Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली
१५ ऑगस्ट ७५ ते सप्टेंबर ८०… तब्बल पाच वर्षे Sholay मिनर्व्हात
आजच्या ‘पैसा फेको तमाशा देखो’ अथवा जवळपास प्रत्येक गोष्टीत ” पैसा पैसा पैसा ” अतिशय महत्वाचा झाला असतानाच्या गतिमान युगात नवीन चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतोय तोच त्याने किती कोटी कमावले याच्या ब्रेकिंग न्यूज येतात. त्या आकडेवारीनुसार चित्रपट कसा आहे, आपण तो पहावा की नाही, कुटुंबासह पहावा का याचा कोणताच निर्णय घेता येत नाही. खरं तर चित्रपटाच्या गुणवत्तेची चर्चा रंगली तर तो पाहायला प्रेक्षक येतील ना?

पूर्वी कसं, थिएटरवर हाऊसफुल्लचा हार घातलेला फलक दिसला, ब्लॅक मार्केटमधील तिकीटांचा दर वाढला, गर्दीतून कोणी तरी विचारतेय ‘एक्स्ट्राॅ है क्या?’ की समजावे पिक्चर सुपर हिट है. मग शंभर दिवसांचे यश, पंचवीस आठवड्यांचे रौप्य महोत्सवी यश, पन्नास आठवड्यांचे सुवर्ण महोत्सवी यश असे मिटर पडलेले. अनेक फिल्म दीवाने तर आवडलेला चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत. एन्जाॅय करीत. ” शोले” पाच दहा वेळा झालेच पण पन्नास साठ वेळा पाहणारे देशभरात अनेक आहेत. त्यांना अख्खा पिक्चर पाठ असतो. असे प्रेम आपल्या देशात नक्कीच मिळते. ही मिळकत बरीच मोठी. मोजता न येणारी. आणि मग ज्युबिलीची हिट पार्टी. तेव्हा होणारे स्मृतिचिन्हाचे ( आकर्षक ट्राॅफिज) वाटप. आणि अनेक कलाकारांच्या घरी त्या स्मृतिचिन्हांची लक्षवेधक ठेवण. त्यातूनच त्या स्टारचे सुखावणे. चित्रपटाचे यश असे मुरत पसरत जात असते.
================================
हे देखील वाचा: अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?
=================================
आजच्या मल्टीप्लेक्सच्या युगात ‘बाजीराव मस्तानी ‘, ‘सिंघम ‘, ‘पद्मावत ‘, ‘सिम्बा ‘, ‘तानाजी ‘, पुष्पा, कांतारा, आरआरआर, ॲनिमल, पुष्पा २, कुबेरा, सैय्यारा या सुपर हिट चित्रपटांचा रिलीज झाल्यापासून किती आठवड्यांचा मुक्काम असतो? जास्तीत जास्त सात ते आठ आठवडे. तोपर्यंत त्या चित्रपटाची गर्दी ओसरललेली असते म्हणा अथवा अनेकांचा तो चित्रपट पाहून झालेला असतो म्हणा. त्यामुळे आजच्या ग्लोबल युगातील रसिकांना रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले ‘ने मुंबईत मेन थिएटर मिनर्व्हामध्ये तब्बल पाच वर्षे मुक्काम केला होता हे सांगितले तर आश्चर्य वाटेल.
सध्या सगळीकडेच ‘शोले’ च्या पन्नास वर्ष पूर्ण सेलिब्रेशनची चर्चा होत असताना तर हे सांगायलाच हवे. ‘शोले ‘ मुंबईत सगळीकडे पस्तीस एमएम आणि मोनो साऊंड सिस्टीमने रिलीज झाला. पण मुंबईत त्याच्या सत्तर एमएमच्या प्रिन्ट मोजून तीनच होत्या. त्याही इंग्लडवरुन तांत्रिक सोपस्कार करुन आणताना मुंबई विमानतळावर कस्टम ड्यूटीमुळे मिनर्व्हा थिएटरवर एक प्रिंट पोहचण्यास उशीर झाल्यामुळे ‘शोले ‘चा भव्य प्रीमियर पस्तीस एमएममध्येच पार पडला आणि तो संपल्यावर सत्तर एमएमची प्रिन्ट पोहचली आणि तेव्हा रमेश सिप्पी, अमिताभ अशा अगदी काही मोजक्या जणानी तो पाहिला. मिनर्व्हात ‘शोले ‘ पाहण्यात थरार होता, रोमांचक अनुभव होता.

