
Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?
जी पी सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ ला प्रदर्शित झाला. आज हा सिनेमा पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. त्या मुळे देशातील अनेक थिएटर मध्ये पुन्हा नव्याने प्रदर्शित होतो आहे. या निमित्ताने नवीन पिढीला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर भव्य रुपात पाहायला मिळत आहे. या सिनेमाचे गारुड अजून प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. गेल्या पन्नास वर्षात ‘शोले’ या नावा शिवाय कोणती ही चित्रपटाची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही इतकं अढळ स्थान ‘शोले’ ने रसिकांच्या मनात आणि समाज माध्यमात मिळवलेलं आहे. (Sholay Movie)

या चित्रपटाची मेकिंग, या चित्रपटाचे प्रदर्शन, या चित्रपटाला मिळालेले अभूतपूर्व यश, या चित्रपटाला केवळ एकच मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार, या चित्रपटाचा भारतीय चित्रपट सृष्टी वर झालेला परिणाम…. यावर गेल्या पन्नास वर्षात अनेकदा चर्चा झालेली आहे. या वर्षी सिनेमाच्या पन्नासाव्या वर्षी तर ही चर्चा अजूनच वाढलेली आहे. यातून बऱ्याच नवीन घटना माहिती बाहेर येत आहे. ‘मेकिंग ऑफ क्लासिक मूवी शोले’ या पुस्तकात या ‘शोले’ च्या मेकिंग ची संपूर्ण स्टोरी आलेली आहे. ‘शोले’ हा इथल्या समाज मनात आणि माध्यमांमध्ये खोलवर रुजलेला चित्रपट आहे. त्यामुळे त्या विषयाच्या बातम्या लोक आवडीने वाचतात.
‘शोले’ या चित्रपटात एक कव्वाली देखील होती. ही कव्वाली ध्वनिमुद्रित देखील झाली होती पण त्याचे चित्रीकरण मात्र होऊ शकले नाही. कां? कारण ‘शोले’ या चित्रपटाची लांबी प्रचंड मोठी झाली होती. त्यामुळे या कव्वालीला सिनेमात स्थान मिळू शकले नाही. म्हणून फक्त रेकॉर्डच्या स्वरूपात ती आहे. मध्यप्रदेश मधील काही लोक कलावंतानी आता यावर व्हिडीओ करून यु ट्यूब वर टाकले आहेत.

या कव्वालीचे बोल होते ‘चांद सा कोई चेहरा जो पहलू में था तो चांदनी का मजा नही आता…’ या चित्रपटाचे स्क्रीन प्ले डायलॉग रायटर सलीम जावेद यांनी खास ही कव्वाली चित्रपटात यावी यासाठी प्रयत्न केले. त्या करीता गीतकार आनंद बक्षी यांना कव्वाली लिहायला सांगितली. त्यांनी देखील भन्नाट कव्वाली लिहिली. हि गायली किशोर कुमार, मन्नाडे, भूपेंद्र सिंग आणि स्वतः आनंद बक्षी यांनी. चित्रपटात ही कव्वाली जेल मधील एका प्रसंगात चित्रित करायचे ठरले होते. अमिताभ बच्चन ,धर्मेंद्र, केस्टो मुखर्जी , आणि असरानी यांच्यावर चित्रित होणार होती असे म्हणतात. तर काहींचे मते गब्बर च्या अड्ड्यावर चित्रित होणार होती असे ही म्हणतात. पण चित्रपटाची लांबी वाढल्यामुळे ही कव्वाली काही पिक्चराईजच झाली नाही.

आता या कव्वालीवर अनेकजण व्हिडिओ बनवत आहेत पण त्यात ती मजा नाही. कव्वाली खरोखरच सुंदर झाली होती आणि गीतकार आनंद बक्षी यांना गायक म्हणून या कव्वालीत समावेश झाला होता त्यामुळे जेव्हा ही कव्वाली चित्रपटात घेतली जाणार नाही असं म्हटल्यानंतर ती खूप नाराज झाले होते. त्यांच्या आत्मचरित्रात देखील त्यांनी याचा उल्लेख केला आहे. आनंद बक्षी यांनी बागो मी बहार आयी (मोम कि गुडीया) हे त्या पूर्वी गायले होते. ‘ शोले ‘ या चित्रपटातील संगीत हा एक वेगळा लेखाचा विषय आहे. शोले सिनेमाच्या राक्षसी यशाने संगीतमय चित्रपटाच्या नरडीला नख लावले असे देखील काही जण म्हणतात. कारण त्यानंतर ॲक्शन पॅक सिनेमाचा जमाना सुरू झाला. खरं तर ऍक्शन पॅक शोले सिनेमांमध्ये म्युझिकला फारसं महत्त्व नव्हतंच. पण यातील जिप्सी सॉंग ‘मेहबूबा मेहबूबा गुलशन मी फूल खिलते है…’ हे गाणे जबरदस्त गाजले. तसेच मन्नाडे आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ या गाण्याला तुफान लोकप्रियता लाभली.
================================
हे देखील वाचा : Sholay म्हणजेच मिनर्व्हा, मिनर्व्हा म्हणजेच शोले
=================================
‘होली के दिन दिल खिल जाते है’ हे गाणे टॉप टेन होळी गीता तील आहे. ‘कोई हसीना जाब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है स्टेशन से गाडी जब छुट जाती है तो..’ या गाण्यावर पब्लिक खूष होती. लताचे ‘ जब तक है जान जाने जहाँ मै नाचूंगी’ वर प्रेक्षकांनी पसंतीची दाद दिली. ही गाणी चित्रपट चालला म्हणून खूप चालली असेच म्हणावे लागेल. अर्थात कव्वाली असती तर हा चित्रपट आणखी रंगसदार झाला असता असे म्हणावे लागेल. खरंतर रमेश सिप्पी काय किंवा राहुल देव बर्मन काय यांनी ही कव्वाली पुढे कुठल्यातरी चित्रपटात नक्की वापरू शकले असते. पण त्यांनी का वापरली नाही हा प्रश्नच आहे. या कव्वालीची लिंक मी खाली देत आहे तुम्ही सवडीने नक्की ऐका. आज शोले या चित्रपटाला पन्नास वर्ष होत असताना त्यात समाविष्ट न झालेल्या कव्वालीच्या काही आठवणी!
https://youtu.be/HvXtmKtz7Hs?si=63vXA3pCiArUma8Q ( ‘शोले’ चित्रपट कव्वाली लिंक)