याने मात्र त्याच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात एक कटू आठवण दिली आहे. त्याच्या मते या सिनेमासाठी त्याला मिळालेला फिल्म फेयर पुरस्कार चक्क त्याने ३० हजार रुपये देवून विकत घेतला होता. या पुरस्कारा साठी त्याच्या स्पर्धेत अमिताभ (जंजीर), धर्मेंद्र (यादों की बारात), संजीव कुमार (कोशिश) आणि राजेश खन्ना (दाग) हे दमदार कलावंत होते. या सिनेमाच्या शुटींगच्या दरम्यान २७ मार्च १९७३ रोजी डिम्पलने राजेश खन्ना सोबत लग्न केले. अर्थात याचा चित्रपटाच्या यशावर परिणाम झाला नाही. ‘बॉबी’ नंतर मात्र डिंपल ने चित्रपट सन्यास घेतला. पुढे १९८३ पासून ती राजेश पासून वेगळी राहू लागली आणि पुन्हा रुपेरी पडद्यावर आली तेंव्हा पुन्हा तिचा नायक ऋषी कपूर च होता ‘सागर’ मध्ये!
आज ‘बॉबी’ च्या निमित्ताने सारा इतिहास डोळ्या पुढे आला.