Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

राजेंद्र कुमारला ऑफर झालेला ‘हा’ सिनेमा Shammi Kapoor यांनी कसा पटकावला?
शम्मी कपूर यांचा सुपरहिट सिनेमा ‘ब्रह्मचारी’ २६ एप्रिल १९६८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन भप्पी सोनी यांनी केले होते. निर्मिती जी पी सिप्पी यांची होती. सिनेमा बिग बजेट होता. स्टोरी लाईन चांगली होती. म्युझिकली रिच होता. पण जेव्हा दिग्दर्शक भप्पी सोनी यांनी शम्मी कपूर यांना या सिनेमाची स्टोरी ऐकवली तेव्हा त्यांना स्टोरी तर आवडली, पण चित्रपट करावा की नाही याबद्दल त्यांच्या मनात थोडी शंका होती. एक तर त्यावेळेला शम्मी कपूर थोडेसे वैयक्तिक दुःखात होते. कारण गीता बाली या त्यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे ते पुरते खचले होते.

विजय आनंद तथा गोल्डी यांच्या ‘तिसरी मंजिल’ चे शूटिंग चालू होते. याच काळामध्ये त्यांच्याकडे ‘ब्रह्मचारी’ चे स्क्रिप्ट आले होते. त्यांनी “विचार करून सांगतो.” असे भप्पी सोनी यांना सांगितले. बरेच दिवस शम्मी यांच्याकडून काहीच निरोप न आल्यामुळे आणि त्यांचा कदाचित नकार असावा असे समजून दिग्दर्शक भप्पी सोनी या सिनेमाची ऑफर घेऊन ज्युबिली कुमार राजेंद्र कुमार यांच्याकडे गेले. राजेंद्र कुमार यांना ही स्टोरी प्रचंड आवडली आणि त्याने या सिनेमात काम करण्याला होकार दिला. भप्पी सोनी खूश झाले. त्यांनी राजेद्र यांना सायनिंग अमाउंट देखील देऊन टाकली. मग हा चित्रपट पुन्हा शम्मी कपूर यांच्याकडे कसा आला? ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे.

काही दिवसांनी एका पार्टीमध्ये शम्मी कपूर यांची भेट राजेंद्रकुमार यांच्याशी झाली. त्यावेळेला राजेंद्रकुमार यांनी ,”तू रिजेक्ट केलेला ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट आता मला ऑफर झाला आहे!”, असे सांगितले. त्यावेळेला शम्मी कपूर यांना खूप आश्चर्य वाटले. कारण त्यांनी हा चित्रपट करायला नकार दिला नव्हता फक्त ते विचार करून सांगतो असं म्हणाले होते. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले ते दुसऱ्या दिवशी तडक भप्पी सोनी यांच्याकडे गेले आणि म्हणाले,” तुम्ही मला न विचारता परस्पर हा सिनेमा राजेंद्रकुमार यांना कसा काय दिला? मी तुम्हाला नकार कधी दिला होता?”, असं विचारलं. त्यावेळी ते म्हणाले की “ तुम्ही विचार करण्यासाठी खूप वेळ घेत होता आणि माझ्याकडे थोडा वेळ होता . निर्मात्याचा माझ्यामागे सारखा तगादा चालू होता त्यामुळे मी राजेंद्रकुमारला विचारले त्यानी ऑफर स्वीकारली आणि त्यांना सायनिंग अमाऊंट देखील देऊन टाकली आहे!”.
================================
हे देखील वाचा : अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!
=================================
तरी शम्मी कपूर भप्पी सोनी यांनाआग्रह करत राहिले,” हे बरोबर नाही. या सिनेमाचा मीच हिरो असेल. हा सिनेमा त्यांच्याकडून काढून घ्या”. त्यावर भप्पी म्हणाले,” हे अनैतिक आहे. तुम्हाला मी पुरेसा वेळ दिला होता. तुम्ही त्या काळात मला होकार दिला नाही.” त्यावर शम्मी कपूर काही न बोलता निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी तो थेट राजेंद्रकुमार यांना भेटला. “हा चित्रपट मला करायचा आहे. तू हा सिनेमा सोड हा आग्रह करू लागला.” त्यावर राजेंद्रकुमार थोडेसे नाराज झाले. पण शम्मी कपूरने या सिनेमाबद्दल मी किती इंव्होल्व आहे हे सांगितले आणि काही करून हा सिनेमा मला द्या असे सांगितले. अगदी इमोशनल कार्ड खेळत मी तुमच्या धाकट्या भावासारखा आहे हा सिनेमा मला तुम्ही द्या असे सांगितले. भरपूर रिक्वेस्ट नंतर राजेंद्र कुमार यांनी हा सिनेमा सोडला आणि अशा पकारे या सिनेमांमध्ये शम्मी कपूर यांची एन्ट्री झाली. .