मोठ्या पडद्यावर प्रत्येक दृश्य भव्य दिसे आणि साऊंड सिस्टीमने वेगळाच अनुभव येई. (मुंबईत सुरुवातीस काही आठवडे दक्षिण मुंबईतील न्यू एक्सलसियर व चेंबूरच्या बसत चित्रपटगृहात सत्तर एमएम व स्टीरिओफोनिक साऊंड असा होता. काही आठवड्यात या प्रिन्ट अन्य शहरात प्रदर्शित झाल्या) त्या काळात गावावरुन मुंबईत आलेल्या पाहुण्यांना मिनर्व्हात ‘शोले ‘ दाखवणे सामाजिक प्रघात पडला. यशस्वी चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, माध्यम क्षेत्रावर असा चौफेर प्रभाव टाकतो. हे यश मोजता येत नाही आणि मोजूदेखिल नये).
‘शोले’ मिनर्व्हात १५ ऑगस्ट १९७५ ते ३१ ऑगस्ट १९७८ असा सलग तीन वर्षे दिवसा तीन खेळ याप्रमाणे ‘शोले ‘ धो धो चालला आणि मग तेथेच तो मॅटीनी शोला शिफ्ट केला आणि सप्टेंबर १९८० पर्यंत ‘शोले ‘ने मिनर्व्हातच मुक्काम केला. त्या काळात आवडलेला चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला जात असे आणि अशाच रिपिट ऑडियन्सने असे सुपर हिट चित्रपट दीर्घकाळ मुक्काम करीत. ‘शोले ‘साठी मिनर्व्हा थिएटरमध्ये अप्पर स्टाॅल चार रुपये चाळीस पैसेआणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असलेले तिकीट त्या काळात खूपच महाग वाटत. तेव्हा ग्रामीण भागातील थिएटरमध्ये स्टाॅल एक रुपया तिकीट असे यावरुन ‘शोले ‘च्या तिकीट दराची कल्पना येईल. पण एकदा का चित्रपट आवडला की आपल्याकडचा पब्लिक तो असा काही डोक्यावर आणि डोक्यात घेतो की मग वाढीव तिकीट दर दुय्यम गोष्ट वाटते.
================================
हे देखील वाचा : Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…
=================================
‘शोले ‘च्या तिकीटाची ब्लॅक करुन मिनर्व्हा थिएटरबाहेरच्या ब्लॅकवाल्यानी गावी बंगला बांधला तर सॅन्डवीच विक्रीवाल्याने चक्क हाॅटेल सुरु केले अशाही रंजक गोष्टींचा खजिना ‘शोले ‘ने घडवला. थिएटरमध्ये असा दीर्घकालीन मुक्काम करण्याचा ‘शोले ‘चा विक्रम यशराज फिल्मच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे ‘ने मोडला, मुंबईत मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला तो १३५० व्या आठवड्याच्या पुढे सरकला आहे….. ‘शोले ‘चा इम्पॅक्टही भारी आहे. आजही एकाद्या जाहिरात/ सामाजिक/सांस्कृतिक/रिअॅलिटी शो/राजकारण यात अधूनमधून ‘शोले ‘चा संदर्भ असतोच….आणि मिम्स तर केवढे तरी बघताहेत. आजच्या ग्लोबल युगात ” शोले” अधिकाधिक देशात पोहचतोय. चित्रपटगृहाच्या पडद्यावरुन उतरला तरी तो विविध माध्यमातून व अनेक कारणास्तव सुरुच असतो. आणि हे यश किती कोटी कमावले यापेक्षाही वजनदार असतेच…