जेव्हा हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेअर आणि शिल्पा शेट्टीची ‘किसिंग स्टोरी’ कोर्टात पोचली!
काही कलावंत आणि वाद यांचं घनिष्ट नातं जुळलेलं असतं. ते दोघे एकमेकांची पाठ कधीच सोडत नाहीत. एक खरे आहे की, रुपेरी पडद्यावरील कलावंताना नेहमीच चर्चेत रहायला आवडत असते; त्यामुळे चर्चा कशीही असो म्हणजे सकारात्मक असो की नकारात्मक ती नेहमी फायद्याची असते, असा त्यांचा होरा असतो.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते. अलीकडे तिचे पती राज कुंद्रा आणि तिच्या मागे लागलेलं ‘शुक्लकाष्ट’ सर्वश्रुत आहे. पण यापूर्वी देखील एका प्रकरणात ती चांगली अडकली होती. या प्रकरणात तिच्यावर चक्क कोर्टात केस दाखल झाली. तब्बल १५ वर्षे ही केस कोर्टात चालली त्यानंतर तिला त्यातून थोडासा दिलासा मिळाला. पण हेच प्रकरण अजूनही काही न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहेच. काय होते हे प्रकरण? (Shilpa – Richard Gere Kissing Case)
हा किस्सा आहे २००७ सालचा. त्या वेळी ‘एड्स अवेअरनेस प्रोग्रॅम’ साठी शिल्पा शेट्टी काम करत होती. एका एनजीओ सोबत काम करत असताना या कार्यक्रमात हॉलिवूडचे अभिनेते रिचर्ड गेअर (प्रेटी वुमन फेम) यांना आमंत्रित केले होते. दिल्लीच्या संजय गांधी स्टेडियम मध्ये १५ एप्रिल २००७ रोजी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला देशभरातील अनेक ट्रक ड्रायव्हर उपस्थित होते. ट्रक ड्रायव्हर आयुष्यभर भटकंती करत असतात आणि त्यांच्या मार्फतच एड्सचा प्रसार जास्त होण्याची शक्यता असते, असा एका समितीचा रिपोर्ट होता. त्यामुळे ट्रक ड्रायव्हर्सना एड्सबद्दल योग्य अवेअरनेस आणि मार्गदर्शन करावे, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पण या कार्यक्रमात कुणाच्या ध्यानी मनी येणार नाही, असला भलताच प्रकार घडला.
व्यासपीठावर जेव्हा शिल्पा शेट्टीने रिचर्ड गेअर यांचे स्वागत केले त्यावेळी रिचर्ड यांनी शिल्पाला मिठी मारली व स्वत:कडे ओढून घेतले. व्यासपीठावर प्रेक्षकांकडे पाठ करून रिचर्ड यांनी तिच्या हाताचे, मानेचे, गळ्याचे, गालाचे चुंबन घेतले व ते चुंबन घ्यायचे काही थांबले नाहीत. त्यांची मुजोरी वाढतच गेली. त्यांनी शिल्पाला पूर्णपणे वाकवले आणि तिच्या ओठाचा किस घ्यायचा प्रयत्न केला. शिल्पाने हसत हसत त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. पण हा गडी काही थांबायला तयार नव्हता. शेवटी एका टेबलचा सहारा घेऊन शिल्पा त्यांच्यापासून दूर झाली. तोवर गोऱ्या साहेबांना देखील भान आले होते. (Shilpa – Richard Gere Kissing Case)
शिल्पाने त्यांना कानात सांगितले असावे की, ही अमेरिका नाही, भारत देश आहे. इथली संस्कृती वेगळी आहे. त्यानंतर रिचर्ड साहेबांनी गुडघ्यावर पाय टेकवून स्त्रीचा सन्मान करावा अशी शिल्पाला मानवंदना दिली. पण जो प्रकार घडून जायचा होता तो झाला आणि हा प्रकार संपूर्ण देशाने लाईव्ह बघितला. सर्व ट्रक ड्रायव्हर्स अवाक होवून सर्व प्रकार पाहत राहिले. कार्यक्रम संपला. दुसऱ्या दिवशी रिचर्ड साहेब अमेरिकेला निघून गेले. पण देशभर शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेअर यांच्या विरुध्द संतापाची लाट उसळली. याचे सर्व व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
भारतीय स्त्रीचा अपमान, भारतीय संस्कृतीचा अपमान अशा निषेधाच्या स्वरांनी सांस्कृतिक वातावरण पुरते ढवळून निघाले. संस्कृतिरक्षक संघटना आणि काही राजकीय पक्षांनी शिल्पा आणि रिचर्ड गेअर यांच्याविरुद्ध निदर्शने सुरू केली. शिल्पाने त्यांना का थांबवले नाही, अशी तक्रार तिच्याविरुद्ध होऊन ती देखील या प्रकाराला सामील होती का? असा देखील सवाल विचारला जाऊ लागला.