या सिनेमाची नायिका राजश्री होती पण तिच्यापेक्षा या सिनेमातील सहनायिका मुमताजच जास्त चमकली. खरंतर मुमताजने राजश्री पेक्षा जास्त सिनेमा केले होते. पण राजश्री हिट सिनेमांची संख्या जास्त असल्यामुळे तिला या सिनेमात नायिकेची भूमिका मिळाली. राजश्रीचा हा अखेरच्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता. कारण या सिनेमानंतर तिने एक वर्षातच एका अमेरिकन नागरिकाशी लग्न करून ती तिकडेच सेटल झाली. ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट म्युझिकल हिट होता. हसरत जयपुरी, शैलेंद्र आणि राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेल्या गाण्यांना शंकर जयकिशन यांनी जबरदस्त संगीत दिले होते.
यातील सर्वात गाजलेले ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर..’ हे गाणं खरंतर देव आनंद-आशा पारेख यांच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांनी लिहिलं होतं. पण या गाण्याचे बोल देव आनंदला न आवडल्यामुळे ते गाणं तसंच राहिलं. एकदा संगीतकार जयकिशन ने या गाण्याबाबत शम्मी कपूरला सांगितले. शम्मीला ते गाणं खूप आवडले. त्याने ते गाणं आपल्या ‘ब्लफ मास्टर’ सिनेमांमध्ये घ्यायचं ठरवलं पण सिनेमाचं बजेट कमी असल्यामुळे तो बेत रद्द झाला. नंतर हे गाणं असच पडून राहिलं आणि तब्बल सहा सात वर्षांनंतर ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात हे गाणं घेण्यात आले. त्यावेळी त्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं.

या गाण्यात रफी सोबत सुमन कल्याणपूर यांचा स्वर आहे.या सिनेमातील सर्वच गाणी जबरदस्त बनली होती. या चित्रपटात एकूण सहा गाणी होती. त्यापैकी फक्त ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे‘ हे युगल गीत होतं. उरलेली पाच गाणी मोहम्मद रफी यांनी गायलेली सोलो गाणी होती. या चित्रपटात नायिकेवर एकही सोलो गाणे चित्रित नव्हतं. रफीने गायलेली भन्नाट गाणी होती. ‘दिल के झरोखे में तुझको बिठाकर’ (राग शिवरंजनी), ‘मै गाऊ तुम सो जाओ’, ‘चक्के मे चक्का चक्के मे गाडी गाडी पे निकली अपनी सवारी’, ‘तू बेमिसाल है’, आणि ‘मोहब्बत के खुदा हम है’…
लहान अनाथ मुलांना घेऊन हा चित्रपट तयार झाला सुपर डुपर हिट झाला. हीच थीम घेऊन पुढे वीस वर्षानी ‘मिस्टर इंडिया’ देखील बनला. फक्त या चित्रपटांमध्ये गायब होण्याचा अँगल होता. हा जर अँगल काढला तर ‘ब्रह्मचारी’ आणि ‘मिस्टर इंडिया’ दोन्ही सिनेमे सारखेच वाटले असते. अवघ्या चाळीस-पंचेचाळीस लाखात बनलेल्या ‘ब्रह्मचारी’ने त्या काळात तब्बल दीड कोटी रुपयांचा बिजनेस केला होता. या चित्रपटाला फिल्मफेअरचे नऊ नामांकन मिळाली होती आणि त्यापैकी सहा पुरस्कार मिळाले या पैकी महत्त्वाचा पुरस्कार जो शम्मी कपूर यांना मिळाला होता आणि त्यांना मिळालेला त एकमेव सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार त्यांनी दिलीप कुमार यांच्या ‘संघर्ष’ आणि ‘आदमी’ या दोन चित्रपटातील पुरस्काराला टक्कर देत मिळवला होता. हा पुरस्कार आणि हा सिनेमा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
================================
हे देखील वाचा : खय्याम यांचा ‘शागीर्द’ बनून रफी यांनी घेतले संगीताचे धडे!
=================================
या चित्रपटाला मिळालेले इतर पुरस्कार होते . सर्वोत्कृष्ट चित्रपट (जी पी सिप्पी), सर्वोत्कृष्ट गीतकार (शैलेंद्र- मै गाऊ तुम सो जाओ), सर्वोत्कृष्ट संगीतकार (शंकर जयकिशन) सर्वोत्कृष्ट गायक (रफी- दिल के झरोखे में तुझको बिठाकर), सर्वोत्कृष्ट कथा (सचिन भौमिक) एकूणच काय राजेंद्रकुमारला ऑफर केलेला सिनेमा शम्मी कपूर यांनी मिळवला आणि आपल्या सुपरहिट आणि एकमेव फिल्मफेअर अॅवॉर्डसाठी हा चित्रपट त्यांच्या कायम लक्षात राहिला.