हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

‘आवाज दे के हमे तुम बुलाओ…..’ हे गाणे Shammi Kapoor यांना आधी का आवडले नव्हते?
शम्मी कपूर आपल्या चित्रपटातील गाण्यांच्या बाबत खूप दक्ष असायचा. आपल्यावर चित्रित होणारं गाणं अगदी परफेक्ट असावं याबाबत त्याचा मोठा आग्रह असायचा. एकदा एका गाण्याच्या रेकॉर्डिंगला तो दुसरीकडे व्यस्त असल्यामुळे उपस्थित राहू शकला नाही. नंतर हे गाणं त्याने जेव्हा ऐकलं त्यावेळेला त्याला अजिबात आवडलं नाही. त्याने संगीतकार आणि दिग्दर्शकाला तसेच स्पष्ट सांगितले पण नंतर राज कपूर यांनी मध्यस्थी करून तो वाद मिटवला. पण गमंत म्हणजे हे गाणं जेव्हा रिलीज झालं तेव्हा अक्षरशः सुपर हिट झालं.

शम्मी कपूरने देखील या गाण्यात संगीतकाराने केलेला प्रयोग मान्य केला. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता तो नेमका किस्सा? ११ मे १९६२ रोजी शम्मी कपूर,कल्पना आणि ललिता पवार यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता ‘प्रोफेसर’. या चित्रपटाचे निर्माते होते एफ सी मेहरा आणि दिग्दर्शक होते लेख टंडन. दिग्दर्शनातील हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. लेख टंडन यापूर्वी राज कपूर यांचे सहाय्यक म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केले होते. ‘प्रोफेसर’ या चित्रपटाची नायिका कल्पना हिचा देखील हा पहिला चित्रपट होता. चित्रपट इस्टमनकलर मध्ये असल्यामुळे काश्मीरच्या नयनरम्य परिसरात याचे शूट झाले. चित्रपट रोमँटिक होता त्यामुळे यातली गाणी जबरदस्त हिट झाली.
या चित्रपटात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचे एक युगलगीत आहे. हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं हे गाणं शंकर जयकिशन यांनी त्यांच्या आवडत्या शिवरंजनी या रागात बांधलं होतं. गीताचे बोल होते ‘आवाज देखे हमे तुम बुलाओ मोहब्बत में इतना हमको सताओ….’ गाणं अतिशय भावपूर्ण झालं होतं. या गाण्याचे एक वैशिष्ट्य होतं गाण्याची सुरुवात लता मंगेशकर यांच्या स्वराने होते आणि अंतरा देखील तिच्याच स्वराने होतो (अभी तो मेरी जिंदगी है परेशा…) त्यानंतर दुसऱ्या कडव्याच्या वेळी रफीचा स्वर येतो! या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला नेमका शम्मी कपूर दुसऱ्या एका चित्रपटाचा शूट मध्ये बिझी असल्यामुळे तो उपस्थित राहू शकला नाही.

दुसऱ्या दिवशी जेव्हा तो स्टुडिओमध्ये गेला आणि त्याने गाणं ऐकूलं तेव्हा तो दिग्दर्शक लेख टंडन यांना म्हणाला,” या गाण्यात मी कुठे आहे? मी या गाण्यात इतका उशिरा कां येतो? हे तुम्ही काय केलं? हे तर युगलगीत आहे. मी पहिल्यापासून या गाण्यात पाहिजे!” त्या वेळेला लेख टंडन म्हणाले,” सिनेमातील सिच्युएशन अशी आहे की, नायिका तुमच्या शोधात हे गाणं गाते आणि नंतर तुम्ही तिला भेटता. दोघांची मन जुळलेली आहेत. पण हा दुरावा या गाण्यातून एकत्र आणतो.” संगीतकार शंकर जय किशन यांचे देखील हेच मत होते. पण अभिनेता शम्मी कपूरला ते काही पटत नव्हते. तो म्हणाला,” हे बरोबर नाही. हे गाणं पुन्हा तुम्ही रेकॉर्ड करा आणि पहिल्यापासून माझा स्वर ठेवा!“.
मोठा पेच निर्माण झाला. काय करायचे? लेट टंडन यांनी एक आयडिया केली. या चित्रपटाची काही संबंधित नसलेल्या राज कपूर यांच्याकडे हे प्रकरण त्यांनी नेलं आणि न्याय निवाडा करायला सांगितले. राज कपूर यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. गाणे ऐकले आणि त्यांनी शम्मी कपूर ला सांगितले,” संगीतकार आणि दिग्दर्शकांनी केलेला विचार अगदी योग्य आहे. हे गाणं असंच पाहिजे आणि असंच राहिलं पाहिजे!” जेव्हा मोठा भाऊ आणि महान दिग्दर्शक राजकपूर सांगतो त्यावेळेला शम्मी कपूरला माघार घ्यावी लागली. पण मनातून त्याला काही पटले नाही. सिनेमाचे शूट पूर्ण झाले. शम्मीला या गाण्याची महती पटली या सिनेमाच्या प्रीमियरच्या वेळी.

या चित्रपटाचा भव्य दिव्य प्रीमियम मुंबईच्या आलिशान थिएटरमध्ये झाला. आख्ख बॉलीवूड या सिनेमाला लोटलं होतं. संगीतकार आर डी बर्मन, अभिनेता देव आनंद, हास्य अभिनेता मेहमूद सर्वजण आले होते. चित्रपटाचा प्रीमियर सुरू झाला. शम्मी कपूर सर्वांच्या प्रतिक्रिया पाहत होता. चित्रपटात हे गाणं जेव्हा आलं तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. लताचा मुखडा अंतरा झाल्यानंतर रफीचा धुंद स्वर ऐकू येतो ‘ मै सांसो की हर तार पे छूप रहा हु मै धडकन की हर राग मे बस रहा हूं जरा दिल की जानिब निगाहे झुकाओ….’ रफीचा धुंद स्वर आधी ऐकू येतो आणि शम्मीचे दर्शन होते.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
सगळं थेटर आपल्या जागेवर उभं राहिलं आणि टाळ्यांच्या गजरात त्यांनी या गाण्याचे स्वागत केले. त्यांना गाण्यातील हा बदल प्रचंड आवडला होता. लता आणि रफी यांनी खूप सुंदर रित्या हे गाणं गायलं होतं. शम्मी कपूरचा किलिंग लुक सगळ्यांना प्रचंड आवडला होता. शम्मी कपूर डोळे भरून हा सर्व प्रसंग पाहत होता. संगीतकाराने किती विचार करून हे गाणं बनवलं याची त्याला खात्री पटली आणि त्याने सर्वांच्या आभार मानले. ‘प्रोफेसर’ हा चित्रपट म्युझिकली हिट ठरला. यातील प्रत्येक गाणं ऐ गुलबदन, मै चली मै चली , खुली पलक में झूठा गुस्सा….त्या काळात प्रचंड गाजली होती. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संगीताचा फिल्मफेअर चा पुरस्कार संगीतकार शंकर जयकिशन यांना मिळाला होता. पुढे ‘यादों की बारात’(१९७३) या चित्रपटात देखील ‘चुरा लिया है तुमने जो दील को…’ या गाण्यात रफीचा स्वर असाच उशिरा दुसऱ्या कडव्यापासून ऐकू येतो!