राजस्थान मध्ये सुरुवातीला या दोघांच्या विरुद्ध कोर्टात केस दाखल करण्यात आली. भारतीय पीनल कोड सेक्शन २९२, २९३, २९४ आणि १२० बी नुसार कोर्टात केसेस दाखल करण्यात आल्या. भर सभेत लोकांच्या समोर चुंबन घेणे, अश्लील वातावरण तयार करणे अशा काही कलमानी त्यांच्यावर केस दाखल झाली. (Shilpa – Richard Gere Kissing Case)
देशभर अनेक न्यायालयात दोघांच्या विरुध्द केस दाखल झाल्या होत्या. रिचर्ड गेअर साहेब अमेरिकेत पोहोचले होते. त्यांनी तिकडून खुलासा केला “ माझा उद्देश कुणाचाही अपमान करण्याचा नव्हता. चुंबनातून एडसचा प्रसार होत नाही, हेच मला यातून दाखवून द्यायचे होते.” रिचर्ड गेअर हॉलीवूडचे प्रस्थापित अभिनेते होते. सामाजिक कार्यात त्याना रस होता. दलाई लामा यांचे ते चाहते होते. पण त्यांच्याकडून झालेल्या अशा कृतीने देशभरात खळबळ माजली होती.
गोरा साहेब अमेरिकेला निघून गेला. पण आता कठीण परिस्थिती शिल्पासाठी होती. कारण भारतात अनेक ठिकाणी तिच्यावर केस दाखल झाल्या होत्या. तिने मुंबई हायकोर्टात अपील करून सर्व केसेसची एकत्रित सुनावणी मुंबईमध्ये करावी, अशी विनंती माननीय उच्च न्यायालयात केली. न्यायालयाने तिची बाजू ऐकून घेतली आणि तिची मागणी मान्य केली. (Shilpa – Richard Gere Kissing Case)
ही केस पुढे पंधरा वर्षे चालली आणि १८ जानेवारी २०२२ रोजी तिला या आरोपातून काहीसा दिलासा मिळाला. परंतु अजूनही देशातील काही कोर्टामध्ये तिच्याविरुद्ध खटले चालू आहेतच.
२००७ साली शिल्पा शेट्टीने ब्रिटन टीव्हीच्या ‘सेलेब्रिटी बिग ब्रदर’ या रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला होता. या भागाची ती विनर ठरली. परंतु या शोच्या दरम्यान तिच्यावर वर्णद्वेषी मानसिकतेतून आरोप करण्यात आले होते. शिल्पा शेट्टी या शो मध्ये त्या मुळे धाय मोकलून रडताना संपूर्ण जगाने पहिले होते.
=====
हे देखील वाचा – सावधान! वॉल वैऱ्याची आहे…
=====
बाजीगर (१९९३) पासून बॉलीवूड मध्ये आलेली अभिनयात यथातथाच असली तरी तिच्या अशा वादग्रस्त भूमिकांमधून ती कायम प्रेक्षकांच्या समोर राहीली आहे.